आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक ते औरंगपुरा नाइट वॉक, अंधारावर मात करणार रातरागिणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गर्भापासून ते घरापर्यंत आणि कार्यालयापासून ते रस्त्यांपर्यंत महिला जितकी असुरक्षित आहे, तितकीच बंधने तिच्यावर घातली जातात. रात्र ही तिची वैरी असल्याचे सांगून तिला मर्यादा घातल्या जातात. ही बंधने झुगारून टाकण्यासाठी दै. दिव्य मराठीने 'मौन सोडू चला बोलू' अभियान सुरू केले आहे. त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे २२ डिसेंबर रोजी होणारा 'नाइट वॉक'. या उपक्रमाची शुक्रवारी घोषणा होताच, महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोशल मीडियावरही याचीच चर्चा असून अनेकांनी या अभियानाचे स्टेटस ठेवले आहेत. २२ डिसेंबर म्हणजे वर्षातली सगळ्यात मोठी रात्र. या दिवशी महाराष्ट्रातील २२ शहरांत एकाच दिवशी महिला घराबाहेर पडून, 'नाइट वॉक' करणार आहेत. औरंगाबादमध्ये क्रांती चौकात ५ नोकरदार महिला मशाल पेटवून रॅलीची सुरुवात करतील. तर औरंगपुऱ्यात म.जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ समारोप होईल. रात्री १० वाजता सुरू होणारा हा नाइट वॉक म्हणजे कुणाविरुद्ध आंदोलन नसून जगण्याचा जल्लोष असेल. रॅलीदरम्यान रंगारंग कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

तब्बल ४० महिला संघटनांकडून जल्लोषाची तयारी
सातत्याने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दै. दिव्य मराठीने हा विषय मांडताच, संपूर्ण शहरातून विविध संघटनांनी स्वतःहून फोन केले. आम्ही येणारच, अशी माहिती दिली आहे. काही संघटना पथनाट्य, पोवाड्याची तयारी करत आहेत, तर काहींनी दिंडी काढण्याची तयारी करत असल्याचे सांगितले.

व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने...
महिलांना निर्भय बनवण्यासाठी अभियान स्तुत्य आहे. पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी हे पाऊल आहे. आम्हीही पथनाट्य सादर करू. डॉ. अनिलकुमार साळवे, विभागप्रमुख, देवगिरी महाविद्यालय

सर्वच घटकांतील महिलांसाठी
शहरातील सर्वच घटकांतील स्त्रियांसाठी हे आंदोलन आहे. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन ताकद दाखवली तरच व्यवस्थेला धक्के बसतील. वसुधा कल्याणकर, शाहीर.

आमच्या आत्मसन्मानासाठीच
बातमी वाचताक्षणी हे अभियान आमच्या आत्मसन्मानासाठी असल्याची जाणीव झाली. मी तर सहभागी होईनच, पण अनेक मैत्रिणींना नाइट वॉकमध्ये सोबत घेऊन येईन. सरोज जैन, गृहिणी.

तुम्हीही सहभागी होऊ शकता
रात्रीला निघणाऱ्या या शोभायात्रेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या महिला संस्थांनी तसेच अभियानाचा लोगो मिळवण्यासाठी ९३४००६१६३० या क्रमांकावर संपर्क करावा. सोशल मीडियावर हा लोगो स्टेटस म्हणून ठेवता येईल.

बातम्या आणखी आहेत...