आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदी सरकारचे लक्ष शहरांकडे, ग्रामीण भाग दुर्लक्षितच, दिव्य मराठी जनतेचा जाहीरनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या लोकसभा निवडणुकीस सामोरे जाताना राज्यातील मतदारांचा ‘कौल’ नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने जनतेचा कल जाणून घेतला आणि त्याद्वारे जनतेच्या मनातील ‘जाहीरनामा’ पुढे आणला आहे. यानिमित्त राज्याच्या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील जनतेच्या नव्या सरकारकडून असणाऱ्या आशा-आकांक्षा जाणून घेण्यात आल्या. तसेच विद्यमान सरकारची प्रमुख क्षेत्रांत कामगिरी कशी राहिली याबाबतही सामान्य मतदारांची मते जाणून घेतली. मोदी सरकारतर्फे आखण्यात आलेली स्मार्ट सिटी योजना, स्वच्छ भारत अभियान, स्किल इंडिया आणि स्टार्टअपसारखे उपक्रम याबाबत लोकांनी सकारात्मक मते नोंदवली. नगरविकास, उद्योग व व्यापार, महामार्ग आणि मेट्रो या क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, ग्रामीण विकास, विशेषत: पिण्याच्या पाण्याची समस्या, सिंचनाचा प्रश्न, हमीभाव न मिळाल्याने ढासळलेले शेतीचे अर्थकारण आणि शेती व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष याबाबत मात्र सामान्य लाेकांनी नाराजी व्यक्त केली.


बहुतांश शहरी मतदारांचा कल सरकारच्या योजनांबद्दल आणि कामगिरीबद्दल सकारात्मक  दिसला. त्याउलट ग्रामीण भागातील मतदारांनी मात्र बिघडलेल्या आर्थिक स्थितीसोबतच शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सेवांच्या अंमलबजावणीत हाेत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मार्ट सिटी हवी, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहावी, सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरे, रोजगार निर्माण करणारे उद्योग, शेती विकासासाठी गुंतवणूक, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, दर्जेदार शासकीय शिक्षण आणि उत्तम सार्वजनिक आरोग्यसेवा अशा अपेक्षा सामान्य जनतेच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...