आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी Must Read : विसरलेल्या काळातले विसरलेले सहकारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्या. नरेन्द्र चपळगावकर

भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तानच्या निर्मितीला कारणीभूत झालेली व्यक्ती म्हणून जिनांना ओळखले जाते आणि या त्यांच्या वर्णनात काही चूक नाही. पण हेच जिना आपल्या राजकीय आयुष्याच्या पहिल्या पर्वात धर्म आणि राजकारण यांची गल्लत करण्याला विरोध असणारे एक उदारमतवादी राजकारणी होते हे आज फारसे कुणाच्या लक्षात नसते. आणखी एक आज आश्चर्यकारक वाटू शकणारी गोष्ट म्हणजे या महंमद अली जिनांच्या मनात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांबद्दल विलक्षण आदर होता. जिना आणि टिळक यांच्या राजकारणात एक सहकार्याचे पर्व येऊन गेले. त्याची ओळख करून देणारे एक पुस्तक अर्वाचीन राजकीय इतिहासाचे अभ्यासक ए. जी. नुराणी यांनी लिहिले आहे. ’Jinnah and Tilak : Comrades in the Freedom Struggle’ या नावाचे हे पुस्तक ऑक्सफर्डने प्रकाशित केले आहे.
भारतीय राजकारणाच्या पहिल्या पर्वात ब्रिटिश राजाच्या छत्राखाली स्वायत्त भारत हेच बहुतेकांचे स्वप्न होते. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी आणि काही वर्षांनीच झालेली मुस्लिमांसाठी वेगळ्या पाकिस्तानची मागणी या नंतर आलेल्या सुधारित मागण्या होत्या. कराचीमध्ये २५ डिसेंबर १८७६ रोजी जन्मलेले जिना टिळकांपेक्षा वीस वर्षांनी लहान होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन आलेले जिना १९०४ ते १९०६ अशी दोन वर्षे मुंबई महापालिकेचे सभासद होते. १९०६ साली कोलकात्यात दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला ते हजर होते. फेरोजशहा मेहता हे त्या काळात मुंबईचे सर्वश्रेष्ठ नेते आणि मवाळ राजकीय धोरण असलेले व्यक्तिमत्त्व होते. मुंबईत वकिली करत असताना जिना फेरोजशहांचे मार्गदर्शन घेत आणि मेहतांच्या मनात जिनांविषयी कौतुक होते. मुंबईत झालेल्या एका काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी आलेल्या प्रतिनिधींशी जिनांची एक कर्तबगार तरुण म्हणून फेरोजशहांनीच ओळख करून दिली होती.लोकमान्य टिळकांबद्दलचा भारतात त्या वेळी असलेला आदर जाती-धर्माच्या सर्व मर्यादा ओलांडून जाणारा होता. महंमद अली जिना तसेच एक ख्यातनाम राजकारणी आणि कवी मौलाना हसरत मोहानी हे त्यापैकीच होते. हसरत मोहानीने तर लोकमान्यांवर गजल लिहिली होती. नुराणींनी आपल्या पुस्तकात ती उद्धृत केलेली आहे. जिनांच्या मनातला लोकमान्य टिळक व ना. गोपाळ कृष्ण गोखले या मराठी नेत्यांबद्दलचा आदर जिनांची वकिली व्यवसायातील एक शिष्य महंमद अली छागला यांनी आपल्या Roses in December या आठवणींच्या पुस्तकात सांगितला आहे. जिना नेहरू किंवा गांधी यांच्याबद्दल कठोर शब्द बोलत; पण टिळक किंवा गोखले यांच्याबद्दल मात्र कधीही अवमानात्मक शब्द त्यांच्या तोंडून निघत नसे, असे छागलांनी म्हटले आहे.