आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-रोहितदरम्यान वादाची कारणे काय?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीतील पराभवापासून या दोघांमधील कथित वादाची ठिणगी पडली. एका ठिणगीला प्रसिद्धी माध्यमांनी वणव्याचे स्वरूप दिले. वादाचे मूळ रोहित शर्माचे पत्नी व मुलीसोबत असलेले वास्तव्य हे होते. बीसीसीआयने विश्वचषक स्पर्धेसाठी दोन आठवड्यांनंतर पत्नी किंवा मैत्रिणींना खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी दिली होती. 


रोहित शर्माने मात्र आपली मुलगी लहान असल्याने तिला एकटीला सोडून पत्नीला इंग्लंडमध्ये येता येणार नाही, त्यामुळे आपल्यासोबत प्रारंभापासून या दोघी राहण्याची परवानगी मागितली होती. रोहितने आपल्या कुटुंबीयांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्थादेखील केली होती. तरीही रोहितला प्रारंभापासून पत्नीसोबत असल्याबाबत जाब विचारण्यात आला. 


या गोष्टीचे कर्ते करविते कोण होते? संघ व्यवस्थापनाकडेच याबाबतीत अंगुलिनिर्देश होत आहे. कारण संघ व्यवस्थापन म्हणजे फक्त कप्तान-कोच असे सध्या समीकरण दिसत आहे. रोहितकडे संघाचे उपकप्तानपद आहे. मात्र, रोहितच्या मतांचा विश्वचषकादरम्यान आदर केला गेला नाही. त्यामुळे रोहित कुठे तरी  नाराज आहे, असे सूत्रांनी सांगितले. 


अजिंक्य रहाणेला ट्वेंटी-२० आणि त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून बाहेर काढायला रोहित-विराट एकत्र आले होते. आज मात्र या दोघांची गरज संपल्यानंतर पुन्हा एकदा आपापसामध्येच जुंपली आहे. कप्तान व उपकप्तानांचे मैदानावरील अनेक गोष्टींवरून खटकल्याचे विश्वचषकात स्पष्ट दिसत होते. भारताच्या सामन्यात नेहमी तीन कप्तान असायचे. कधी कोहली नेतृत्व करायचा, तर कधी कधी धोनी हातात सूत्रे घ्यायचा. गोलंदाजांना कधी कधी कानमंत्र देऊन विकेट काढून घेण्यात रोहित शर्मा अग्रेसर असायचा. मात्र, मैदानावरील ती कुरबुर आपले स्वरूप मोठे करू शकली नाही. मात्र, जेव्हा रोहितला पत्नीसोबत अधिक काळ वास्तव्य करू दिल्याचा जाब प्रशासकांनी विचारला, त्या वेळी कोहली-शास्त्री यांची सरशी किंवा प्रशासन व्यवस्थेवरील पकड दिसून आली. 


रोहितने स्वखर्चाने आपल्या पत्नीला व सासऱ्यांना वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले होते. तरीही त्याला जाब विचारण्यात आल्याबाबतही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खरं तर गेल्या आस्ट्रेलियातील दौऱ्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा राजरोसपणे दोन महिने एकत्र राहिले होते. त्या वेळी बीसीसीआय किंवा प्रशासकांनी जाब विचारला नाही. मग कप्तानासाठी वेगळा न्याय आणि उपकप्तानासाठी वेगळा न्याय असे का? अशीही सध्या चर्चा बीसीसीआयमध्ये सुरू आहे. 


विराटला नेहमी झुकते माप का दिले जाते? रवी शास्त्रीच पुन्हा व्यवस्थापक हवा म्हणून विराट का वकिली करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या अनुत्तरित आहेत. रोहित शर्माची पत्नी रितिका ही ‘कॉर्नरस्टोन’च्या जाहिरात कंपनीशी निगडित होती. त्या वेळी अशा वावड्या उठल्या होत्या की विराटच्या जाहिराती आता रोहितला मिळणाार. त्या वेळीही दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा होती. जाहिरातीच्या अर्थकारणाच्या राजकारणाची धग दोघांच्याही कथित वादाचे कारण आहे का? 


जाहिरातींवरून भारताच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये यापूर्वीही वाद झाले आहेत. त्या वादात भारताने अनेक कसोटी सामनेही गमावले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीतील भारताच्या अपयशापाठचे कारण या दोघांमधील वाद हे तर नाही ना? अशी शंका येण्याचे कारण म्हणजे, उपकप्तान असूनही विराट-शास्त्री यांनी रोहितच्या मतांना कधीच फारशी किंमत दिली नाही. संघ निवडीच्या वेळी किंवा अंतिम ११ खेळाडू निवडताना किंवा एखाद्या खेळाडूबाबतच्या विषयात रोहितच्या मतांचा आदर केला गेला नाही. रोहितचा स्वभाव असा आहे की, तो कोणत्याही बाबतीत स्वत:हून फारसे मतप्रदर्शन करत नाही. मात्र, विराटने चुका केल्यानंतर त्याला बोलणारेसुद्धा संघात कुणी नाही, विराटला जर कोणी खडे बोल ऐकवू शकतो तर तो फक्त रोहित शर्माच आहे. मात्र, आपल्या अधिकार कक्षेच्या चौकटीत राहून स्वत:च्या खेळावर अधिक लक्ष देणाऱ्या रोहितचा तो स्वभावही नाही. मग या वादाचे मोहोळ उठवले कुणी? 


याबाबतीत दोषारोप दोन्ही खेळाडूंच्या जाहिरात कंपन्या किंवा प्रतिनिधींचे काम पाहणाऱ्या कंपन्यांकडेही जातो. आपापल्या खेळाडूची प्रतिमा अधिक उंचावण्याच्या प्रयत्नात या एजन्सीच अनेकदा सीमारेषा ओलांडतात. आपल्या खेळाडूला मोठे करण्याच्या प्रयत्नात अनेक वादांनाही तोंड फोडतात. विराट-रोहित हा वाद त्यापैकीच एक प्रकार असल्याचे बोलले जाते. आपापल्या खेळाडूंचे वाजवीपेक्षा अधिक कौतुक करणाऱ्या आयपीएल फ्रँचायझी आणि खेळाडूंच्या ब्रँड्सच्या जाहिराती करणारी प्रसिद्धी यंत्रणादेखील या वादापाठी आहेत. छोट्या कुरबुरीचे रूपांतर महावादामध्ये करण्यात त्यांना आपल्या खेळाडूचा स्वार्थ दिसतो. मात्र, एका प्रयत्नात आपल्याच ब्रँड्सच्या जाहिराती करणाऱ्या खेळाडूंची प्रतिभा माहीत होते, हे या ‘पी. आर. एजन्सी’ विसरतात. 


ता.क. बीसीसीआयने पत्रकार परिषदेत विराट कोहली येणार असे जाहीर केल्यानंतरही काल रवी शास्त्री त्या वेळी हजर होते. ते संघासोबतही जात नाहीत. विराट कोहलीला रोहितबरोबरच्या वादाबाबत प्रश्न विचारल्यावर ते स्वत:हून उत्तरे देत होते. याचा अर्थ काय?