आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ता संपादक (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मराठवाडा’ असे प्रांतीय नाव असलेल्या नियतकालिकाचे संपादक असूनही समस्त मानव कल्याणाचीच भाषा बोलणारे आणि त्यासाठीच आयुष्यभर लेखणी झिजवणारे संपादक अनंत काशीनाथ भालेराव यांचा आज ९९ वा जन्मदिवस. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होतो आहे. नियतकालिक मोठे की त्याचा संपादक मोठा, या प्रश्नाला नि:संदिग्धपणे ‘संपादक मोठा’ असे उत्तर देता यावे, अशा काळात अनंतरावांनी पत्रकारिता केली.

 

मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी म्हणून अा.कृ. वाघमारे यांनी हे साप्ताहिक सुरू केले होते. त्यांनीच ते अत्यंत विश्वासाने अनंतरावांकडे सोपवले. त्यांचा हा विश्वास अनंतरावांनी केवळ सार्थ ठरवला असे नाही, तर वृत्तपत्र जगतात एक इतिहास घडवला. पत्रकार आणि संपादक होण्याआधी ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. शिक्षक होते. सभा गाजवणारे वक्ते होते. निवडणूक लढवणारे राजकारणी होते. एका राजकीय पक्षाचे पूर्णवेळ पदाधिकारी होते. या सर्वच भूमिका त्यांनी अत्यंत तल्लीनतेने बजावल्या. कारण त्यांच्या आत एक सच्चा कार्यकर्ता दडलेला होता. याच कार्यकर्त्याच्या समर्पण भावनेनेच त्यांनी पत्रकारिताही केली आणि म्हणून ते महाराष्ट्रातल्या श्रेष्ठ संपादकांपैकी एक ठरले. 


अनंतराव विचारांनी खरे समाजवादी. पण त्यांच्या विचारांवर पहिला पगडा होता तो साम्यवादाचा. खरे तर त्याहीआधी त्यांच्यावर संस्कार झाले ते भागवत धर्माचे. वडील अंतर्बाह्य वारकरी झालेले. त्यांच्या सहवासात गावोगाव फिरणे, कीर्तन ऐकणे, प्रवचन ऐकणे, वारी करणे यात अनंतरावांचे बालपणीचे दिवस गेलेले. एकेश्वरवादी अर्थात, विठ्ठलाशिवाय अन्य कोणत्याही देवदेवतांना न मानणाऱ्या वडिलांच्या संस्कारांमुळे अनंतरावांचा प्रवास ईश्वरवादाकडून निरीश्वरवादाकडे झाला असावा. त्या काळात तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या गाथा आणि अभंगांनी त्यांना मानवतावाद शिकवला. विठ्ठलाचे भक्त सर्व समान आहेत इथपासून वारकऱ्यातच विठ्ठल पाहण्यापर्यंतच्या वारकरी संप्रदायाच्या संस्कारांची मशागत झाल्यामुळेच असेल, ते चटकन साम्यवादाकडे आकर्षित झाले असावेत. पण संतांनी सांगितलेला साम्यवाद आणि ते ऐकत, वाचत असलेला साम्यवाद यातला फरक जसा त्यांना कळायला लागला तसे त्यांचे साम्यवादाचे आकर्षण कमी व्हायला लागले. पुढे तर ते समाजवादी बनले. समाजवादी पक्षाचे सदस्यत्वही त्यांनी पत्करले. मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर समाजाच्या विकासात प्रत्यक्ष योगदान देता यावे या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली. पण त्यात यश आले नाही. त्यानंतर मात्र त्यांना आग्रह होऊनही त्यांनी निवडणुकीत उभे राहायचे नाही हा निर्धार निग्रहाने पाळला. तो निर्धार करताना एका ध्येयनिष्ठ संपादकाची भूमिका त्यामागे होती. कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व घेऊन सक्रिय राजकारणात राहिलो तर आपल्याला स्वपक्षाच्या चुका दाखवायला मर्यादा येतील, ही त्यामागची त्यांची भूमिका होती.

 

त्यांचे एकेकाळचे सहकारी समाजवादी पक्षात होते. काँग्रेसमध्येही गेले होते. पण त्यामुळे त्या पक्षाच्या चुकांवर अग्रलेखांतून आसूड ओढताना त्यांची लेखणी कधीच कचरली नाही. सक्रिय राजकारणातून ते बाहेर पडले असले तरी त्यांच्यातला कार्यकर्ता अखेरपर्यंत जिवंत होता. त्यामुळेच केवळ अग्रलेखांतून शाब्दिक आसूड ओढण्यापर्यंत ते मर्यादित राहिले नाहीत तर आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष आंदोलनांमध्ये सहभागी होत राहिले. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. दैनिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखासाठी संपादक म्हणून त्यांना अब्रुनुकसानीच्या एका खटल्यात तीन महिन्यांची कैदेची शिक्षा झाली होती.

 

ती भोगून परत आल्यावर त्यांचे सत्कार होत होते. त्या वेळी ‘या तुरुंगवासाने नव्या भ्रमात अडकण्याचा प्रमाद आपण करणार नाही,’ असे स्वत:लाच आश्वस्त करणारा हा जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेला संपादक होता. विचारपूर्वक घेतलेल्या भूमिका त्यांनी आयुष्यात कधीच बदलल्या नाहीत. काही भूमिका समाजाला समजल्या नाहीत, पटल्या नाहीत त्या वेळी त्यांच्यावर जिव्हारी लागेल अशी टीकाही झाली. त्यामुळे ते व्यथित झाले, पण भूमिकेवर ठाम राहिले. संपादक म्हणून त्यांचे मोठेपण यात होते. राजकीय आणि सामाजिकच नव्हे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांमध्येही त्यांना तेवढीच गती होती. विकास म्हणजे केवळ भौतिक विकास नव्हे, तर सर्वांगीण प्रगती त्यांना अपेक्षित होती.

 

त्यामुळे कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यासाठी आवश्यक असलेली कलेविषयीची समज त्यांना होती हे विशेष. आता काळ बदलला आहे. माध्यमेही बदलली आहेत. पण म्हणून अनंतरावांनी राखलेले समाजभान सोडता येणार नाही. अनंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षात आजची पत्रकारिता या दृष्टीने भानावर असावी, एवढीच अपेक्षा.

बातम्या आणखी आहेत...