Sangali Flood / पूरग्रस्त सुखवाडीसाठी ‘दिव्य मराठी’चा पुढाकार, सामाजिक संस्थांच्या मदतीने गाव घेणार दत्तक

‘दिव्य मराठी’च्या सोबत ‘K92 Agricos’ संघटना आणि ‘आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या दोन संस्था करणार मदत

दिव्य मराठी नेटवर्क

Aug 13,2019 07:49:00 AM IST

सांगली - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातल्याने लाखो संसार उद्ध्वस्त झाले. महापूर ओसरत असताना यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज येत आहे. अशा वेळी प्रत्येकाने जमेल तसे पुढे येऊन एकजुटीने या संकटास सामाेरे जाणे आवश्यक आहे. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने ‘दिव्य मराठी’ने एक गाव दत्तक घेऊन तेथील लोकांचे पुनर्वसन करण्याचा निर्धार केला आहे.


दोन हजार लोकवस्तीचे गाव
ज्या ब्रह्मनाळमध्ये बोट बुडाली, त्याच पलूस तालुक्यातील सुखवाडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. मोडून पडलेले संसार उभे करणे, त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरवणे, मुला-मुलींच्या शालेय प्रगतीकडे लक्ष देणे, समुपदेशन करणे, वैद्यकीय उपचार वेळेत मिळावेत, यासाठी प्रयत्न करणे आदी गोष्टींचा यात समावेश आहे. ‘दिव्य मराठी’च्या सोबत ‘K92 Agricos’ ही संघटना या कामासाठी उतरली आहे. कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयातील एका बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली ही संघटना आहे. पुनर्वसनाचे प्रत्यक्ष काम पलूस येथील ‘आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पलूस’ ही संस्था करणार आहे. पूरग्रस्त भागात नव्याने एक ‘सुखवाडी’ उभी राहावी, असा प्रयत्न ‘दिव्य मराठी’चा आहे. ज्यांना स्वतः काही करण्याची इच्छा आहे, त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या स्थानिक संपादकांशी संपर्क करावा.

...अजूनही निम्मं गाव पाण्यात!
सुखवाडी गावात सुमारे ३५० कुटुंबे राहत असून प्रत्येक घरात माणसांसह जनावरांचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपास प्रत्येक घरातील ५-६ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यांचे कुजलेले मृतदेह काढून, पडझड झालेल्या घरांची डागडुजी, गावाची स्वच्छता करून योग्य तो औषध पुरवठा तातडीने करण्याची गरज आहे. गावाच्या पुनर्वसनात आम्ही ‘दिव्य मराठी’च्या सोबत आहोत.
- डॉ. अमोल पवार, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पलूस

आम्ही एकजुटीने काम करू
आमचा सुमारे दीडशे जणांचा समूह नेहमी गरजूंच्या मदतीसाठी आमच्या परीने प्रयत्न करत असतो. सध्या दक्षिण महाराष्ट्रावर ओढवलेले संकट पाहून येथील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू. - शिवाजी भोसले, सदस्य, ‘K92 Agricos’ पिंपरी चिंचवड.

X
COMMENT