आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफालचा संशयी तिढा (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सध्या रफाल कराराचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडत आहेत. देशातील विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसने या मुद्द्यावरून रान उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांच्यावर झालेल्या व्यवहारावरून दररोज टीकास्त्र सोडले जात आहे. या वेळी केल्या जात असलेल्या टीकेची पातळी हाही एक वादाचा मुद्दा आहेच. सरकारने मात्र यावर सावध पवित्रा घेतलेला आहे. एरवी विरोधकांनी आरोप केले की त्यांच्यावर तुटून पडणारी सत्ताधाऱ्यांची यंत्रणा या विषयावर मात्र संयमाने बोलत आहे.

 

प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. सरकारने आपले म्हणणे बंद लिफाफ्यात सादर केलेले आहे. विरोधकांना हे डील नेमके किती रुपयांत झाले हे अधिकृतरीत्या पाहिजे आहे. कारण त्या संदर्भातील मोठे आरोप करत विरोधकांनी रिलायन्स कंपनीला नियमबाह्यपणे मोठा फायदा करून दिल्याचा आणि त्यात सत्ताधाऱ्यांनी आपले भले करून घेतल्याचा आरोप केलेला आहे. न्यायालयात मात्र किमतीऐवजी करार करताना झालेल्या अनियमिततेच्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी होत आहे. दुसरीकडे आरोपांच्या फैरी मात्र सुरूच आहेत.

 

खरे काय आणि खोटे काय ते समोर येईलच, अशी भूमिका घेत सत्ताधारी केंद्र सरकार विरोधकांना या मुद्द्याव्यतिरिक्तच्या इतर मुद्द्यांवरून घेरत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करत आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी या करारासंदर्भात केलेल्या विधानानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. त्यात त्यांनी भारत सरकारच्या इच्छेमुळेच रफाल ही लढाऊ विमाने तयार करणारी कंपनी डॅसोने ऑफसेट भागीदारीच्या रूपात रिलायन्स डिफेन्सला निवडल्याचा थेट आरोप केला होता. ओलांद यांच्या या वादग्रस्त विधानानंतर भारत सरकारने लगेच उत्तर देत या सौद्यात सरकारची काहीच भूमिका नव्हती, असे स्पष्ट केले होते.

 

त्यानंतर विद्यमान राष्ट्रपती इमान्युएल मॅक्रोन यांनी स्पष्ट केले होते की, हा करार दोन सरकारांमध्ये ठरला होता. आमचे नियम स्पष्ट आहेत. नंतर डॅसो कंपनीने कागदपत्रांच्या हवाल्याने सांगितले होते की, कोणत्याही दबावाशिवाय आम्ही रिलायन्सची निवड केली. राष्ट्रीय आणि दोन देशांत या मुद्द्यावरून अशा प्रकारचा घटनाक्रम सुरू होता, मात्र देशातील वादविवाद संपायला तयार नाहीत. दरम्यान, रफालची निर्मिती करणाऱ्या डॅसो एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी नुकतेच स्पष्टीकरण देताना सगळ्या मुद्द्यांवर सखोल विवेचन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार जुन्या कराराच्या तुलनेत विमाने खरेदीच्या नव्या करारात रफालची किंमत ९ टक्क्यांनी स्वस्त आहे. रिलायन्सचा यातील वाटा लहान आहे. अनेक कंपन्यांची चर्चा सुरू आहे. राहुल गांधी हे यासंदर्भात खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. शिवाय त्यांच्या आरोपांमुळे खेद वाटल्याची टिप्पणी केली आहे. या करारासंदर्भाने सुरू असलेल्या वादावर कोणीही काहीही बोलले की कोण खरे आणि कोण खोटे यावर सध्या दोन मतप्रवाह पाहायला मिळतात.

 

पण एरिक यांनी मी खोटे बोलत नाही हे स्पष्ट केले, मी सांगितले ते सत्य आहे, मी सीईओ सारख्या पदावर आहे, अशा पदावर असताना कोणी खोटे बोलू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. इतके सगळे असतानाही राहुल गांधी अजूनही आपल्या मतांवर ठाम आहेत. पिक्चर अजून बाकी आहे, अशा प्रकारचा फिल्मी डायलॉग मारून त्यांनी यासंदर्भात सुरू असलेल्या संशयाच्या वातावरणात आणखी तेल ओतले आहे, तर सीईओंचे स्पष्टीकरण हे सांगून करायला लावलेले आहे. त्यामुळे घोटाळा दाबला जाऊ शकत नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. 


मुळात देशाच्या रक्षणासाठीच्या संरक्षण क्षेत्रातील एका खरेदीवरून देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचे वातावरण तयार होणे हेच आपल्यासाठी दुर्दैव आहे. जगभरात भारतीय कंपन्या आणि त्यांच्या दाव्याबाबत दुमत असू शकते, पण विदेशी कंपन्या मात्र सगळ्या प्रकारे आपली विश्वासार्हता जपून आहेत, हे आजवर अनेक प्रकरणांत समोर आलेले आहे. त्यांच्याच देशाच्या माजी राष्ट्रपतीने आरोप केल्यानंतरही संबंधित कंपनीने आपली स्पष्ट भूमिका मांडली होती, तशीच आताही मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या माहितीवर विश्वास ठेवण्यास जागा आहे. यासंदर्भात होत असलेल्या आरोपानंतर साध्या आणि प्राथमिक गोष्टींवर सत्ताधारी केंद्र सरकारने वेळीच अधिकृत खुलासा करून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली असती तर एवढा संशयही बळावला नसता. तद्वतच काँग्रेसकडे एवढे तगडे कोणते पुरावे आहेत, ज्या आधारावर ते असे आरोप करत आहेत, हादेखील मोठा संशोधनाचा विषय आहे. रफालचा तिढा आणि संशय सगळेच वाढवत आहेत. खरे कोण हे कोण ठरवणार आणि खरा दोषी सापडला तर त्याचे काय करणार, हा प्रश्न मात्र तिढा संपला तरी कायमच राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...