आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पाेरेट कंपन्यांना धडा! (अग्रलेख )

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक-सीईअाे बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्याने भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात संशयाचे एक नवे पीक आणले आहे. फ्लिपकार्ट कंपनीला विकत घेऊन ज्या अमेरिकन वाॅलमार्ट कंपनीने बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांना अब्जाधीश बनवून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली त्याच वाॅलमार्टने बिन्नी यांच्या प्रतिमेवर मोठा डाग असल्याचे दाखवून त्यांना कुप्रसिद्धी  देण्याचे काम केले आहे.

 

बन्सल यांनी राजीनामा दिला असला तरी त्या मागचे खरे कारण काय, असा प्रश्न भारतीय कंपनी विश्वात विचारला जाऊ लागला आहे. त्याला कारण आहे. स्वत: बिन्नी यांनी आपण असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे. ते स्वाभाविक असले तरी त्यांच्यावरच्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एका खासगी विधी सल्ला कंपनीनेदेखील बन्सल यांच्याविरोधात पुरावा नसल्याचे म्हटले आहे, असेही बिन्नी यांचा दावा आहे. वाॅलमार्टने मात्र खासगी कंपनीकडून केलेल्या चौकशीनंतर बन्सल यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. यात खरे काय आहे हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. बन्सल यांनी स्वत:च राजीनामा दिला की त्यांना द्यायला लावला हा मुद्दा अशा प्रकारच्या कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतरच्या व्यवहारांवर परिणाम करणारा ठरू शकतो.

 

बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्याने भारतीय कंपनी विश्वाबद्दल काही प्रश्नही निर्माण केले आहेत. बिन्नी यांनी राजीनाम्याच्या अनुषंगाने माध्यमांना एक पत्र ईमेलद्वारे पाठवले आहे. त्यात आपण माफी मागत असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. असाच एक ईमेल कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही गेला आहे. त्यात मात्र बन्सल यांचे माफी मागत असल्याचे वाक्य वगळण्यात आले आहे. त्यामुळे कोणता ईमेल खरा, हा प्रश्न विचारला जातो आहे. बन्सल यांच्या अधिकृत ईमेल आयडीहून कर्मचाऱ्यांना ईमेल गेला आहे.

 

त्यात त्यांनी माफीचा उल्लेख केला नसेल तर तो माध्यमांना पाठवलेल्या ईमेलमध्ये का केला? जर त्यांनी तो केला नसेल तर अन्य कोणी केला का? जर तो  नंतर कोणी केला असेल तर बन्सल यांना बदनाम करण्याचा आणि त्यांना कंपनी सोडायला लावण्याचा हा अमेरिकन कंपनीचा डाव आहे का, हेदेखील विचारले जाते आहे. # मी टू प्रकरणानंतर जगभर कॉर्पोरेट क्षेत्रात जे काही वादळ आले त्यात अमेरिकाच सर्वात जास्त बदनाम झाली आहे हे नक्की. त्यामुळेच या प्रकरणात शून्य सहनशीलता असे धोरण बहुतांश अमेरिकन आणि अन्य देशांतील कंपन्यांनीही स्वीकारले आहे. त्याचाच भाग म्हणून वाॅलमार्टने बन्सल यांना राजीनामा द्यायला सांगितले असू शकते. तसे असेल तर वाॅलमार्टच्या धोरणाचे कौतुकच करावे लागेल.

 

पण तसे नसेल आणि हा वाॅलमार्टचा व्यावहारिक आणि आर्थिक रणनीतीचा भाग असेल तर गंभीर बाब म्हणूनच याकडे पाहावे लागणार आहे. बिन्नी हे फ्लिपकार्टच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यामुळे वाॅलमार्टने फ्लिपकार्टबरोबर बिन्नी यांनाही स्वीकारले असेल. पण खर्च वाचवण्यात माहीर असलेली कंपनी म्हणून वाॅलमार्टची आंतरराष्ट्रीय बाजारात ख्याती आहे. कंपनीची ती संस्कृती फ्लिपकार्टच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही असह्य होऊ लागल्याच्या आणि त्यामुळे ते कंपनी सोडत असल्याच्या बातम्या येतच होत्या. त्यात आता बिन्नी यांची भर वेगळ्या मार्गाने पडली आहे.

 

वाॅलमार्टने त्यांना ठरवून घालवले, असे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे आणखी मोठ्या संख्येने जुने कर्मचारी कंपनी सोडायच्या मार्गावर आहेत. वाॅलमार्टला हेच हवे होते का? त्यासाठीच वाॅलमार्टने बन्सल यांना जायला भाग पाडले असेल का? हे भारतीय कंपनी विश्वात विचारले जात असलेले प्रश्न आहेत. म्हणूनच हा विषय भारतीय कंपन्यांच्या दृष्टीने चिंतेचा बनला आहे. यातले सत्य कितपत बाहेर येईल हे सांगता येत नाही. पण हा अनेक वर्षे चर्चेचा विषय बनून राहील हे नक्की.

 

यानिमित्ताने आणखी एक बाब नमूद केली पाहिजे. बिन्नी यांच्यावर ज्या महिलेने आरोप केल्याचे बोलले जाते त्या महिलेने कंपनी विकली जाईपर्यंत एक शब्दही काढला नाही, असे म्हणतात. हे त्या दोघांच्या सहमतीने चालणारे प्रकरण आहे, असे समजून फ्लिपकार्टनेही वाॅलमार्टला आधी काही सांगितले नव्हते. यालाच वाॅलमार्टच्या व्यवस्थापनाचा मोठा आक्षेप आहे. त्यामुळे हे व्यवस्थापन भारतीय कंपनीवर नाराज आहे, असे सांगण्यात येते. एकीकडे महिलेला देवीचे रूप मानून आणि संस्कृतीची भाषा करून भारतीय स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजतात. दुसरीकडे आतून मात्र त्यांची संस्कृती आणि वर्तणूक वेगळीच असते, असा विचार विदेशी कंपन्या या प्रकरणामुळे करू शकतात. वाॅलमार्टच्या मनातील तोच राग त्यांनी बिन्नी बन्सल यांना राजीनामा द्यायला लावून काढला असावा. तसे असेल तर भारतीय कंपन्यांसाठी हे प्रकरण आणि बिन्नी बन्सल ही एक मोठी ठेच आहे, असेच म्हटले पाहिजे आणि त्यातून त्यांनी शहाणे झाले पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...