आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • \'Divya Marathi\' Has Get Information From Three Organizations: How Will It Be Summer, Monsoon

थंडीच्या लाटेची दक्षिणेवर स्वारी; \'दिव्य मराठी\'ने 3 संस्थांकडून जाणून घेतले : कसा राहील उन्हाळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यंदा कडाक्याच्या थंडीने नवे विक्रम नोंदवले आहेत. दरवर्षी मध्य भारतापर्यंत येणारी थंडीची लाट यंदा दक्षिण भारतात जाऊन धडकली. आता येणारा उन्हाळाही असाच कडक राहील आणि पारा २ अंशांनी चढा राहील. मान्सूनच्या पावसाचे प्रमाणही चांगले राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या क्लायमॅट प्रेडिक्शन विभागाचे प्रमुख डी.एस. पई यांनी सांगितले, दरवर्षी थंडीच्या लाटेचा परिणाम दक्षिण भारतात फारसा जाणवत नाही. यंदाच्या जानेवारीत थंडीच्या लाटेने उत्तर आणि मध्य भारताच्या सीमा पार करत थेट दक्षिणेत मुसंडी मारली. केरळ , कर्नाटक, तामिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांतील पारा ४ ते ५ अंशांनी घसरला. दक्षिण भारतात जानेवारीत सरासरी १८ ते २५ अंश तापमान असते. देशात थंडीचा मुक्काम आता मार्चपर्यंत राहील अशी शक्यता आहे. यंदा उत्तर ध्रुवावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे तेथील थंड वारे युरोपमार्गे भारतात धडकत आहे. यामुळेच यंदा उत्तरेत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. हवामानविषयक अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेच्या एका अहवालानुसार, फेब्रुवारी आणि मार्चमध्येही तापमान १ ते २ अंशांनी कमी राहील. 

 

या कडाक्याच्या थंडीचा परिणाम येणाऱ्या उन्हाळा आणि पावसाळ्यावर परिणाम होणार का? कडक हिवाळ्यानंतर उन्हाळाही कडक राहून पाऊस चांगला पडतो. यावर स्कायमेटचा अहवाल सांगतो, भारतात मार्चनंतर जूनपर्यंत कडक ऊन राहील. तापमान सरासरीपेक्षा २ अंशांपर्यंत जास्त राहील. उदाहरणच सांगायचे झाले तर एखाद्या शहराचे मेमधील सरासरी तापमान ३८ ते ४० अंश असेल तर ते ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकते. मेअखेर दरवर्षीपेक्षा अधिक उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कारण या काळात ६० टक्के अल निनो राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात फारशी वाढ नाही. ही सर्व नॉर्मल अल निनोची लक्षणे आहेत. पावसाळ्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे. 

 

डी. एस. पई यांच्या मते, जानेवारीत अल निनो सर्वसाधारण स्थितीत होता. आगामी काळात अल निनो कमकुवत होण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या मते, अशा स्थितीत चांगला पाऊस होईल. अमेरिकेच्या नॅशनल प्रेडिक्शन सेंटरच्या जानेवारीतील अहवालानुसार, या वर्षी भारतात सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र आगामी काळातील वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या निरीक्षणानुसार पावसाबाबत आणखी अचूक अंदाज व्यक्त होतील. 

 

दक्षिण भारतात थंडीचे नवे विक्रम 
डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडीची लाट महाराष्ट्र ते केरळ अशी पोहोचली. स्कायमेटच्या मते, नागपुरात यंदा थंडीच्या लाटेचा परिणाम दीर्घकाळ जाणवला. नागपुरात जानेवारीतील ३१ पैकी १९ दिवस तापमान १० अंशांच्या खाली राहिले. सरासरी हे १३ अंशांपर्यंत असते. तर केरळमधील मुन्नार येथे जानेवारीत सलग १२ दिवस पारा घसरला होता, तो ५ जानेवारीला उणे ३ पर्यंत आला होता. कोट्टायम मध्ये जानेवारीत तापमान विक्रमी १६ अंश राहिले. 

 

असे का : इंडेक्स सायकलच्या कमकुवत स्थितीमुळे 
इंडेक्स सायकल मध्य अक्षांश पश्चिम वाऱ्याची (वेस्टर्ली) तीव्रता दर्शवते. जसे एखादी दोरी दोन्ही बाजूंनी सैल केल्यानंतर लाटा तयार होतात, यंदा ही स्थिती आहे. याच्या कमकुवत स्थितीत लाटा तयार होतात आणि थंड वारे विषववृत्ताकडे (दक्षिणेकडे) झुकते. त्यामुळे यंदा थंडीच्या लाटेने दक्षिणेवर स्वारी केली. 

 

दिल्ली : धुके कमी, २२ वर्षांत स्वच्छ वर्ष 
डिसेंबरमध्ये दिल्लीत धुके कमी प्रमाणात पडले. दृश्यमानतेचा विचार केल्यास, हे वर्ष मागील २२ वर्षांतील सर्वात स्वच्छ वर्ष राहिले. सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये दिल्लीत ३०० तास धुके असते, यंदा ते १४५ तास पडले, तर ९ रात्री दाट धुक्याच्या असतात. यंदा असे दोनच वेळा घडले. 

असे का : आयएमडीनुसार, डिसेंबरमध्ये पश्चिमी विक्षोमाचे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) प्रमाण कमी राहिले. त्यामुळे दिल्लीत हवामान तुलनेत स्वच्छ राहिले व धुक्याचे प्रमाण घटले.
 
यंदा १२०० तास शून्य अंश तापमान, सफरचंदाचे पीक चांगले येणार 
बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात सफरचंदाचे पीक चांगले येण्याची शक्यता आहे. सफरचंदासाठी हिवाळ्यात १२०० तास शून्य अंशाच्या आसपासचे हवामान पोषक असते. तेथे १५ डिसेंबरनंतर असे चिलिंग तास सातत्याने राहिले. त्यामुळे यंदा ३ कोटी पेट्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. बर्फवृष्टीमुळे ८ जिल्ह्यांत २२ जानेवारीपासून दैनंदिन जीवन ठप्प होते. हे हवामान ९ फेब्रुवारीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...