Home | Editorial | Agralekh | divyamarathi 19 March editorial

वर्णभेदाचे आव्हान

संपादकीय | Update - Mar 19, 2019, 09:30 AM IST

आधुनिक म्हटले जाणारे जग मात्र बुरसट अशा वंशवाद, इस्लामद्वेष व स्थलांतरितांवरच्या हल्ल्यांचा अनुभव घेत आहे.

  • divyamarathi 19 March editorial

    आधुनिक म्हटले जाणारे जग मात्र बुरसट अशा वंशवाद, इस्लामद्वेष व स्थलांतरितांवरच्या हल्ल्यांचा अनुभव घेत आहे. गेल्या वर्षी प्रख्यात इंग्रजी वृत्तवाहिनी सीएनएनने युरोपमध्ये एक सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणाचा विषय होता युरोपमध्ये वाढत असलेला ज्यू द्वेष. या सर्वेक्षणात ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, हंगेरी, पोलंड व स्वीडन या देशांतील सुमारे सात हजारांहून अधिक नागरिकांची ज्यू समाजाविषयी मते अजमावण्यात आली होती. या सर्वेक्षणात हजारहून अधिक युरोपीय नागरिकांनी युरोपच्या आर्थिक व व्यापारी क्षेत्रावर ज्यूंचा प्रभाव कमालीचा असल्याचे मत व्यक्त केले होते. तर चारपैकी एका नागरिकाने ज्यूंमुळे जगभरात संघर्ष व युद्धे होत असल्याचे मत दिले होते. काहींनी युरोपमधील मीडियावर ज्यूंचे वर्चस्व असून या समाजाचा राजकारणावरही प्रभाव असल्याचे मत व्यक्त केले होते. सीएनएनच्या सर्वेक्षणातून काही गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. एक म्हणजे युरोपमध्ये केवळ इस्लामविरोध(बहुतांश स्थलांतरित अरब देशातून आलेले असतात) नसून तेथे ज्यू समाजाविषयी तेवढाच द्वेष आहे आणि असा पराकोटीचा द्वेष करणारे स्वत:ला श्वेतवर्णीय वर्चस्ववादाचे समर्थक म्हणवून घेणारे आहेत. आणि दुसरी बाब म्हणजे श्वेतवर्णीय वर्चस्ववाद हा केवळ युरोप-अमेरिकेपुरता मर्यादित नसून तो जगभरही फैलावत जाणारा आहे.

    गेल्या शुक्रवारी न्यूझीलंडमध्ये एका गोऱ्या माथेफिरूने दोन मशिदीत घुसून ५० मुस्लिमांना ठार मारणे ही घटना श्वेतवर्णीय वर्चस्ववादाचे ढळढळीत उदाहरण आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत पीट्सबर्गमध्ये एका गोऱ्या माथेफिरूने ज्यूंच्या प्रार्थनास्थळात घुसून आठ भाविकांची हत्या केली होती. हा माथेफिरू कट्टर वंशवादी होता व त्याने सोशल मीडियात ज्यूंच्या विरोधात सातत्याने लिखाण केले होते. न्यूझीलंडमधील घटनेतील माथेफिरूही त्याच मानसिकतेचा होता. त्याचे मुस्लिमांवर हल्ला करण्यामागचे उद्दिष्ट साफ होते, तो मूळचा ऑस्ट्रेलियातला असला तरी त्याचा न्यूझीलंडमधील स्थलांतरितांवर राग होता. बाहेरून आलेले आपल्या हक्काच्या नोकऱ्या हिरावून घेतात, आपली स्वत:ची अस्मिता, संस्कृती प्रस्थापित करतात, त्याने आपल्या मूलभूत हक्कांवर आक्रमण होते, अशी त्याची भूमिका होती आणि तसे त्याने जाहीरही केले होते. त्याने स्वत: करत असलेल्या हत्याकांडाचे थेट प्रक्षेपण 'फेसबुक लाइव्ह'वर केले. असे कृत्य करून त्याला समाजात दहशत निर्माण करायची होती. आजपर्यंत जगाच्या राजकारणात दहशतवादाची सांगड फक्त इस्लामशी घातली जात होती, त्यांना न्यूझीलंडमधील नृशंस हत्याकांडाने पेचात पकडले आहे. न्यूझीलंडमधील घटना हे दहशतवादी कृत्य होते की ते वर्णवर्चस्ववादातून केलेले एखाद्या माथेफिरूचे कृत्य होते, यावर वादविवाद सुरू आहे. या वादाचे कधीही थेट उत्तर मिळणार नाही; पण येत्या काळात जगापुढे दहशतवाद नव्हे तर वर्णवर्चस्ववाद, बहुसंख्याकवाद मोठे व गंभीर संकट घेऊन येणार आहे, हे स्पष्टपणे दिसते.


    युरोप-अमेरिकेतील वर्णवर्चस्ववादाची लाट पसरत आहे हे न्यूझीलंडमधील घटनेवरून दिसते. युरोप-अमेरिकेत श्वेतवर्णीय वर्चस्ववादाला रोखण्यासाठी पर्याप्त कायदे असले तरी तेथील अंतर्गत राजकारण मात्र अशा वर्चस्ववादाला छुपा पाठिंबा देणारे आहे. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीमध्ये अनेक गौरवर्णीय गट मुस्लिम स्थलांतर व ज्यूंच्याविरोधात उभे असल्याने तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. हंगेरीमध्ये मुस्लिम लोकसंख्या केवळ एक टक्का असूनही त्या देशाचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान हे मुस्लिम स्थलांतरितांची संख्या वाढल्यास भविष्यात ते देशात बहुसंख्य होतील व सत्ता हाती घेतील, असे जाहीरपणे म्हणतात. ते हंगेरियन नागरिकांना लोकसंख्या वाढवण्याचेही आवाहन करत आहेत. दीड वर्षापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब जगतातील सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. अमेरिकेत मुस्लिम स्थलांतरितांमुळे स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि त्याने देशाची शांतता धोक्यात येते, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. जेव्हा सत्ताधारी बहुसंख्याकवाद किंवा वर्णवर्चस्ववादाच्या बाजूने उभे राहतात तेव्हा प्रश्न अधिक जटिल होत जातो. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या देशात एवढे मोठे हत्याकांड होऊनही न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी मुस्लिम स्थलांतरितांविरोधात जो द्वेष आहे त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. तो अत्यंत कौतुकास्पद आहे. 'न्यूझीलंड देश हा विविधता, करुणा व दया या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो. ही मूल्ये मानणाऱ्यांसाठी हा देश त्यांचे घर आहे,' असे त्यांचे विधान द्वेष, मत्सराच्या वातावरणात जगण्याची उमेद वाढवणारे आहे. त्यांनी या हल्ल्याचे राजकारण केले नाही की मतपेढी पाहिली नाही. उलट कोणत्याही धर्माचा माणूस असू दे, ज्याने आपला देश घर मानले, त्याला त्यांनी आपले मानले आहे. हेच देशाच्या प्रमुख नेत्याकडून अपेक्षित आहे.

Trending