आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील अराजक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मत्सर, विद्वेषाने केवळ शेजारच्याचे घर जळत नाही, तर त्याची धग लागून आपलेही घर जळते, हे दोन दिवसांपूर्वी उ. प्रदेशातील बुलंदशहरात गोहत्येच्या संशयावरून जमावाने सुबोध कुमार सिंह या इन्स्पेक्टरच्या केलेल्या हत्येवरून दिसून येते. हिंसक विचाराने प्रवृत्त झालेल्या झुंडशाहीपासून नि:शस्त्र निष्पापांना वाचवता येत नाही हे सिद्ध झालेले असताना त्याच झुंडशाहीचा मुकाबला करण्याची हिंमत आता सशस्त्र पोलिसांमध्येही राहिलेली नाही, हे दर्शवणारी ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. केंद्रात आणि राज्यात बहुमताने भाजपचे सरकार आल्याने हिंदुत्ववादी शक्तींमध्ये कायदा सुव्यवस्थेलाही न जुमानण्यापर्यंत आत्मविश्वास आला आहे. आम्ही गोहत्येवरून परधर्माच्या कोणावरही संशय घेऊ, त्याला त्याच्या घरात जाऊन ठार मारू, आमच्या धर्मरक्षणासाठीच्या पवित्र कार्यात आडवे येणाऱ्या कोणाचीही आम्ही गय करणार नाही, हे सांगणारी ही घटना आहे. हिंदुत्वाचा 'पोस्टर बॉय' अशी प्रतिमा असलेल्या उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आहे, पण हे महाशय देशामध्ये हिंदुत्वावर आधारित सकल रामराज्य आणण्याचे, मुस्लिमबहुल शहरांची नावे बदलण्याचे इतके पवित्र काम करत आहेत की, आपल्या घरातच झुंडशाहीने धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे व ितने घरही जाळून टाकले आहे याची कल्पना या महाशयांना नाही. नाही तर या देशात असा कोणता मुख्यमंत्री आहे जो दुसऱ्या राज्यात जाऊन तेथील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतो? भाजपला सत्ता दिली तर शहरांची नावे बदलण्याची आश्वासने देतो? रामभक्त हनुमानाची जात सांगत सुटतो? एक मात्र स्पष्ट समजून घेतले पाहिजे की, योगी आदित्यनाथ यांच्या धर्मांध राजकारणाला, त्यांच्या उत्तर प्रदेशाला या देशात वेगळा न्याय आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीवरून राजधर्म पाळण्यास सांगितले होते. तो राजधर्म मोदी पाळू शकले नाहीत. आज पंतप्रधानपदी मोदी आहेत, पण ते योगी अादित्यनाथांना उ. प्रदेशातल्या झुंडशाहीवरून चार शब्दही सुनावण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. 
झुंडशाही हा समाजात भय निर्माण करणारा एक दहशतवाद आहे आणि याची पाळेमुळे वेगाने वाढत आहेत याचा अंदाज घेऊन गेल्या जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने धर्माच्या नावाखाली जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्यांनी कायदा करावा, असे केंद्राला आदेश दिले होते. त्यात न्यायालयाने सरकारला आजपर्यंत जमावाकडून झालेल्या हत्यांसंबंधीचे अहवाल सादर करावेत, असेही सुनावले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्र व राज्याची असून नागरिक कायदा हातात घेऊ शकत नाहीत व सरकार हिंसाचाराची पाठराखण करू शकत नाही, असेही त्या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले होते. हे सगळे आदेश, न्यायालयांची निरीक्षणे केराच्या टोपलीत गेले असे समजायचे का? इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांनी देशाला नव्हे, तर जगाला सुन्न करणाऱ्या दादरीतील अखलाक प्रकरणाचा तपास केला होता. त्यांना झुंडशाहीचे स्वरूप नक्कीच ज्ञात असणार. एखादा मुरलेला पोलिस अधिकारी हिंसक जमावाशी थेट भिडतो तेव्हा त्याला जमावाचे मानसशास्त्र लक्षात आलेले असते. बुलंदशहरमध्ये मात्र परिस्थिती भिन्न होती आणि ती पोलिसांना चक्रावणारी होती. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी, तो पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा, लाठीमार केला, गोळीबाराच्या काही फैरी झाडल्या. त्याने परिस्थितीवर नियंत्रण येईल, असा अंदाज बांधत असताना जमावाकडे असलेल्या एका गावठी कट्ट्यातून सुबोध कुमार सिंह यांच्यावर गोळी झाडण्यात आली. त्यांना जमावाने प्रचंड मारहाण केली. सुबोध कुमार सिंह यांच्यासोबतचे पोलिस हिंसक जमावाला पाहून पळून गेले. उ. प्रदेशात पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना काही नव्या नाहीत, पण हल्लेखोर सापडतही नाहीत. २०१३ मध्ये प्रतापगडमध्ये डीएसपी झियाउल हक यांची जमावाने घेरून हत्या केली होती. २०१६मध्ये मथुरेचे एसपी मुकुल द्विवेदी यांचीही जमावाने हत्या केली. २०१७मध्ये योगी आदित्यनाथ सरकार सत्तेत आल्यापासून पोलिसांवर अनेक हल्ले झाले आहेत. एप्रिल २०१७मध्ये जमावाने सहारनपूर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या घरावर चाल केली होती. या एकाही घटनेतील मुख्य आरोपींना अटक झालेली नाही. कोणत्याही धार्मिक भावनेने प्रक्षुब्ध होणे, हातात शस्त्रास्त्र घेऊन झुंडशाहीने हल्ले करणे ही उ. प्रदेश राज्यातील एक समाजरीत झाली आहे. एका रानटी संस्कृतीला पसरण्याचा अवकाश तेथील राजकारणातून मिळत आहे. कालपर्यंत निष्पाप मरत होते, आज पोलिसच झुंडशाहीचे लक्ष्य झाले आहेत, भविष्यात लोकप्रतिनिधींनाही याची झळ पोहोचू शकते, ही भीती व्यक्त करणे हे सर्व पाहता गैर नाही. कारण उ. प्रदेशाने केव्हाच अराजकात प्रवेश केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...