आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टनर इन क्राइम!

2 वर्षांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

अजित पवारांनी आज ‘पुन्हा’ उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर संकोचलेपणाची रेषही नव्हती. मी प्रत्यक्ष हा सारा सोहळा पाहत होतो आणि थक्क होत होतो! राज्यपाल त्यांना पुन्हा ‘भरदुपारी’ शपथ देत असताना, दोघांचे हस्तांदोलन एवढे घट्ट आणि निगरगट्ट होते, की सोहळ्याला उपस्थित असलेले चाहतेच काय ते संकोचले असतील! महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील हा (आणखी एक!) अभूतपूर्व प्रसंग होता. नव्या सरकारच्या चारित्र्यावरच शंका घ्यावी, असा हा प्रकार होता. हे भाकीत आधीच ज्यांनी केले होते, ते द्रष्टे ‘संजय’ मात्र आज शपथविधी सोहळ्यालाच हजर नव्हते, ही आणखी वेगळी स्टोरी. असो.  अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. सरकार खऱ्या अर्थाने आले. सरत्या वर्षाला निरोप देताना, राज्याला सरकार मिळाले. नव्या सरकारला शुभेच्छा आहेतच, पण एक ऐतिहासिक संधी तिन्ही पक्षांनी गमावली आहे. नव्या सरकारचा चेहरा यापेक्षा अधिक आश्वासक असू शकला असता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने चेहरा बदलण्याची ही संधी घेतली नाही. काँग्रेस आणि शिवसेनेने काही प्रमाणात घेतली, पण त्यातून हवा तो ‘मेसेज’ जाणार नाही.  अजित पवारांना ‘पुन्हा’ उपमुख्यमंत्री करून राष्ट्रवादीने आपली हतबलता चव्हाट्यावर मांडली. अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्री होत आहेत हे खरे, पण जेव्हा जेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचेही पुढे काय झाले, हे आपण पाहिले आहे. उपमुख्यमंत्री पदाचे सिंहासन बळकावणाऱ्या अजित पवारांच्या भात्यात अशी कोणती अस्त्रे आहेत, ते माहीत नाही. मात्र, अजित पवारांकडे गृहमंत्रिपद वा तत्सम महत्त्वाचे खाते असणार नाही, एवढीच काय ती त्यांना शिक्षा!   मुख्यमंत्रिपद पूर्ण काळ शिवसेनेला देऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने त्या बदल्यात सर्वाधिक मंत्रिपदे मिळवली आहेत. शरद पवार यांनी आपली ही भूमिका ‘दिव्य मराठी’शी बोलताना यापूर्वीच स्पष्ट केली होती. काँग्रेससोबत आघाडी असतानाही शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी कधीही केली नव्हती. २००४ मध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसहून अधिक होत्या, तरीही पवारांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला नव्हता. एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात अधिक मंत्रिपदे मिळत असतील तर पक्षाच्या वाढीसाठी ते अधिक महत्त्वाचे आहे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. (तशी नसती तर अजित पवार अडीच वर्षांसाठी का असेना, कधीच मुख्यमंत्री झाले असते. आणि, अजित पवारांचा काकांविषयीचा आक्षेप हाही आहे! अर्थात, ती आकांक्षा काही त्यांची पाठ सोडणार नाही.) शिवसेना सर्वात मोठा पक्ष असूनही अधिक मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. या सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असेल, असे दिसत आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाल्याने ठाकरे आणि पवार यांचे संबंध कसे राहातील, याविषयी आता उत्सुकता आहे. सेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे दोघेही सौम्य नेते आहेत, तसे अजित पवारांचे नाही. ते आक्रमक आहेत. खुद्द शरद पवारांनाही ते जुमानत नसल्याचे आणि पक्षसंघटनेवर त्यांचे नियंत्रण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यांचे, संजय बनसोडेंसारखे ‘पार्टनर इन क्राइम’ शपथ घेत असताना तर ते ठळकपणे जाणवत होते. या सरकारच्या भवितव्यासाठी हा मुद्दा निर्णायक ठरणार आहे.  आनंददायक असे की, हे मंत्रिमंडळ सर्वसमावेशक आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नव्हता. दूर कशाला, सत्ताधारी भाजपकडे एकही मुस्लिम आमदार नव्हता. या वेळी चित्र वेगळे आहे. चार मुस्लिम मंत्री नव्या सरकारमध्ये दिसणार आहेत. नव्या सरकारने अन्य समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी महिला आणि आदिवासींना मात्र पुरेसे स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार असल्याने रोहित पवार नकोत, हे शरद पवारांनी ठरवले, तसेच आदित्य यांच्याबाबत उद्धव यांनीही करायला हवे होते. (तिथे मात्र एका महिलेचा निर्णय महत्त्वाचा ठरला, असे म्हटले जाते!) बच्चू कडू नावाचा भिडू मंत्री होणे हे आनंदाचेच, पण राजू शेट्टी यांनी रागावून या शपथविधीकडे पाठ फिरवणे, हे सरकारचे सगळ्यात मोठे अपयश. मित्रपक्षांना आणि त्यातही राजू शेट्टींना दुखावणे हा अपराध आहे. नव्या सरकारला हे जेवढ्या लवकर समजेल, तेवढे बरे होईल! असो. सरकारवर शरद पवार यांचा ‘रिमोट कंट्रोल’ असेल, हे दिसत असले तरी खुद्द अजित पवार यांच्यावर तो चालेल का, हाही प्रश्न येत्या काळात तेवढाच महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

बातम्या आणखी आहेत...