आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार : मी मोदींना सांगितले, आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार आहोत; मोदी म्हणाले, आमची ऑफर तर नाकारलीत; पण...

2 वर्षांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांच्या बंडासोबतही ही भेट जोडली गेली. या संदर्भात शरद पवारांनी प्रथमच खुलासा केला आहे. ‘मोदी आणि माझी भेट झाली, हे उघड आहे. शिवसेनेसोबत आम्ही सरकार स्थापन करत आहोत, असे मी माेदींना सांगितले. भाजपसोबत सरकार बनवावे, अशी ऑफर आम्ही आधीच नाकारली होती. आता आम्ही तिघे सरकार स्थापन करत आहोत, याची पूर्वकल्पना मोदींना दिली. त्यांनी सद्भावना व्यक्त केल्या,’ अशा शब्दांत पवारांनी त्या भेटीचे गूढ उलगडले. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले, भाजपसोबत जाण्याची आमच्या काही नेत्यांची भूमिका होती. तीनपेक्षा दोन पक्ष अधिक स्थिर सरकार देऊ शकतील. भाजप-सेनेचे जमत नाही, तर आपण भाजपसोबत जाऊ, अशी त्यांची भूमिका होती. केंद्रातही सत्ता असल्याने राज्यात फायदा हाेेईल, अशी त्यांची धारणा होती. मात्र, आम्ही वेगळा रस्ता निवडला. > प्रश्न : रिमोट कंट्रोल तुमचाच?

पवार - नाही. सरकारच्या कारभारात आणि प्रशासनात हस्तक्षेप करणार नाही. इतिहासाचा अभिमान असावाच, पण इतिहास घडवण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर आहे. ते समर्थपणे हे आव्हान पेलतील. > प्रश्न : देवेंद्र फडणवीसांविषयी?

पवार - नव्या पिढीच्या या नेत्याने अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या. पण, सत्तेचा दर्प कधीही असता कामा नये. जमिनीशी नाळ तुटता कामा नये. सत्तेचा दर्प वाईट, हे देवेंद्र आता तरी शिकतील. ते आत्मपरीक्षण करतील.  > प्रश्न : खातेवाटप कधी? 

पवार : मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, उपमुख्यमंत्री निवड या संदर्भात लवकरच निर्णय होईल आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. > अंधारातील शपथविधीचे पाऊल कोणी उचलले? 

शिवसेेनेसाेबत सत्ता स्थापन करत असल्याची पूर्वकल्पना पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेली असतानाही मग रातोरात शपथविधी उरकण्याचे पाऊल कोणी उचलले?  मोदी आणि शहा यांच्यातील सुप्त संघर्षाचा हा परिणाम आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.> प्रश्न : अजित पवारांचं काय करणार? 

पवार : अजित पवारांनी केलेले बंड मोडून काढले. त्यांची ती चूकच होती. पण, अजितच्या बलस्थानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी तराजू घेऊन बसतो आणि सगळ्यांना जोखतो. अजितने अडचणीतही टाकले हे खरे, पण त्याच्या जमेच्या बाजू अधिक आहेत. अजित आणि सुप्रिया वगैरे सत्तासंघर्षाचा मुद्दाच नाही. अजितला राज्यात रस आहे, तर सुप्रियाला संसदेच्या कामकाजात. आणि, संसदेत त्या स्वरूपाचे काम ती करत आहे. या वेळी राज्याच्या राजकारणात ती दिसली, कारण तो क्रायसिस होता. अशा संकटकाळी सगळे एकवटतात. त्यामध्ये तीही होती. त्यातून सर्वांच्या समोर ती प्रकर्षाने आली. 


> प्रश्न : हे सरकार चालेल क
ा? 

