आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत :२०२२ पर्यंत पक्षसंघटना मजबूत करण्यास माझे प्राधान्य, पदाचे त्यानंतर बघू - प्रियंका गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या ठीक दीड महिन्यापूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या. प्रारंभी पूर्व उत्तर प्रदेश आणि त्यानंतर ७ राज्यांत पक्षासाठी सभा आणि रोड शो घेणाऱ्या प्रियंका मोदी सरकारची धोरणे आणि त्यांचा राष्ट्रवाद याबाबत टीका करताहेत. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार व्यग्र असलेल्या प्रियंका यांच्याशी चर्चा केली आहे भास्करचे संपादक (राजकीय) हेमंत अत्री यांनी  त्यातील संपादित अंश...

 

सध्याच्या निवडणुकीत कोणते प्रश्न असायला हवेत आणि का? आणि त्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे काय?
> बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. कारण ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी आता आहे. दुसरा मोठा मुद्दा आहे शेतकरी आणि शेतीवरील संकट. पाच वर्षे मोदी सरकारने शेतकऱ्यांचे शोषण केले आहे. १३ हजारांहून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना याेग्य दर मिळत नाही, मग ५० टक्के नफा कसा मिळेल? हे प्रमुख मुद्दे आहेत, जे मोदी सरकार मांडणार नाही. कारण त्यांच्याकडे याचे उत्तर नाही. 
 

 

प्रियंकांना राग केव्हा येतो, त्यावर नियंत्रण कसे मिळवता? विपश्यनेने आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम झाला आहे? 
> विपश्यना व्यक्तीतील अहंपणा कमी करण्याचे साधन आहे. मी आतापर्यंत अहंकार साधनेद्वारे हटवण्याच्या प्रयत्नात आहे.

 

भाजप राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन निवडणूक रिंगणात उतरला आहे, काँग्रेस याचा मोकळेपणाने सामना का करत नसल्याचे दिसून येते, याबाबत काय सांगाल? 

> प्रियंका : आम्ही पूर्ण तयारीने सामना करत आहोत. मी प्रत्येक भाषणात सांगते की, यांचा राष्ट्रवाद समजण्यापलीकडचा आहे. कारण त्यांचा राष्ट्रवाद त्यांच्या अहंकारापर्यंत मर्यादित आहे. ते या शब्दाकडे फक्त एकाच नजरेतून पाहतात. खरा राष्ट्रवाद आहे देशाप्रती प्रेम. देशाप्रति प्रेमाचा अर्थ आहे जनतेवर प्रेम आणि त्याचा अर्थ आहे जनतेचा आदर करणे. दलितांना मारहाण होत आहे आणि तुम्ही (मोदी) गप्प राहता. तुमचा सहकारी महिलांबद्दल अपशब्द उच्चारतो, तरीही तुम्ही गप्प राहता. तुम्ही आश्वासन देता की दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ. आता देशातील युवकांना ते सांगता की, पकोडे तळा. हा राष्ट्रवाद होऊ शकत नाही. 


निवडणूक आयोगाच्या नि:पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होताहेत. प.बंगालमध्ये प्रचाराचा कालावधी कमी करण्याच्या आयोगाच्या निर्णयाकडे कसे पाहता? 
प्रियंका : आयोग ही घटनात्मक संस्था आहे. दुर्दैव असे की या वेळी आयोगाचे निर्णय नि:पक्ष नाहीत. लोकांना विश्वास वाटावा असे काम आयोगाने करणे अपेक्षित आहे. कोणत्या तरी पक्ष किंवा नेत्याप्रती इमानदारी न दाखवता आयोगासाठी घटनात्मक जबाबदारी महत्त्वाची असायला हवी. सद्य:स्थिती त्रासदायक आहे. 

 

तुमचा जाहीर सभा घेण्याएेवजी फक्त रोड शो आणि कॉर्नर सभांवर भर दिसतो. इंदिरा गांधी यांची पद्धतही अशीच होती. हा योगायोग आहे की राजकारण? 
प्रियंका : ना योगायोग आहे ना राजकारण. मोठ्या जाहीर सभांत जे बॅरिकेडेस लावले जातात त्यात लोक माझ्यापासून ४० फूट दूर राहतात. हे मला आवडत नाही. मी जनतेशी संवाद करू इच्छिते. त्यांचे म्हणणे ऐकावे वाटते. कारण एकतर्फी भाषणबाजी करून निघून जाण्यात फायदा नाही. 

