आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाप्रेमी बाबासाहेब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ विचारवंत   चित्र, शिल्प, संगीत, साहित्य अशा सर्वच कला आज बाबासाहेबांना आपला अनन्य विषय मानतात. पण बाबासाहेबांनी या सर्वच कलांवर उत्कट प्रेम केले. कला नवनिर्मितीच करतात. या कलांवर प्रेम करून बाबासाहेब स्वत:तील युगनिर्माता जन्माला घालत होते. प्रत्येक माणसात कलेची आवड असतेच पण भारतात चातुर्वर्ण्याने लोकांच्या कलाभिरुचीचे अपहरणच केले आहे. पाश्चात्त्य जगाने असे केले नाही. चित्रकलेची त्यांना विशेष आवड होती. मडिलगेकरांकडून ते चित्रकला शिकले होते. चित्र काढताना ते देहभान विसरत असत. अजिंठ्यातील जनपदकल्याणी या काळ्या राणीचे चित्र त्यांना खूप आवडायचे. अविवाहित असतो तर हिच्याशीच लग्न केले असते असे ते एकदा गमतीने म्हणाले होते. आयुष्याच्या शेवटी त्यांनी त्यांना हवे तसे बुद्धाचे उघड्या डोळ्यांचे चित्र काढले होते. ‘लाइट ऑफ द वर्ल्ड’ असे त्याखाली लिहिले होते. शिल्पकलेचाही नाद त्यांना होता आणि मिलिंद महाविद्यालयाच्या पुढल्या बागेत बसवण्यासाठी बुद्धांचा पुतळाही त्यांनी तयार केला होता. हे प्रज्ञानाच्या हिमालयाचे कलाप्रेम होते. संगीताचीही त्यांना विशेष रुची होती. नाट्यगीते त्यांना विशेष आवडत. पुण्यावरून मास्टर कृष्णरावांना बोलावून घेत आणि त्यांच्या नाट्यगीत गायनात ते तल्लीन होत. बाळ साठे या व्हायोलिन तज्ज्ञाकडून त्यांनी व्हायोलिन शिकण्याचा महिनाभर प्रयत्न केला. वैद्य नावाच्या सारंगी वादकाकडून ते सारंगी शिकले. रात्रीच्या निरव शांततेत ते सारंगी वाजवीत असत. कधी किंगरी बनवूनही रात्री त्यांनी वाजविली आहे. त्यांनी लंडनहून शिवतरकरांना गडकऱ्यांची नाटके पाठविण्यासाठी दोन पत्रे लिहिली आहेत. लहानपणी कीर्तनांमधून त्यांनी तबलाही वाजवला आहे. संगीतामुळे नवजीवन निर्माण होते असे ते म्हणत. शेक्सपिअरच्या किंग लियरवरून त्यांनी गशहाणी मुलगीफ हे प्रहसन स्वतः लिहिले आणि त्याचा प्रयोग केला. प्रबोधनकार ठाकरेंच्या ‘खरा ब्राह्मण’ या नाटकाचे विस्तृत परीक्षणही त्यांनी केले. भाऊ फक्कड यांनी ते सांगलीत गेले त्यावेळी आपला तमाशा पाहण्याची विनंती त्यांना केली. पण कामामुळे ते जाऊ शकले नाहीत. दुसऱ्या भेटीत त्यांनी भाऊ फक्कडचा तमाशा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पण या वेळी फक्कड मरण पावले होते. ते खूप खिन्न झाले आणि कोर्टाचे नियोजित काम न करताच ते मुंबईला आले. आचार्य अत्र्यांच्या महात्मा फुले चित्रपटाचा मुहूर्त १९५४ साली बाबासाहेबांच्या हस्ते झाला. श्यामची आई हा चित्रपट पाहूनही त्यांनी अत्र्यांना धन्यवाद दिले. कलेमुळे समाजाचे शीलवर्धन होते. जे मला विवेकी करते तेच मला आवडते, असे ते म्हणाले. त्यांना परिस्थितीने राजकारण करायला लावले. पण आय हेट पॉलिटिक्स असे ते म्हणाले होते. अभावग्रस्त लोक बळ आणि शस्त्र यांनी सत्ताधीश होऊ शकत नाहीत. त्यांनी डोके आणि लेखणी यांच्या जोरावर सत्ता मिळवायला हवी असे त्यांनी सांगितले. हे कलाप्रेम बाबासाहेबांना सभ्य समाजाच्या निर्मितीची कला शिकवित होते असे म्हटले पाहिजे. विश्वनायक संगीत शिकत होते आणि क्रांतीसाठी सूर जुळवत होते. ते चित्र काढीत होते आणि क्रांतीचा आवाज रंगवत होते. ते शिल्प घडवत होते म्हणजे स्वतः चे शिल्पकारपणच घडवत होते. ते सुंदर भाषेचा शोध घेत होते म्हणजे जीवन सुंदर करणाऱ्या सुंदर सत्याचाच शोध घेत होते. या कलाप्रेमाने विश्वनायकाला क्रांतिकला शिकविली असेच म्हणायला हवे.