टिळकांना ज्या न्या. दावरांनी सहा वर्षांची शिक्षा दिली त्या दावरांबद्दलची एक आठवण छागलांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे; ती नुराणींनी येथेही उद्धृत केली आहे. टिळकांना अशी शिक्षा दिल्यानंतर थोड्याच दिवसांत सरकारने त्यांना ‘सर’ पदवी बहाल केली. हे अर्थातच देशभक्ताला अमानुष शिक्षा देण्याबद्दलचे बक्षीस होते. या शासकीय सन्मानाबद्दल दावरांसाठी एक सन्मानभोज मुंबईच्या वकील संघाने आयोजित केला होता. त्याचे निमंत्रण देणारे परिपत्रक जिनांकडे आले. त्या वेळी जिनांनी त्यावरच लिहिले, ‘सरकारला हवे ते करण्याबद्दल एका न्यायाधीशाला सन्मानभोज देताना वकील संघाला लाज वाटली पाहिजे.’ या परिपत्रकावरील जिनांचा कठोर अभिप्राय नंतर दावरांच्याही पाहण्यात आला. त्यांनी ‘तू असे का लिहिलेस?’ असे जिनांना विचारले तेव्हा, ‘जे मनाला आवश्यक वाटले तेच मी केले’, असा त्यांनी जवाब दिला.लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाच्या आरोपावरून तीन खटले झाले. त्यापैकी दावरांसमोरील खटल्यात टिळकांनी स्वतःच आपली बाजू मांडली. उरलेल्या दोन्ही खटल्यांत बॅ. महंमद अली जिना टिळकांचे वकील म्हणून काम करत होते. पक्षकार टिळक आणि वकील जिना यांचे संबंध अतिशय उत्तम होते. टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवसच अगोदर ताई महाराज दत्तक प्रकरणात निर्माण झालेल्या एका उपप्रकरणात द्यावयाच्या कैफियतेबद्दल चर्चा करण्यासाठी टिळक जिनांच्या चेंबरमध्ये स्वतः जात होते.राजकारणातसुद्धा टिळक आणि जिना यांचे सहकार्यच लखनौ करार होण्याला बरेचसे कारणीभूत झाले होते. या काळात जिनांची भूमिका भारतात हिंदू-मुस्लिम एकत्र नांदावेत, मात्र मुसलमानांना ते अल्पसंख्य असल्यामुळे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा पासंगाच्या अधिक जागा मिळाव्यात म्हणजे त्यांचा विश्वास वाढेल, अशी होती. लखनौ करारात प्रांतिक विधिमंडळात त्या त्या प्रांतात अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम किंवा हिंदू समाजाला लोकसंख्येपेक्षा जास्त जागा हेच सूत्र मान्य करण्यात आले होते. या काळात घडलेल्या दोन गोष्टी अंतिमत: पाकिस्तानच्या निर्मितीला पोषक ठरल्या. एक तर जिनांना मुस्लिमांसाठी वेगळी ओळख पाहिजे होती. नंतरच्या काळात याच वेगळ्या ओळखीचे रूपांतर वेगळ्या देशाच्या मागणीत झाले आणि काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ मान्य केले. त्याचाही पाकिस्तानच्या मागणीला बळ मिळण्यासाठी उपयोग झाला.गांधीजींनी खिलाफतच्या मागणीला पाठिंबा दिला व त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीशी मुस्लिम जोडले जातील अशी अपेक्षा केली. जिनांचा मात्र त्याला पूर्ण विरोध होता. खिलाफतीचा प्रश्न हा धार्मिक आहे व भारतीय राजकारणाशी त्याचा काहीही संबंध नाही, असे जिनांनी स्पष्टपणे सांगितले. ते या चळवळीपासून पूर्णपणे अलिप्त होते. खिलाफतीच्या निमित्ताने महंमद अली आणि शौकत अली हे बंधू काँग्रेसमध्ये आले आणि नेतेही बनले. एकाकाळी काँग्रेस उदारमतवादी व्यासपीठ होती, एकमेकांविरुद्धची मतेसुद्धा शांतपणे मांडली व ऐकली जात होती. हा अनुभव डिसेंबर १९२० मध्ये कोलकात्यात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी येऊ शकला नाही. व्यासपीठावर जिना भाषण करू लागले त्या वेळी अली बंधूंच्या शिष्यांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणण्यास सुरुवात केली. अधिवेशन संपल्यानंतर जिना आणि त्यांच्या पत्नी रेल्वेने परत जात असताना अकोला स्टेशनवर खिलाफतवाल्या निदर्शकांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. अली बंधू हे आंतरराष्ट्रीय इस्लामी चळवळीचे पुरस्कर्ते होते. जिनांना हे मानवणे शक्य नव्हते. कोलकाता अधिवेशनानंतर जिना हळूहळू काँग्रेसपासून बाजूला सरकू लागले.