आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi State Editor Sanjay Awate's Article On PM Narendra Modi

मोदी है तो नामुमकिन है!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भावनावश झालेले इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांना धीर देताना पंतप्रधान नरेंद्र माेदी.

१  सत्तरीतले मोदी रशियातील इकॉनॉमिक फोरमची बैठक आटोपून शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीत आले.  २ दिल्लीत दिवसभर महत्त्वाच्या बैठका घेत राहिले. ३ शुक्रवारी रात्रीच ते बंगळुरूमध्ये दाखल झाले.  ‘चांद्रयान-२’च्या यशोगाथेचे साक्षीदार होण्यासाठी पहाटेपर्यंत शास्त्रज्ञांसोबत थांबले.  हे मिशन अपयशी होणार हे काही त्यांना माहीत नव्हते, पण अपयशी झाले तेव्हा खास मोदीस्टाइल ‘उत्स्फूर्तपणे’ त्यांनी वैज्ञानिकांना धीर दिला. देशाला धीर दिला. ‘संपर्क टूटा, मगर संकल्प नहीं,’ असे सांगत ‘अपयश वगैरे काही नसते. असतात ते प्रयोग,’ या शैलीत जीवनविषयक तत्त्वज्ञानच त्यांनी मांडले. अप्रतिम ‘मोटिव्हेशनल’ भाषण केले. इस्रोच्या प्रमुखांना सांत्वनपर पोलादी मिठीत जखडवून अवघ्या देशाचे लक्ष चलाखीने स्वतःकडे ओढवून घेतले. ‘चांद्रयाना’च्या अपयशाचंही सेलिब्रेशन करून, सगळ्या नजरा आपल्याकडं वळवून घेण्यात मोदींना या वेळीही यश आले.   ४ शनिवारी पहाटेपर्यंत मिशनच्या ताणासह जागे असलेले मोदी सकाळी मुंबईत होते. तिथे गणरायांचे दर्शन घेत, मग तडाखेबंद भाषण ठोकत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि शिवसेनेला जाहीरपणे ‘धाकटा भाऊ’ करून टाकले. एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले. पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी जाहीर करतानाच तीन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन केले.  ५ दुपारी मोदी औरंगाबादेत होते. तिथे त्यांनी हजारो महिलांची मने जिंकणारे भाषण दिले. बचत गटांतील महिलांना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज जाहीर करत, घरा-घरापर्यंत पाणी पोहोचेल, असे सांगत आश्वस्त केले. औरंगाबादेतील ‘ऑरिक सिटी’चे उद्घाटन केले.  हवामानाचा अंदाज पावसाचा होता, नाहीतर नागपुरात त्यांचा असाच चमकदार ‘परफॉर्मन्स’ पाहायला मिळाला असता!  कुठल्या तरी प्रसंगी मोदी थकलेले, वाकलेले जाणवले?

विरोधी मंडळींना हे सांगायला हवे : मोदींच्या विरोधातील तुमचे सगळे मुद्दे खरे असतीलही, पण फेसबुकवर मोदींच्या नावाने दर दोन मिनिटांनी पोस्ट टाकून, व्हॉट्सॲप ग्रुप्सवर लिंक टाकून काही होणार नाही. हे पूरक ‘गृहउद्योग’ ठरू शकतीलही, पण आधी मुळातून काही उभे करावे लागेल! त्यासाठी नवे शस्त्र विकसित करावे लागेल. तसे शास्त्र तयार करावे लागेल. त्या दिशेने व्यूहरचना विकसित करावी लागेल. हा लढा सामान्य नाही. तो इतक्या वरवर पाहून चालणार नाही.
 
