आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबातील खदखद (अग्रलेख )

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब तूर्त शांत असला तरी बंडखाेरीला पुन्हा हवा देण्याचे, खतपाणी घालण्याचे बाहेरून प्रयत्न हाेत अाहेत. यासंदर्भात वेळीच कारवाई केली नाही, तर फार उशीर झालेला असेल, असे संकेत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिले आहेत. त्यास फारसा कालावधी लाेटत नाही ताेच अमृतसर जवळील निरंकारी भवनात सत्संग सुरू असताना काश्मिरप्रमाणे ग्रेनेड हल्ला झाला. पंजाबमध्ये जी खदखद सुरू अाहे, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही त्याचीच ही परिणीती म्हणावी.

 

वस्तुत: देशभरात जी राजकीय खदखद, सामाजिक असंताेष दिसून येताे, त्याविषयी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करते किंवा नाही असा प्रश्न निर्माण हाेताे. पंजाबात दहशतवादाचे मूळ रुजवणाऱ्या १३ एप्रिल १९७८ च्या हल्ल्याच्या अाठवणी अमृतसरमधील हल्ल्याने ताज्या केल्या. निरंकारी भवनावरील हल्ला काेणी केला, याविषयी स्पष्टता नसली तरी ते दहशतवादी कारस्थान हाेते याचा इन्कार काेणीही केलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पंजाबात सामाजिक तणावाचा डाेंब उसळावा या हेतूनेच अागळीक केली जात अाहे. डेरा सच्चा साैदा, संघ, शिवसेना अाणि ख्रिश्चन संघटनांच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने हाेणारे हल्ले अाणि अाता सत्संग सुरू असतानाचा हल्ला या साऱ्या बाबी त्याच कटाचा भाग ठरतात.

 

गुप्तचर यंत्रणेसाेबत राज्यातील प्रशासन अधिक सक्रिय झाल्याने दहशतवाद धार्जिण्यांचे मनसुबे फळाला अाले नाहीत. गेल्या १८ महिन्यांत १५ दहशतवादी कारस्थानांचा झालेला बिमाेड हे त्याचेच यश ठरावे. निरंकारी भवनावरील हल्ल्यामागे काश्मिरी अाणि खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त हाेत अाहे. याचे मूळ तालिबानींना नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानवर येत असलेल्या दबावात दिसते.

 

म्हणूनच ८० च्या दशकातील निखळलेले दुवे जाेडत ‘अायएसअाय’ने ‘के २’ची माेहीम हाती घेतली. अर्थात काश्मिर साेबतच खलिस्तानी फुटीरवादाला बळ देण्यास सुरूवात केली. जेणेकरून भारतात अस्थिरता माजवणे साेयीचे ठरेल. ‘अाॅपरेशन ब्ल्यू स्टार’ नंतर पंजाबात शांतता प्रस्थापित झाली खरी, मात्र खलिस्तानवाद्यांच्या तसेच जरनैलसिंह भिंद्रांवालेंच्या तसबिरी लावणारे मूक प्रशंसक अाजही तेथे अाहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यात सार्वमत घेण्याच्या मागणीने जाेर धरला. त्यात बलजीतसिंह दाधूवालसारखी मंडळी सक्रीय सहभागी हाेती. ईशनिंदा कायद्याची मागणी देखील त्याच विचारसरणीचे द्याेतक ठरते. खलिस्तानी चळवळीचा बिमाेड हाेऊन बरीच वर्ष लाेटली असली तरी राखेतले काही निखारे जीवंत असून त्याचा भडका उडवण्याचे प्रयत्न हाेत अाहेत.


वस्तुत: अमेरिकी राजकारणामुळे दहशतवादाला बळ मिळाले. त्यासाठी पाकिस्तानचा पुरेपूर वापर केला गेला. पाकच्याच मध्यस्थीने अफगाणमधील कट्टरवाद्यांना अमेरिकेने रसद पुरविली, पाकमध्येच त्यांना प्रशिक्षण दिले जात हाेते. हे सगळे घडत असताना पंजाबात खलिस्तानवाद्यांनी जाेर धरला हा याेगायाेग नव्हता. अाता तर भारत-पाकमधील तणावाचा फायदा घेत पंजाबात अशांतता माजवण्याचा प्रयत्न हाेत अाहे अाणि ते भारताला परवडणारे नाही. पंजाब स्वतंत्र झाला तर स्वतंत्र काश्मिरची निर्मिती साेपी ठरेल अशी अटकळ बांधून खलिस्तानचे भूत पुन्हा बाटलीबाहेर काढले जात अाहे. हे भूत बाटलीबंद करण्यासाठी भारताला खूप माेठी किंमत माेजावी लागली हाेती, हे विसरून चालणार नाही. कारण, कोणत्याही माध्यमातून खलिस्तानवाद्यांना सक्रिय करण्याची कारस्थाने आयएसआय करू शकते.  हे निरंकारी भवनावरील हल्याने स्पष्टच झाले अाहे. या हल्ल्यामागे दहशतवादी पार्श्वभूमी अाहे. कारण हा हल्ला एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर समाजावर करण्यात अाला अाहे. म्हणूनच यापुढील काळात सामाजिक सलाेखा व शांतता टिकवणे, ती भंग करण्याची संधी दहशतवाद्यांना न देणे असे दुहेरी अाव्हान पंजाब समाेर अाहे. पाकिस्तान ही अनेक दहशतवादी संघटनांची जन्मभूमी असल्याचे भारत अनेक वर्षांपासून निरनिराळ्या अांतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पुराव्यानिशी सांगत आला आहे.

 

मात्र दहशतवादाने हाेरपळून निघाल्यानंतरही अमेरिकेसह बहुतेक राष्ट्रे या मुद्याकडे सहेतुक दुर्लक्ष करीत आली. म्हणूनच साऱ्या जगाला दहशतवादाने वेठीस धरले. स्वातंत्र्यानंतर फाळणीने पंजाबचे दोन तुकडे केले. विस्थापित नागरिकांच्या जखमा अजूनही भळभळत आहेत. त्यातूनही पंजाब उभा राहिला. इथल्या शेतकऱ्यांनी गव्हाचे विक्रमी उत्पादन करून हरितक्रांती यशस्वी केली. त्याच मातीत खलिस्तानवाद्यांनी आव्हान उभे केले. सारा पंजाब अतिरेकी कारवायांनी धगधगत राहिला. हा इतिहास विसरून चालणार नाही. कारण, देशात सध्या धार्मिक असहिष्णुता वाढते आहे; तिला बाह्यशक्तींकडून खतपाणी घातले जात अाहे. अशा वातावरणात पंजाबमधील सर्व राजकीय, सामाजिक संघटनांप्रमाणेच केंद्र सरकारला देखील अधिक सतर्क राहणे अपरिहार्य ठरते.

बातम्या आणखी आहेत...