आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहता न आल्याने फजिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातव्या इयत्तेत असतानाची गोष्ट आहे. गावच्या शेजारी असलेल्या विहिरीला त्या वेळी भरपूर पाणी लागले होते. विहीर पोहण्यायोग्य असल्याने गावातील बरीच मुले विहिरीवर पोहण्यासाठी जात असत. सुटीचा दिवस असल्याने मी सर्व मुलांबरोबर आमच्या शेतातील विहिरीवर गेलो. घरी कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नव्हती. सोबतच्या सर्व मुलांनी विहिरीवर गेल्याबरोबर कपडे काढून पटापटा वरूनच उड्या टाकल्या. मी सर्व कुतूहलाने पाहत होतो, कारण मला पोहता येत नव्हते. माझे चुलतभाऊ तेथेच उभे होते. मी त्यांच्याकडे पोहायला उतरण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर भावाने माझ्या कमरेला दोर बांधला आणि विहिरीत उतरायला सांगितले. इतर मुले पोहताहेत ना, मग आपल्याला पोहायला काय हरकत आहे, असा विचार मी केला, पण पाण्यात पाय टाकताच भीतीने थरथरू लागलो. त्यातच पाठीमागून एकाने मला जोराचा धक्का दिला आणि मी पाण्यात पडलो. त्या वेळी माझ्या नाकातोंडात पाणी गेल्याने अधिकच घाबरून गेलो. काय करावे हे कळत नसल्याने मी पाण्यात बुडू लागलो. तेव्हा भावाने दोराच्या साहाय्याने मला ओढून विहिरीच्या पाय-यांवर आणले. इतर मुलांनी ओढून मला बाहेर काढले. दरम्यान, घर जवळ असल्याने एकाने वडिलांना हा प्रकार सांगितला. तेव्हा वडिलांनी शेतात येऊन मला सर्वांसमक्ष असा मार दिला की, काही विचारता सोय नाही. अगोदरच मी बुडण्याच्या भीतीने थरथर कापत होतो आणि वरून हा मार. मी विहिरीत पडलो, असा चुकीचा निरोप वडिलांना मिळाल्याने त्यांनी मला असा मार दिला. दरम्यान, माझ्या वडिलांचा रुद्रावतार पाहून विहिरीवरून सगळे पळून गेले होते. झालेल्या घटनेत कोणाचीही चूक नव्हती, पण पहिल्यांदा विहिरीत उतरायचे म्हटल्यावर जी दक्षता बाळगायला पाहिजे, ती मी घेतली नसल्याने आणि वडिलांना उलटसुलट सांगण्यात आल्याने घोळ झाला. शेवटी वडिलांनीच मला पोहायला शिकवले. आता पोहण्याचा विषय काढला की, तेव्हाची आठवण समोर येते.