Home | Editorial | Agralekh | divya marathi's article on karnataka By-election

कर्नाटकचा सांगावा! (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Nov 08, 2018, 06:30 AM IST

सुषमा स्वराज यांचा बालेकिल्ला मानली जाणारी बेल्लारी भाजपकडून हिसकावून घेत अाणि मांड्या मतदारसंघावर वर्चस्व

 • divya marathi's article on karnataka By-election

  भारतीय राजकारणास या दिवाळीने दाेन संदेश दिले अाहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशात ‘दीपाेत्सव अयाेध्या २०१८’च्या निमित्ताने भाजपने केलेली धूम, दुसरे कर्नाटकातील लाेकसभेच्या तीन, विधानसभेच्या दाेन जागांसाठीच्या पाेटनिवडणुकीत काँग्रेस-जद (नि) अाघाडीने ४-१ अशा फरकाने भाजपवर मिळवलेल्या विजयाचा जल्लाेष. एकीकडे धर्म अाणि राजकारणाचे भ्रामक एेक्य, दुसऱ्या बाजूला स्थिरतेचा संभ्रम निर्माण करणाऱ्या विराेधी पक्षांच्या अाघाडीची अाश्वासक एकता. एका अर्थाने भारतीय लाेकशाहीची ही दोन रूपे या दिवाळीने प्रकाशात आणली आहेत. सुषमा स्वराज यांचा बालेकिल्ला मानली जाणारी बेल्लारी भाजपकडून हिसकावून घेत अाणि मांड्या मतदारसंघावर वर्चस्व राखत काँग्रेस-जद (नि)ने राजकीय स्थैर्याचे आणि विरोधकांच्या ऐक्याचेही संकेत दिले आहेत.

  विराेधी पक्ष एकत्र अाले तर लाेकसभेच्या अागामी निवडणुकीत भाजपप्रणीत रालाेअासमाेर तगडे अाव्हान उभे करू शकतात, असा संदेश त्यातून बिहारपाठोपाठ पुन्हा एकदा मिळाला आहे. या पाेटनिवडणुकीत काँग्रेस-जद (नि) अाघाडीची ताकद, समन्वय, मतदारांवरील पकड यांचा प्रभाव पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री येदियुराप्पा यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागा त्यांचे पुत्र बी. एस. राघवेंद्र यांनी राखली हाच काय ताे भाजपला दिलासा ठरला.

  ‘पाेटनिवडणुकीतील विजय ही पहिली पायरी अाहे. अाता लाेकसभेच्या २८ जागा जिंकण्याचे अामचे उद्दिष्ट अाहे. हा विजय म्हणजे जनतेने अामच्यावर दाखवलेला विश्वास अाहे,’ हे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे विधान साधे-सरळ वाटत असले तरी त्यातील ध्वन्यार्थ खूप काही सांगून जाताे.


  केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत एनडीए सरकार स्थापन झाल्याच्या चार वर्षांत लाेकसभेच्या ३० जागांसाठी पाेटनिवडणुका झाल्या. त्यातील स्वपक्षाच्या १६ जागांपैकी अवघ्या ६ जागांवर भाजप झेंडा फडकवू शकला. अर्थातच २०१४ मध्ये लाेकसभेच्या २८२ जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपच्या हाती अाता २७२ जागा अाहेत. याचा अर्थ विद्यमान रालाेअा सरकारला धाेका नसला तरी भाजपची सद्दी अाेसरते अाहे असाच हाेताे. अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांत राजकीय समीकरणांची गाेळाबेरीज सुरू अाहे. त्यामुळे कर्नाटकातील निकालाकडे देशाचे लक्ष लागले हाेते. भाजपच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लावण्यात ही अाघाडी यशस्वी ठरली. परिणामी राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले अाहे. ज्या वेळी कर्नाटकात कुमारस्वामी आणि काँग्रेस एकत्र आले आणि भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांनी सरकार स्थापन केले त्या वेळी ही जनतेच्या इच्छेविरुद्धची युती आणि सरकार आहे असे भाजपकडून ओरडून सांगण्यात येत होते. जनतेने जद (नि) आणि काँग्रेस यापैकी कोणालाही बहुमत दिलेले नव्हते. त्यामुळे भाजपच्या त्या रुदनाला अर्थ आहे, असे सर्वसामान्यांना वाटतही होते. पण या पोटनिवडणुकीने भाजप नेत्यांची आणि प्रवक्त्यांची ती बोलतीही बंद केली आहे.

  कुमारस्वामींचा जनता दल आणि काँग्रेस यांची युती आम्हाला मान्य आहे, असेच कर्नाटकातील मतदारांनी आता स्पष्ट केले आहे. त्या अर्थाने या निकालांकडे पाहायला हवे. या निकालांचे श्रेय देताना ते काँग्रेस नेतृत्वापेक्षाही जदच्या कुमारस्वामींनाच अधिक द्यायला हवे. राजकीय गरज म्हणून काँग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्री तर केले, पण आघाडीचे हे सरकार चालवणे किती कठीण आहे याचा प्रत्यय कुमारस्वामींना लगेच यायला लागला. अगदी डोळ्यातून अश्रू गळेपर्यंतची वेळ या मुख्यमंत्र्यांवर आलेली साऱ्या देशाने पाहिली आहे. तरीही ही आघाडी टिकवून ठेवायची आणि पोटनिवडणुकीत यश खेचून आणायचे हे काम सोपे नव्हते. कुमारस्वामींना त्याचे श्रेय म्हणूनच निर्विवादपणे जाते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसाेबतच तेलंगण, मिझाेराममध्ये निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर शह-काटशहाचे डावपेच रंगले अाहेत. अशा स्थितीत कर्नाटकातून अालेला हा सांगावा काँग्रेस अाघाडीचे मनाेधैर्य उंचावणारा ठरेल हे निश्चित. हे संकेत लक्षात घेऊनच भाजपने तामिळनाडूत द्रमुकशी हातमिळवणी चालवली अाहे. केरळात सबरीमालाच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादाला खतपाणी घातले जात असले तरी लक्षणीय यश अावाक्याबाहेर दिसते. वायएसअार काँग्रेसशी अांध्र प्रदेशात, तर चंद्रशेखर राव यांच्याशी तेलंगणात सूत जमवण्यासाठी धडपड सुरू अाहे. बिजद भलेही भाजपला समर्थन देईल, परंतु माेदींवर कितपत विश्वास दाखवेल याची खात्री नाही. ममता बॅनर्जींकडून राजकीय रसद मिळण्याची शक्यताच नाही.

  अशा वातावरणात २०१४ मध्ये मिळवलेल्या २८२ जागा पुन्हा तेवढ्याच संख्येने भाजपच्या ताब्यात राहण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र, बिहार, अांध्र प्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, तेलंगण, कर्नाटकमध्ये प्रादेशिक पक्षांची नवी समीकरणे उदयास येत अाहेत. ती निर्णायक ठरणार अाहेत. कारण लाेकसभेच्या ३४३ जागा या राज्यात अाहेत. कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष बनूनही सरकार बनवता आले नाही तेव्हापासून माेदी, शहा यांच्या मनाजाेगते फारसे काही घडताना दिसत नाही. त्यात आता कर्नाटकातील निकालांची भर पडली आहे.

Trending