पवार - पाच वर्षे टिकेल. ‘उद्धव मुख्यमंत्री व्हायला अनुत्सुक होते. मी त्यांना म्हटले की बाळासाहेबांप्रमाणे आता मी तुम्हाला आदेश देतो. मग ते तयार झाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि चेहरा सर्वसमावेशक आहे. कोणीही सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्न नाही. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. या सरकारचे स्वागत महाराष्ट्राने केले आहे. पण, अभूतपूर्व स्वागत होते, तशाच अपेक्षाही असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान सरकारसमोर असेल. महाराष्ट्राने देशाला दिशा द्यावी, असेच काम करावे लागणार आहे. नव्या सरकारकडे जयंत पाटील यांच्यासारखे टेक्नोक्रॅट, शेतकरी, उद्योजक असणारे असे कर्तबगार मंत्री आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रासाठी भरीव काम करेल

> प्रश्नः शिवसेनेची भूमिका सर्वसमावेशक असेल? 
पवार - राज्याचा चेहरा आता बदलतोय. पूर्वी एकटे मुंबई बहुभाषिक होते. आता सगळी शहरे बहुभाषिक होत चालली आहेत. शिवसेनाही बदलत आहे. आजच्या शिवसेनेचा नवा चेहरा परप्रांतीयांना दिलासा देईल. (अशी अपेक्षा व्यक्त करत पवारांनी ‘भूमिपुत्र विरुद्ध आऊटसायडर’ असा संघर्ष सरकारने उभा करू नये, याचे अप्रत्यक्ष संकेतच दिले. अर्थात, सरकारच्या कोणत्याही निर्णयावर भाष्य करायचे टाळले)

> प्रश्न : मुख्यमंत्री आपला असावा, असा प्रयत्न राष्ट्रवादी का करत नाही? 

पवार - मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा करण्यापेक्षा कॅबिनेटच्या अधिक जागा मिळवणे मी नेहमीच जास्त महत्त्वाचे मानतो. कारण, त्यातून नव्या नेतृत्वाला संधी मिळते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, तेव्हाही आम्हाला मुख्यमंत्रीपद मागता आले असते. कारण, आमच्या जागा अधिक होत्या. पण, तेव्हा ते न मागण्याची दोन कारणे होती. एक तर, त्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले होते. आणि, दुसरे म्हणजे माझ्याकडे दमदार असे खूप तरुण होते. त्यांना नेतृत्वासाठी सिद्ध करायचे होते. म्हणून मुख्यमंत्री पद न घेता सर्वाधिक मंत्रिपदे आम्ही मिळवली. आताही प्रयत्न तोच आहे.

> प्रश्न : शिवसेनेला तुम्हीच भाजपपासून तोडलेत? 

पवार - शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी मी पुढाकार घेतला नाही. भाजप आणि शिवसेनेचे जमत नाही, हे समजल्यानंतरच, फक्त निवडणुका टाळण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. विरोधात बसण्याचाच कौल आम्हाला दिला आहे, असे मानत आम्ही निकाल मान्य केला होता. पण, परिस्थितीने वेगळे वळण घेतले. मग मात्र आम्ही ठरवलेल्या वाटेने ठामपणे गेलो. 

> प्रश्न : हा प्रयोग देशस्तरावर होईल? 

पवार - ते सोपे नाही. नवा पर्याय उभा राहू शकतो, हे या प्रयोगाने सिद्ध केले. मात्र, भाजपेतर विरोधी पक्षांची आघाडी करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न सध्या सुरू नाहीत आणि कोणीही तसे संपर्कात नाही.  मात्र काँग्रेस आणि त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष मिळून असा पर्याय देऊ शकतात. ताे पर्याय विश्वासार्ह असावा लागेल.  • अजितच्या जमेच्या बाजूही आहेत, मी सर्वांना तराजूत जोखतो
  • सुप्रियाला रस संसदेत, तर अजितला राज्यात
  • शिवसेनेच्या नव्या चेहऱ्यामुळे परप्रांतीयांना दिलासा मिळेल
  • आमच्या पक्षातील काही नेत्यांची भूमिका भाजपसोबत जाण्याची होती
  • सत्तेचा दर्प वाईट, हे देवेंद्र आता तरी शिकतील
  • जयंत पाटलांसारखे मंत्री हे या सरकारचे बलस्थान
  • माझ्या ‘आदेशा’मुळेच उद्धव मुख्यमंत्री!
  • खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनानंतरच
  • आता देशव्यापी नवा पर्याय मिळेल; पण विरोधकांची आघाडी सोपी नाही