आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi State Editor Sanjay Avate's Special Article On Mahajanadesh Yatra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाजनादेश यात्रेवर निघालेल्यांना महात्म्याचा देश समजेल?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘मदारी’ सिनेमा आठवतोय? दोन-तीन वर्षांपूर्वी आलेला. इरफान खाननं आपल्या उत्कट अभिनयानं उंचीवर नेलेला.  निर्मल नावाचा एक साधासुधा माणूस. एकुलता एक मुलगा हेच त्याचं भावविश्व. त्याचा हा कोवळा पोरगा मरण पावतो. शहरातला एक पूल कोसळतो आणि त्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडतो. निर्मलचं बोट पकडणारा चिमुकला हात गळून पडतो. तो अपघात नसतो, घातपातही नसतो. सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीपणानं हे लेकरू जिवाला मुकतं. निर्मलचं आयुष्य उजाड होतं. आपली ‘पहचान’, आपली ‘जान’ सगळंच संपून गेलंय, असं त्याला वाटू लागतं. प्रशासनाच्या अनास्थेनं केलेला हा खून आहे. त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, असं त्याला मनापासून वाटतं. मग तो गृहमंत्र्यांच्या दहा वर्षांच्या मुलाचं अपहरण करतो. जी वेदना सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला येते, ती सत्ताधाऱ्यांनाही समजायला हवी, हा सिस्टिमनं केलेला खून आहे, म्हणून वेडापिसा झालेला इरफान, या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं एल्गार सुरू करतो. सिनेमा बघताना डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि त्याच वेळी कमालीचा संताप येतो. पण, वास्तव सिनेमापेक्षा अधिक भयावह आहे. आणि, ज्यांना जाब विचारायचा, ते अधिक बेजबाबदार आहेत. ही बेफिकिरी महाराष्ट्र सध्या अनुभवतो आहे.  एका भागात मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या भागात मात्र पाण्याचा टिपूसही नाही. अशा वेळी प्रशासनाचा खरा कस लागतो. मात्र, इथेच आपण कच खातो. कृष्णा नदीकाठी जे जलतांडव सुरू आहे, त्याला तोंड देताना आपली यंत्रणा पराभूत झाली. या महापुराची चित्रे जगभर पोहोचली. पण, एका चित्राने जगाची झोप उडाली. आजीच्या कुशीतली नात. एकमेकींना बिलगलेल्या या मृतदेहांनी माध्यमांनाही पाझर फुटला. पण, मुळात हा अपघात नव्हता वा आपत्तीही नव्हती. ब्रह्मनाळला महापुराचा तडाखा बसला, तिथं बोटीची आवश्यकता होती. मात्र, बोट मिळाली नाही. एकाच बोटीत खूप गावकरी बसले आणि व्हायचे तेच झाले.  कृष्णा ही भारतातील चौथ्या क्रमांकाची नदी! गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रेनंतर सगळ्यात विस्तीर्ण पात्र असलेली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण या चार राज्यांना जीवन देणारी कृष्णा. सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात यंदा मुसळधार पाऊस कोसळला. प्रवाह सोडून कृष्णा मानवी वस्त्यांमध्ये घुसली. अनेक घरं, गावं तिनं पोटात घेतली. आता महापुराचा विळखा थोडा कमी झाला असेलही; पण जे नुकसान झालं आहे, ते प्रचंड आहे.  ही आपत्ती नैसर्गिक आहे. पण, ती तेवढीच नाही. हे सगळे घडत होते, तेव्हा मुख्यमंत्री प्रचारयात्रेत होते. ही यात्रा एक ऑगस्टला सुरू झाली. आणि, त्याच सुमारास सांगली, कोल्हापूर, सातारा या परिसरातील स्थिती बिकट होऊ लागली. परिस्थिती बिघडत गेली, मात्र तरीही मुख्यमंत्र्यांनी आपला प्रचार दौरा सुरूच ठेवला. वेळीच अलर्टही घोषित केला गेला नाही. त्यामुळे स्थानिकांनाही परिस्थितीचे गांभीर्य समजले नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या परीक्षेत आपण असे नापास होतो आणि त्याची किंमत चुकवावी लागते इथल्या सर्वसामान्य माणसाला. हे फक्त सांगली, कोल्हापुरातच घडते असे नाही. मुंबईसारख्या महानगरात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यानंतर मॅनहोलमध्ये एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा डॉक्टर वाहून जातो, याला काय म्हणणार? पुणे- नाशिकसारख्या प्रगत शहरांत पावसानंतर इमारती कोसळून कैक माणसं जिवाला मुकतात. पाऊस लहरी आहे हे खरे. पण व्यवस्थापन करणारेही लहरी आणि बेभरवशाचे असतील तर काय होणार? आपत्ती आल्यानंतर राज्यकर्त्यांनी संवेदनशीलतेने धावून गेले पाहिजे. हवाई पाहणीला टीव्हीवर दाखवून अथवा पूरग्रस्तांना मदत म्हणून दिलेल्या धान्यावर स्वतःचे फोटो डकवून आपण या आपत्तीवर मात नाही करू शकत! महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत असतानाच, सरकारी मदतीच्या मोजक्या नोटाही पूरग्रस्तांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. गांधीजी त्या नोटांवर असतीलही… पण भरलेल्या डोळ्यांनी आणि अनवाणी पायांनी दंगलीचा वणवा विझवणारे गांधीजी आपल्याला समजले तरी आहेत का!

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser