आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी स्टिंग : औरंगाबाद शहरातील कारखान्यात तयार होतात बंदी असलेल्या थर्माकोलच्या पत्रावळी, बाऊल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘दंड घ्या, पण प्लास्टिकच्या कॅरीबॅग आम्हाला ठेवू द्या,’ असा आग्रह शहरातील फेरीवाले धरू लागले आहेत. कॅरीबॅग नसेल तर ग्राहक आमच्याकडून खरेदी करण्याऐवजी ज्या विक्रेत्याकडे कॅरीबॅग आहेत त्यांच्याकडून खरेदी करतात, अशी त्यांची तक्रार आहे. याचा अर्थच असा आहे की, मनपाकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात दुजाभाव होत असून त्यामुळेच शहर प्लास्टिकमुक्त होत नाही. मनपा एकीकडे काही विक्रेत्यांवर कारवाई करीत असली तरी आजही शहर परिसरात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या बंदी असलेल्या वस्तूंची (पत्रावळी, बाऊल) निर्मिती होत असून घाऊक प्रमाणात विक्रीही सुरू आहे. मनपाच्या  या ‘कारभारा’वर ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशन करून टाकलेला हा प्रकाश.…


शहरातून रोज संकलित कचऱ्यात आजही १० टक्के कचरा हा बंदी असलेल्या प्लास्टिकच्या स्वरूपातलाच आहे. हे प्रमाण कमी का होत नाही, असे विचारल्यावर मनपाचे अधिकारी आतापर्यंत तीन हजार जणांवर कारवाई केली. त्यात ३० ते ४० घाऊक विक्रेतेही असल्याचे सांगतात. अशी दंडात्मक कारवाई करून आपली जबाबदारी संपली असे मानणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र, शहर परिसरातच या वस्तूंचे उत्पादन होते हे माहितीच नसल्याचा दावा ते करतात. हाच बनाव उघडकीस आणण्यासाठी 'दिव्य मराठी' ने थेट उत्पादनाच्या ठिकाणी भेट देऊन स्टिंग ऑपरेशन केले. 

 

> स्टिंग ०१ : असे सुरू आहे उत्पादन
एमआयडीसीच्या चितेगाव परिसरात टोल नाक्याजवळ  बंदी असलेल्या थर्माकोलचे ताट आणि वाट्या बनविणारा एक कारखाना राजरोसपणे सुरू आहे. ‘दिव्य मराठी’ टीमने त्या कारखान्यात अचानक शिरकाव केला. त्यामुळे तेथील ८ ते १० कामगार आधी दचकले.  आम्ही या मालाचे घाऊक विक्रेते असून आम्हाला माल खरेदी करायचा आहे असे सांगितल्यामुळे ते बोलू लागले. त्या वेळी मालाचे पॅकिंग सुरू होते.  कच्च्या मालाचे  थर्माकोलचे मोठे रोल,  शीट्स पडलेले होते. मालकाचे नाव मुजीब असून दिवसा कारखाना बंद ठेवण्यात येतो. मालक इथेे फक्त रात्री येतात. तुम्हाला त्यांच्याशीच बोलावे लागेल, असे सांगत कामगारांनी दिव्य मराठी टीमला बाहेर काढून घाईघाईने तिथले सर्व गेट बंद केले.  

 

स्टिंग ०२ : सहज मिळतात कॅरीबॅग 
५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या कॅरीबॅगबाबत बाजारपेठेत किती गांभीर्य आहे, याबाबत पाहणी करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ टीमने शहागंज येथील बाजारातून वेगवेगळ्या  विक्रेत्यांकडून फळे खरेदी केली. तेव्हा विक्रेत्यांनी थेट ५० पेक्षा कमी मायक्रॉन असलेल्या कॅरीबॅगमध्ये फळे दिली.  शहरातील होलसेल मार्केटमध्ये या कॅरीबॅग फक्त १३० रुपये किलो मिळतात. 


अंगुरीबाग येथील एका दुकानातून ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने पुराव्यादाखल या कॅरीबॅगदेखील खरेदी केल्या. या व्यापाऱ्याने या कॅरीबॅग दुकानात ठेवल्या नव्हत्या. दिव्य मराठी टीमने  मागितल्यानंतर दुकानाच्या बाजूलाच बंद असलेल्या गोदामातून त्या काढून देण्यात आल्या. 

 

आधी, वाळूजमध्ये व्यवहार होईल मग शहरातून मिळतील पत्रावळी 
‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी आम्ही आताच थर्माकोलच्या पत्रावळी, द्रोण विकत घेतो असे सांगितले. मात्र, कामगारांनी त्यास नकार देत मालकाशी संपर्क साधण्यास सांगितले. मग मालकाला ‘आम्ही व्यापारीच आहोत. माल घेण्यासाठीच आलो आहोत’ असे म्हटल्यावर त्याने बाऊल (द्रोण) आणि पत्रावळीचे सॅम्पल दिले. ३१ रुपयांना १०० बाऊल, ९० रुपयांना १०० पत्रावळी असा भावही सांगितला तेवढ्यात मालकाचा मुलगा आला. व्यवहारासाठी  वाळूजच्या कारखान्यात जा. तेथे भाव ठरेल. त्या नंतर शहरात आम्ही तुम्हाला दुकानदाराचे नाव सांगू त्या दुकानातून तुम्हाला माल मिळेल, असे कामगारांनी सांगितले.

 

अशी कंपनी सापडली नाही
नियमबाह्य पत्रावळी आणि कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या ३ हजार लोकांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. त्यात ३० ते ३५ डीलर आहेत. याशिवाय शहरातील एका मोठ्या ट्रान्सपोर्टवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मनपा हद्दीत अशा प्रकारे पत्रावळी किंवा कॅरीबॅग तयार करणारी  कंपनी अजून सापडली नाही. 
- नंदकिशोर भोंबे, सहायक मनपा आयुक्त

 

कारखाना दिवसा बंद 
कोणाला शंका येवू नये म्हणून हा कारखाना दिवसा बंद असतो. रात्रीच्या वेळी हा माल बनवला जातो. दोन ते तीन एकरवर असलेल्या या कारखान्यात मोठे गोडाऊन आहे. ते पत्रावळी, बाऊलने खचाखच भरले आहे. येथून पंढरपूर, नगर, पुणे, औरंगाबाद, जालन्यासह इतर राज्यात देखील माल जातो, अशी माहिती कामगारांनी दिली. 

 

बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लास्टिक आवरणं या प्लास्टिकवर बंदी नाही 
हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांचे आवरणं इत्यादी. 

उत्पादनासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक आणि थर्माकोल प्लस्टिक पेन दुधाच्या पिशव्या (50 मायक्रॉनच्या वर) रेनकोट. 

अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणार प्लस्टिक. 

नर्सरीमध्ये वापरण्यात येणारं प्लास्टिक. 

टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणार थर्माकोल आणि प्लास्टिक 

 

या प्लास्टिकवर आहे बंदी 
चहा कप सरबत ग्लास थर्माकोल प्लेट सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल 

हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक (प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी) .

उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिक

 

 

 

बातम्या आणखी आहेत...