Home | Editorial | Agralekh | Divya marathi's article on yogi adityanath

योगींची दणकेबाज दिवाळी (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Nov 07, 2018, 06:44 AM IST

मेडिकल कॉलेजचे नाव ‘दशरथ’ तर विमानतळाचे नाव ‘श्रीराम’ असावे अशी आपली इच्छा असल्याचे योगी म्हणाले.

 • Divya marathi's article on yogi adityanath

  नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर मंगळवारी उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत लक्षलक्ष दिव्यांच्या साक्षीने फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या ठेवण्याची घोषणा केली. अयोध्येत अद्ययावत विमानतळ व मेडिकल कॉलेजही उभे करण्याची त्यांनी घोषणा केली. मेडिकल कॉलेजचे नाव ‘दशरथ’ तर विमानतळाचे नाव ‘श्रीराम’ असावे अशी आपली इच्छा असल्याचे योगी म्हणाले.

  या कार्यक्रमात उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली नाही. कदाचित त्यांच्या दृष्टीने ते मुख्यमंत्री झाले म्हणजे ‘रामराज्य’च आले असावे. योगींकडून शरयू नदीच्या किनाऱ्यावर प्रभू रामाच्या १५२ मीटर उंचीच्या पुतळ्याची घोषणा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. कदाचित अशा पुतळ्याची घोषणा करण्यासाठी ते पुढचा मुहूर्त शोधण्याच्या तयारीत असावेत. गेल्या वर्षीही योगींनी अयोध्या ज्या शरयू नदीवर वसलेले आहे, तेथील घाट लक्षलक्ष दिव्यांनी उजळवले होते.

  या दिव्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची प्रतिमा वलयांकित केली होती. रामजन्मभूमी प्रकरणावरून जे वातावरण संघ परिवाराकडून शिस्तबद्धरीत्या पेटवले जात आहे, त्या राजकारणाची सूत्रे योगींच्या हाती दिली जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे. नाही तरी मोदींच्या चार वर्षांच्या कारभारात रामजन्मभूमीबाबत केंद्र सरकारने कोणतीच पावले उचलली नसल्याने संघ परिवार नाराज असल्याचे दाखवले जाते आहे. त्या माध्यमातून मोदींनी रामजन्मभूमीचा कायदा संसदेत आणावा, असा संघ परिवाराचा प्रयत्न आहे.त्या माध्यामातून २०१९ची लोकसभा निवडणूक मोदींऐवजी धर्माच्या नावावर लढवली जावी, याची खबरदारी संघ परिवार घेतो आहे.

  योगींना त्यासाठी जोरकसपणे पुढे आणले जाते आहे. रामजन्मभूमीचे राजकारण हे धुव्रीकरण करणारे आहे हे जगजाहीर आहे. पण आपले कोणतेही राजकारण भव्यदिव्य प्रमाणात, कॉर्पोरेट स्टाइलने करण्याची भाजपची ख्याती आहे. त्यामुळे अयोध्येतील दिवाळीला आंतरराष्ट्रीय सद्भावनेचे रूप देण्याची एक नामी युक्ती रचली गेली. या युक्तीनुसार दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या पत्नीलाच उत्तर प्रदेश सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले.

  दक्षिण कोरियाचा रामजन्मभूमीशी काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. पण सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अयोध्येची राजपुत्री सुरीरत्न हिने कोरियाचा राजा किम सुरो याच्याशी विवाह केला होता. हीच राजपुत्री पुढे हूर व्हँग ओक म्हणून कोरियाची राणी झाली. या कथेचा आधार घेत योगींनी अयोध्येच्या दिवाळीला एक आगळा साज आणला.


  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत ढकलण्याचा निर्णय दिल्याने अनेकांचा समज झाला की भाजप, संघ परिवाराला दणका बसला. न्यायालयाने या विषयातील गुंतागुंत पाहून सुनावणी पुढे ढकलली असेल, पण या निर्णयामुळे रामजन्मभूमी विषय देशाच्या राजकीय पटलावर आणण्याची एक नामी संधी व वेळ भाजप-संघ परिवाराला मिळाला हे निश्चित. आता संसदेत रामजन्मभूमीचा कायदा होणे तसे कठीण आहे कारण त्यासाठी दोन्ही सभागृहांत या कायद्याला मंजुरी घ्यावी लागेल.

  रामजन्मभूमीला विरोध करण्याची विरोधी पक्षांना हिंमत होणार नाही आणि झाली तर त्यांना हिंदू विरोधी ठरविण्याचीही मोठी संधी मिळेल असे भाजपचे राजकारण आहे. एकदा का काँग्रेसपासून सर्व विरोधी पक्षांना हिंदूविरोधी ठरवले गेले की निवडणुकीपूर्वी मंदिरासाठी वटहुकूम आणायचा, अशी खेळीही भाजप खेळू शकते. या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. तसे झाले तर भाजप आणि संघासाठी आणखीनच चांगले. निवडणुकीचा संपूर्ण प्रचार रामजन्मभूमीभोवती आपोआप केंद्रीत होईल. याच काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन भाजपशासित राज्यांत विधानसभा निवडणुका होत असल्याने तेथे भाजपला दणके बसतील, असे काही जनमत चाचण्या सांगत आहेत. त्याचे प्रत्यंतर कर्नाटकातील निकालांनी आणून दिले आहेच. या पिछाडीचे संकेत मिळाल्यामुळेच भाजपने रामजन्मभूमीचे कार्ड बाहेर काढले आहे. कारण मोदी कार्ड चालत नाही, असेच संकेत त्यातून मिळाले आहेत. योगींनी अयोध्येत एवढ्या धूमधडाक्यात दिवाळी करून त्यात मोदींना आमंत्रित केले नव्हते, याचा दुसरा अर्थ काय असू शकतो? रामजन्मभूमी या देशातील
  प्रत्येक हिंदूच्या हृदयातला विषय आहे.

  या विषयाने एकदा भाजपला सत्ता स्थानापर्यंत पोहोचवलेच होते. त्यामुळे पुन्हा तोच प्रयोग करायचा, असे हे सुत्र आहे. ज्यांना मोदींचे विकासाचे राजकारण भावले त्यांना मोदींनी आकर्षित करावे आणि ज्यांना रामजन्मभूमीच्या नावाने एकत्र करता येईल त्यांना पूर्ण धार्मिक चेहरा असलेल्या योगींनी भाजपकडे खेचून आणावे, अशी ही भाजप आणि संघ परिवाराची निवडणूक रणनीती दिसते आहे. ती किती यशस्वी होते, हे कळायला आता फार वाट पाहावी लागणार नाही.

Trending