विरोधी पक्षांबद्दल तर बोलायचेही कारण नाही. भाजप आणि शिवसेनेत ‘मेगाभरती’ सुरू असेल, तर विरोधी पक्षांमध्ये मेगामरगळ आहे. अगदी नाइलाजाने रिंगणात उतरणारे आणि जहाज सोडणाऱ्या उंदरांसारखे नेते बघितले की आपलीच बोलती बंद होते! आज ज्या नेत्यांनी सत्तेची सगळी स्पेस काबीज करून टाकली आहे, ते दीर्घकाळ विरोधी पक्षात होते. सत्ता कधी मिळू शकेल याची खात्री नसतानाही त्याच त्वेषाने लढत होते. अवघी एक टर्म सत्तेबाहेर राहिल्यानंतर खोल गर्तेत गेलेले नेते पाहिले की भाजपमधील नेते अधिक कमिटेड भासू लागतात! काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोशल मीडियावर एवढं फालोइंग आहे. नवी मुलं-मुली मोठ्या आशेनं त्यांच्याकडे बघत आहेत. ॲकॅडॅमिशियन्स आणि अनेक लेखक, विचारवंत स्वतः विरोधी पक्षांची बाजू लावून धरू पाहताहेत. पण, काँग्रेसचा ‘उत्साह’ बघून त्यांनीच निराश व्हावे, असा प्रतिसाद काँग्रेसचा आहे. रस्त्यावर यावे, लोकांशी बोलावे, तरुणांना बळ द्यावे, सगळ्या प्रश्नांना भिडत इथल्या असंतोषाचे नायक व्हावे, असे यापैकी कोणाला वाटत नाही. बाहेर एवढी हतबलता आहे. बाजारात हताशा आहे. हातात रोजगार नाही. आहे ती नोकरी कधी जाईल याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांच्या घरात आनंद नाही. भारताचा मूळ आशय कायम राहणार का, याविषयी खात्री नाही. वेगळा सूर लावल्यानंतर तुमचे काय होईल, हे सांगता येत नाही. अशा वेळी या असंतोषाचे नायक व्हायचे की प्रस्थापित व्यवस्थेचे गायक, हे विरोधी पक्षांनी ठरवायला हवे होते. महाराष्ट्रात काय घडले? निम्म्याहून अधिक नेते पक्ष सोडून गेले. जे उरलेत त्यापैकी निम्म्यांना तिकडे घेतले गेले नाही म्हणून आहेत. राहिलेले दिवस काढताहेत. जे थोडेफार उत्साहाने करू पाहताहेत, तेच बावळट ठरावेत अशी परिस्थिती त्यांच्या गोटात आहे. किंमत चुकवायची, आहे ते उधळून देण्याची तयारी कोणाची नाही. त्यांच्यालेखी ‘राजकारण’ ही जीवननिष्ठा नाही. व्यवसाय आहे. करिअर फक्त आहे. काँग्रेससारख्या चळवळीतून पुढे आलेल्या विचारी पक्षाचे रूपांतर कशात झाले, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. राष्ट्रवादी तर सत्तेचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आली, त्यामुळे आज जे घडत आहे त्यात अनपेक्षित काही नाही.  

ज्यांनी पेटायला हवे ते विरोधक मरगळलेले आहेत. विरोधी पक्षांच्या कार्यालयात जा अथवा या नेत्यांच्या संपर्कात, तुम्हीच निराशेने ग्रासून जावे, अशी स्थिती आहे. याउलट, सत्ता मिळवल्यानंतरची सुस्ती सत्ताधाऱ्यांच्या आसपासही नाही!  

मोदींची एनर्जी बघा. 
त्यांचे हेतू, ध्येय, इरादे याविषयी मी वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यासाठी विरोध असू शकतो. असायला हवाही. 
पण, या असाधारण एनर्जीचं काय करणार?  पुणे - मुंबई प्रवासाच्या ताणानं आजारी पडणाऱ्या तरुणांना, दुपारी बारा वाजता उठून चहा ढोसणाऱ्यांना, निवृत्तीचा काळ मजेत जावा म्हणून अथवा सिरियल्सशिवाय किंवा महिला मंडळांशिवाय आणखी टाइमपास हवा म्हणून, लोकलमध्ये वेळ घालवण्यासाठी ‘मोदी- मोदी’ खेळणाऱ्यांना मोदींना विरोध करता येणार नाही. 


शास्त्रज्ञांसमोर मोदींनी जे भाषण केले, तसे २३ मे नंतर करू शकणारा कोणी आहे का विरोधकांकडे? असते तर विरोधकांवर ही वेळ आली नसती! 

मरगळ आणि फ्रस्ट्रेशनमधून येत असणारे ‘सोशल झटके’ म्हणजे तुमची ‘भूमिका’ आहे का?
इथंच तर एक उघडा निःसंग म्हातारा अवघ्या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उभा ठाकला होता. काहीही वाह्यात बडबड न करता! गांधी नावाचा हा वारसा जे सांगतात, मुद्दा आहे, तो त्यांच्याच पॅशन नि कमिटमेंटचा.
बेसिक ऊर्जा आणि झपाटलेपण, मूलभूत कृतिकार्यक्रम नसेल तर केवळ मोदीविरोधाने काही होणार नाही. विरोधकांना हे समजले नाही, तर मोदींना पराभूत करणे शक्य नाही. 

‘मोदी है तो नामुमकिन है,’ हाच मग विरोधकांसाठीचा मेसेज आहे.