आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचा लढा, 'दिव्य मराठी'चा पाठपुरावा; ५ महिन्यांनंतर भायजळीचे काम पूर्ण, ७१ वर्षांनंतर गावाला डांबरी रस्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


धारूर : गावाला जाण्यासाठी धड रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाच्या माध्यमातून २० वर्षांपासून लढा सुरू केला. ग्रामस्थांच्या या लढ्याला दिव्य मराठीने पाठबळ दिल्याने ५ महिन्यांत भायजळी गावाला जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे . स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर भायजळीकरांना आता डोंगरातून डांबरी रस्ता मिळाला आहे . रस्त्याचे काम पूर्ण होताच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


स्वातंत्र्याला ७१ वर्षे उलटली तरी तालुक्यातील भायजळीगावाला जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने गावकऱ्यांचे हाल होत होते. गावाला रस्ता व्हावा म्हणून मागील २० वर्षांपासून आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामस्थ पाठपुरावा करत होते. दीड वर्षापूर्वी डीपीडीसीतून डांबरीकरणासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाल्यानंतर कामाचे टेंडरही निघाले होते. परंतु दीड वर्ष या रस्त्याच्या कामाकडे धारूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. पावसाळ्यात भायजळीला चांगला रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत होते. ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर रुई धारूर येथील योगायोग मजूर संस्थेला हे टेंडर देण्यात आले. गुत्तेदाराने काम सुरू करावे म्हणून ग्रामस्थांनी धारूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दोन वेळा उपोषण केले. भाजयळीला डांबरी रस्ता व्हावा म्हणून 'दिव्य मराठी'ने पाठपुरावा सुरू करताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडले. 


रस्त्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे धाव घेताच सिंह यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यातच खराब रस्त्यामुळे मोहिनी नावाच्या एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ रस्त्यासाठी पुन्हा पेटून उठले होते. योगायोग मजूर संस्थेने टेंडर बिलो रक्कमच भरली नसल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर सदरील रक्कम भरून वर्क ऑर्डरसाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाजोगाई दोन दिवस ठाण मांडले होते. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर गुत्तेदाराने नाली काम व साफसफाईचे काम सुरू केले होते . माती काम झाल्यानंतर पुन्हा दीड महिना काम थांबले होते. काम सुरू करावे म्हणून उपअभियंता फड यांना जिल्हाधिकारी सिंह यांच्या आदेशावरून फौजदारी गुन्हा का दाखल करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कार्यकारी अभियंता नरसिंग भेंडे यांनी ही फड यांना नोटीस बजावली. भंडे यांनी स्वत: भायजळी येथे येऊन रस्त्याची पाहणी केली . त्यामुळेच अभियंता फड यांनी भायजळीत तळ ठोकला.आठवडी बाजार, मजूर मिळेना, शेतकऱ्यांनी अडवले, गुत्तेदार ऐकेना अशी अनेक कारणे सांगत अधिकाऱ्यांकडून हे काम बंद सुरूचे प्रकार सुरू होते. पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल २५ वेळा दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भायजळी रस्त्याचे दहा लक्ष रुपयाचे डांबरीकरण काम आता पूर्ण झाले आहे. डोंगरातून डांबरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिव्य मराठी आणि ग्रामस्थांच्या लढयाला आता यश आले. 


रस्त्यामुळे आमची सोय झाली 
गावात येण्यासाठी कठीण डोंगरात आता डांबरी रस्ता झाला आहे. या रस्त्यामुळे आमच्या गावात आता कोणतेही वाहन येत आहे. अनेक दिवसानंतर आम्हाला रस्ता मिळाल्याने सोय झाली आहे. शामराव हांगे, ग्रामस्थ भायजळी. 


जीवनातील मोठा आनंद 
माझे आई-वडील भायजळी येथे राहतात. आता डांबरी रस्ता झाला आहे. या मुळे मला मोठा आनंद झाला आहे. दिव्य मराठीने सतत पाठपुरावा केल्याने आम्ही त्यांचे विशेष आभारी आहोत . अशोक मुंडे, जि.प. शिक्षक 
 

बातम्या आणखी आहेत...