नुराणींच्या या पुस्तकात जिना आणि टिळक यांच्या सहअस्तित्वाच्या काळाबरोबरच इतरही अनेक लेख समाविष्ट आहेत. मुख्यत: ते जिनांच्या पुढील काळाच्या राजकीय चरित्राबद्दल आहेत. नुराणी यांनी पाकिस्तानात प्रसिद्ध झालेली पुस्तके आणि जिनांविषयक संशोधन करणाऱ्या संस्थांतील कागदपत्रे यांचा भरपूर उपयोग केला आहे, त्यामुळे भारतीय अभ्यासकांना इतरत्र उपलब्ध न होणाऱ्या साधनांचे उल्लेख आणि आधार या पुस्तकात आढळतात. जिनांच्या मनात अगदी १९४१ पर्यंत संपूर्ण स्वतंत्र अशा पाकिस्तानची कल्पना नव्हती, तर संरक्षण आणि परराष्ट्र यांसारखी खाती सांभाळणारे संघराज्य सरकार असावे आणि मुस्लिम प्रांतात पूर्ण स्वायत्तता असलेले पाकिस्तान नांदावे अशीच त्यांची कल्पना होती, असे नुराणींनी उद्धृत केलेले आधार सांगतात. अर्थात त्यांना त्या पाकिस्तानात सध्याचा भारतीय पंजाब आणि पश्चिम बंगाल हे हिंदुबहुल भागही हवे होते.या पुस्तकात पूर्वी इतरत्रही प्रसिद्ध झालेली एक-दोन छायाचित्रे मुंबईतल्या राजकीय सामंजस्याच्या वातावरणाची आठवण करून देणारी आहेत. त्यातली दोन छायाचित्रे गिरगावातल्या शांतारामाच्या चाळीत होणाऱ्या सभेची आहेत. एकात टिळक आणि गांधी आहेत, तर दुसऱ्यात टिळक आणि जिनाही दिसतात. मुंबईच्या सभा त्या वेळी ध्वनिक्षेपकांशिवाय आणि गिरगावातल्या मध्यमवर्गीय वस्तीत होत. शांतारामाची चाळ हेच जाहीर सभांचे ठिकाण होते आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय तसेच जवळच असलेल्या गिरण्यांतले मराठी कामगार हेच मुख्य श्रोते असत. वक्त्यांत मात्र मुंबईचे वेगवेगळ्या धर्म व जातीचे नेते असत. ही छायाचित्रे एकाकाळी मराठी माणसाला मुंबईच्या तेव्हाच्या राजकारणातही असणारे महत्त्व सांगणारी आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्हींपेक्षा वेगळा असा बंगालचा स्वतंत्र देश अस्तित्वात आणण्याच्या १९४७ मध्ये करण्यात आलेल्या प्रयत्नांची हकिगत या पुस्तकात आहे.लोकमान्य टिळकांबद्दल अधिक अभ्यास करण्यासाठी या पुस्तकात बरीच परिशिष्टे जोडलेली आहेत. त्यातल्या एका परिशिष्टात क्रिमिनल प्रोसिजर कलम १०८ प्रमाणे शांतता रक्षणासाठी हमी घेणाऱ्या पुण्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर चाललेल्या खटल्याचा आणि त्याविरुद्धच्या अपिलांचा संपूर्ण न्यायालयीन वृत्तांत जोडलेला आहे. आणखी एक महत्त्वाचे परिशिष्ट म्हणजे जिनांनी विधिमंडळातील भाषणात वेळोवेळी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणाची मांडलेली बाजू सांगणारे आहे.
इतिहास कित्येकवेळा रूढ समजुतींना बाजूला सारणारा असतो. फक्त तो विश्वसनीय साधने शोधून त्यांच्या आधारे सांगणारा असावा लागतो. नुराणी यांच्या राजकीय मतांबद्दल मतभेद असू शकतात; पण त्यांच्या संशोधन शिस्तीबद्दल मात्र शंका घेता येणार नाही.
 

बातम्या आणखी आहेत...