 

तुमचे पिता आणि आजी दहशतवादाचे बळी ठरले. तुमच्या दृष्टीने दहशतवाद काय आहे? आणि त्यावर उपाय काय आहे, असे तुम्हाला वाटते ? 
प्रियंका : दहशतवाद हिंसाचार आहे आणि ज्यांनी हिंसेचा अनुभव घेतला आहे, तेच हे समजू शकतात. मी वडिलांइतके प्रेम कोणावरच करू शकत नाही. १९ वर्षांची असताना त्यांच्या देहाचे तुकडे घरी आणले. अशा स्वरूपाच्या हिंसाचारातून गेल्यानंतर तुमची हिंसेप्रती समज बदलते. आपल्या अनुभवावरून माणसाला हा धडा मिळतो की, हिंसेचे उत्तर फक्त अहिंसाच आहे. 

 

लाेकसभा निवडणुकीच्या फक्त ३ महिने आधीच तुम्ही अधिकृतपणे राजकारणात आलात. भाजपचा सामना करण्यासाठी उशीर तर नाही ना झाला? 
प्रियंका : उशीर झाला की नाही, हे तर काळच ठरवेल. ना तुम्ही याबाबत सांगू शकता, ना मी. माझ्या दृष्टीने जे काही होते ते योग्य वेळी होते. 

 

रॉबर्ट वढेरा यांच्याबाबत सरकारचे धोरण कसे वाटते? 
प्रियंका : माझे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर भाजप सरकारने राजकीय हल्ला केला आहे. तुम्ही लक्षात घ्या, हा हल्ला केव्हा वाढला? जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा. हेच तर भाजपचे चारित्र्य आहे. 

 

नरेंद्र मोदी जेव्हा राजीव गांधी किंवा नेहरूंबाबत बोलतात, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते? 
प्रियंका : नरेंद्र मोदीजींच्या बोलण्याने माझ्यात कसलेही भावतरंग उमटत नाहीत. कारण अमुक एका बाबीबाबत मोदी माझ्या वडिलांबाबत काय विचार करतात, यात मला रस नाही. माझ्या वडिलांची सचोटी मला माहिती आहे. देशाला माहिती आहे. 

 

राहुल आणि प्रियंका यांच्या व्यक्तिमत्त्वात फरक आणि समानता काय आहेत? लोकांना वाटते, प्रियंका कडक, तर राहुल नरम स्वभावाचे आहेत... 
प्रियंका : राहुलजी दूरदृष्टीचे आहेत. मी कधी कधी क्षणिक भावनांत अडकते. ते धैर्यवान आहेत. त्यांना राग कमी येतो. ते द्वेषाचे उत्तर प्रेमाने देतात. मी कधी कधी रागाचे उत्तर क्रोधित होऊन देते. 

 

पंतप्रधान म्हणून नरेंद्र माेदी यांच्याकडे तुम्ही कसे पाहता? त्यांच्यात सर्वात चांगल्या व वाईट गाेष्टी काय आहेत असे तुम्हाला वाटते? 
प्रियंका : भल्या- बुऱ्याचा विषय नाहीच. एखाद्या नेत्याचा अहंकार जेव्हा इतका वाढताे तेव्हा ताे सत्ता राखण्यासाठी काेणत्याही पातळीवर जाऊ शकताे. मग ताे संपत्तीचा गैरवापर करणे असाे, खाेटा प्रचार असाे की धर्माचा गैरवापर असाे. की राष्ट्रवाद किंवा शहिदांच्या नावाचा वापर... त्याला काहीच मर्यादा राहत नाही. जनता व देशाच्या प्रती नेत्यांची काही जबाबदारी असते. सत्य हीच सर्वात माेठी जबाबदारी असते. मात्र, सत्याच्या मार्गावरून एखादा नेता भरकटला तर देशाचे नुकसानच हाेते. 

 

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही तेथील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असाल का? 
प्रियंका : २०२२ पर्यंत पक्ष संघटना मजबूत करून प्रतिस्पर्ध्यांसमाेर आव्हान निर्माण करणे हेच माझे लक्ष्य आहे. पुढे बघू काय हाेईल ते. 

 

राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्षही आहेत आणि तुमचे माेठे भाऊही. त्यांच्यातील काेणते गुण अजून तरी देशातील जनतेपर्यंत पाेहाेचलेले नाहीत? 
प्रियंका : राहुल यांच्याविराेधात जितका अपप्रचार झाला त्या तुलनेत त्यांचे व्यक्तिमत्त्व देशासमाेर अजूनपर्यंत तरी आलेले नाही. राहुल यांच्यात खूप विवेक आहे. त्यांना धर्म, देशाबाबत सखाेल माहिती आहे. देशात काेणत्या शक्ती कशा प्रकारे काम करत आहेत, हेही ते बारकाईने जाणून आहेत. मी जेव्हा राहुल यांच्याकडे जाते, तेव्हा मला माहीत असते ते जे काही सांगतील ते खरेच सांगतील. अनेकदा हे कटू सत्य असते. मी नाराजही हाेते. मात्र, त्यांचे म्हणणे खरे असल्याचे मला उशिरा का हाेईना पटते, ते माझ्या भल्यासाठीच काही गाेष्टी सांगत असतात. ते जसे माझे ज्येष्ठ बंधू आहेत तसे मार्गदर्शकही आहेत. राहुलजी मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्टधारक आहेत. त्यांनी गिर्याराेहणाचा काेर्स केला आहे, ते अधिकृत 'पाणबुडे'ही आहेत. स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षक आहेत. आॅक्सिजनशिवाय ते ७५ मीटर खाेलीपर्यंत पाण्यात जाऊ शकतात. ते वैमानिकही आहेत. विद्यापीठस्तरीय संघात त्यांनी फुटबाॅलही खेळला आहे. ते निडर आहेत. जेव्हा त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले हाेते, तेव्हा इतर लाेक घाबरले हाेते, मात्र राहुल यांनी काॅकपिटमध्ये जाऊन वैमानिकाला मदत केली. फारच कमी लाेक जाणतात की, राहुलजी यांनी उपनिषद, गीता, हिंदू धर्म, बाैद्ध व जैन, शीख, इस्लाम, सुफी व पाश्चिमात्य धर्मांचा सखाेल अभ्यास केला आहे आणि अजूनही या धर्मांविषयी माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. 

 

नोटाबंदी, बेरोजगारी व कृषी संकटांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसकडे काय राेडमॅप आहे? 
प्रियंका : काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी, महिला व युवकांसाठीच्या याेजनांवर भर दिला आहे. नाेटाबंदीमुळे एका वर्षात एक काेटी लोकांचे राेजगार गमावले. महिलांच्या बचतीवर गंडांतर आले. ५ वर्षांत भाजपने जनतेला वाऱ्यावर साेडून उद्याेगपतींचा फायदा करून दिला. उत्तर प्रदेशात एकीकडे शेतकरी शेतीमालाच्या याेग्य किमतीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे माेकाट जनावरांमुळे त्रस्त आहेत. दिवस- रात्र त्यांना शेतात पिकांची राखण करावी लागते. गरीब व शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी काँग्रेसने जाहीरनाम्यात अनेक याेजना आणल्या आहेत. त्यापैकी 'न्याय' (किमान उत्पन्न याेजना) ही सर्वात महत्त्वाची. काँग्रेसने 'न्याय'द्वारे गरीब कुटुंबांतील महिलांना वार्षिक ७२ हजार रुपये देण्याचा शब्द दिला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन पुन्हा सुरू हाेऊ शकेल. गरिबांचा जाे पैसा आेरबाडून घेतला ताे त्यांना परत करता येईल. क्रयशक्ती वाढल्यास अर्थव्यवस्थेला जीवदान मिळेल आणि या याेजनेसाठी टॅक्सही नसेल. 

 

माेदी सरकारच्या काळात निर्णय झालेल्या जीएसटीचा काय परिणाम झाला. त्यावर तुम्ही काय करणार? 
प्रियंका : छाेटे व्यापारी त्रस्त झालेत. जीएसटीचा हिशेब इतका जटिल आहे की त्यासाठी अकाउंटंट ठेवावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. कधी कधी तर या अकाउंटंटची फी छाेट्या व्यापाऱ्यांच्या नफ्याहून अधिक असते. ई-वे बिलचे प्रकरणही असेच आहे. अनेक व्यापारी त्यामुळे त्रस्त आहेत. काहींच्या तर अशाही तक्रारी आहेत की, यामुळे दुकाने बंद करण्याची वेळ आलीय. 

 

मायावती व अखिलेश यादव यांच्याशी उत्तर प्रदेशात निवडणुकीपूर्वी तुमची आघाडी झाली नाही. आता मतदानानंतर त्यांच्याशी हातमिळवणी करणार का? 
प्रियंका : या विषयीचा निर्णय तर आमचे राष्ट्रीय नेतेच घेऊ शकतील. 

 

प्रश्न : तुम्ही उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार आहात काय? 
काँग्रेस किंवा संयुक्त पुराेगामी आघाडीचे सरकार आता देशात सत्तारूढ हाेईल, असे वाटते का? 
प्रियंका : मी जिथे जिथे जाते तिथे तिथे मला लाेक त्रस्त दिसतात. भाजपला हे लाेक कंटाळले आहेत. भाजप सत्तेतून पायउतार हाेईल, यात शंकाच नाही. आता राहिला प्रश्न सरकारचा, जसे राहुलजी म्हणतात, जनताच आमची मालक आहे. जनता जाे काैल देईल त्याचा आम्ही स्वीकार करू.