आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंद्रसेन देशमुख
उस्मानाबाद - तुमच्या आवडत्या हॉटेल्समध्ये एखादा ठराविक पदार्थ कायम स्वादिष्ट लागत असेल आणि अन्य हॉटेल्समध्ये तो पदर्थ बेचव लागत असेल तर सावध व्हा!. कारण, तो स्वाद मूळ पदार्थाचा नसून अजिनोमोटोचा (टेस्टिंग पावडर) आहे. अनेक हॉटेल्समध्ये या घातक पावडरचा वापर अितप्रमाणात वाढला असून, हॉटेल्समधून ग्राहकांना एकप्रकारे स्लो पॉयझन दिले जात असल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून पुढे आली आहे. अजिननोमोटोमुळे सुरुवातीला डोकेदुखी, उलट्या, धाप लागणे, अशा त्रासानंतर मोठ्या आजाराला बळी पडावे लागण्याची शक्यता आहे.
चटकदार आणि चवदार पदार्थांवर ग्राहकांच्या उड्या पडतात. मात्र, अशा पदार्थांच्या सेवनानंतर आजाराचे प्रमाण वाढत असल्याची बाब समोर आल्यानंतर व काही डॉक्टरांनी तसे निरीक्षण नोंदवल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने उस्मानाबादेतील काही हॉटेल्सची पाहणी केली. यात बहुतांश हॉटेल्स, चायनीज सेटर, नाष्ट्याच्या हातगाड्यांवर अजिनोमोटोचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे समोर आले. या पावडरमध्ये चव वाढवणारा रासायनिक घटक असला तरी त्याचा अमर्याद वापर घातक आहे. ‘दिव्य मराठी’ने काही हॉटेल्सच्या किचनमध्ये जाऊन अजिनोमोटोचा वापर तसेच त्याच्या प्रमाणाची खात्री केली. तेथील आचारी मात्र, याच्या वापराबद्दल नि:शंक आहेत. याच्या वापराने काही फरक पडत नाही, असा त्यांचा दावा आहे. मात्र काही जण या पावडरचा वापर कटाक्षाने टाळतात. ग्राहकांचे बरे-वाईट झाल्यास त्याचे पाप कोण घेणार, त्यामुळे ही पावडर वापरायचीच नाही, अशी भावना एका हॉटेलचालकाने व्यक्त केली.
तरुणाईला भुरळ चटकमटक पदार्थांची
मांसाहरी पदार्थांसह चहा, पेढा, आइ्क्रीमध्ये वापर
अलीकडेच पुण्यातील काही चहाच्या हॉटेल्सवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने कारवाया केल्या. या चहामध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे चहाच्या विक्रीवर काहीकाळ परिणामही झाला. बेकरीमधील पेढा, बर्फी,आईस्क्रिमपासून बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये सर्रास त्याचा वापर केला जात आहे. सांबर, आमटीमध्येही अजिनाेमोटो वापरतात. बिर्याणी, अंडाकरी, चायनीज पदार्थ तसेच मटन-मासे, चिकन आदी भाज्यांमध्येही वापर केला जात असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आले. विशेष म्हणजे उस्मानाबाद येथील शिंगोली येथील एका हॉटेलमध्ये मटकी फ्रायमध्येही या पावडरचा वापर केल्याचे दिसून आले.
तांदूळ पावडरसारखा अजिनोमोटो कुठे मिळतो?
उस्मानाबादसारख्या छोट्या शहरातील किराणा दुकानांतून अजिनोमोटोची विक्री सुरू आहे. त्याच्या विक्रीवर बंदी नाही. बाजारात १२० रुपयांत एक किलो मिळणारा अजिनोमोटो हा तांदळासारखा दिसणारा पांढरा शुभ्र पदार्थ आहे. विशेष म्हणजे काही पॅकिंगवर आयएसओ मानांकन आहे. ऑनलाइन रेसिपीवरून घरात खाद्यपदार्थ बनवणाऱ्या काही कुटुंबातही अजिनाेमोटोचा वापर केला जात आहे.
अनभिज्ञता : वापराबाबत कोणतेही निकष नाहीत
अजिनोमोटो पावडरबद्दल ग्राहकांमध्ये कमालीची अनभिज्ञता आहे. अजिनोमोटोला मागणीमुळे मोठी बाजारपेठ आहे. प्राप्त माहितीनुसार जपानमध्ये अजिनोमोटोचे सर्वाधिक उत्पादन होते. वर्षाला सुमारे १ लाख ३९ हजार टन अजिनोमोटो तयार केला जातो. अमेरिकेसह ब्राझील, फ्रान्स आदी काही देशांतही त्याचे उत्पादन होते. भारतात दरवर्षी सुमारे ५ हजार टन अजिनोमोटोची आयात होते. विशेष म्हणजे भारतात या अजिनोमोटो तयार करण्याचे कच्चे मटेरिअल असूनही त्याचे उत्पादन होत नाही. त्याच्या वापरावर नियंत्रण नसले तरी त्याचा वापर किती प्रमाणात व्हावा, हे स्पष्ट करणारी यंत्रणाही नसल्याने एकप्रकारे शरीरात विष पेरण्याचे काम बिनभोभाटपणे सुरू आहे.
बंदी नाही, तक्रार आल्यास कारवाई
अजिनाेमोटोच्या वापरावर बंदी नाही. त्याविरुद्ध कारवाई करण्याचेही आदेश नाहीत. मात्र, त्यामुळे काही अपाय झाल्याची तक्रार आल्यास कारवाई केली जाऊ शकते. आमच्याकडे अशी तक्रार अद्याप आलेली नाही.
-रेणुका पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, उस्मानाबादसारख्या
मेंदूपेशीला मारक
अजिनोमोटोमध्ये मोनोसोडियम ग्लुटामिट घटक आहे. अजिनोमोटोची चव गुळचट असते. आजवरच्या संशोधनानुसार त्याच्या अितवापरामुळे शरीरावर तसेच मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. अस्थमा, डोकेदुखी, स्नायु दुखणे, शरीर बधीर होणे आदी प्रकार घडू शकतात.त्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा येतो तसेच ब्लड प्रेशर वाढते. हे मुलांसाठी धोकादायक असून, मेंदू पेशीलाही मारक ठरते.
-डॉ.तानाजी लाकाळ, फिजिशियन, उस्मानाबाद.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.