आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पचा ठेंगा, भारताची काेंडी (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निमंत्रणाला अखेर ठेंगा दाखवला. अर्थात हे अगदीच अनपेक्षित नव्हते. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक अाेबामा दाेन वेळा भारत दाैऱ्यावर अाले अाणि प्रजासत्ताक दिन साेहळ्यात सहभागी झाले. त्या वेळीदेखील जानेवारीमध्ये ‘स्टेट अाॅफ द युनियन अॅड्रेस’ प्रस्तावित हाेते. परंतु त्यांनी अमेरिकेतील सर्व कार्यक्रम स्थगित केले हाेते. उल्लेखनीय म्हणजे ट्रम्प यांना फेब्रुवारीमध्येही भारत भेटीचे निमंत्रण देण्यात अाले तरीही त्यांनी अव्हेर केला. विशेषत: भारत अाणि अमेरिकेच्या धाेरणांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना त्यांनी निमंत्रण नाकारले अाहे.

 

म्हणूनच या घटनेचे गांभीर्य वाढते. साऱ्या जगाने अापल्याच कलाने निर्णय घेतले पाहिजेत, अापण म्हणू तेच साऱ्या देशांनी स्वीकारले पाहिजे, असा अमेरिकेचा हेकेखाेरपणा जगाला नवा नाही. परंतु अमेरिकेचा ताल किती काळ लावून धरायचा, असा प्रश्नही जगभरातील राष्ट्रांना अाता पडू लागला अाहे. त्यातूनच मुस्लिम राष्ट्रांसाेबतच भारत, चीन, रशियादेखील अमेरिकेच्या विशेषत:  ट्रम्प यांच्या हेकटपणाला थेट अाव्हान देऊ लागली अाहेत. स्वाभाविकच अापले साऱ्या जगावरील प्रभुत्व संपुष्टात येते की काय, याची भीती ट्रम्प यांना मनाेमन सलत नसेल तरच नवल. याच धास्तीपाेटी त्यांनी साऱ्या जगाची नाराजी अाेढवून घेण्यास सुरुवात केली अाहे. चीनविरुद्ध थेट व्यापारयुद्ध पुकारले, तर गुप्तहेरावर विषप्रयाेग केल्यामुळे रशियाशी बिनसले. यापाठाेपाठ करार धुडकावून अण्वस्त्रे बनवत असल्याचा अाराेप करीत इराणवर पुन्हा निर्बंध लादले. भारताच्या संदर्भात विचार करता सलाेख्याचे संबंध फायद्याचेच ठरणार याची पुरेशी जाणीव अमेरिकेला अाहे, यामुळेच सामरिक व्यापार कायदेशीरता बहाल करीत असतानाच रशियासाेबतचे संबंध कमी करावेत यासाठी दबावतंत्राचा वापर केला.

 

शत्रुराष्ट्रांसाेबत संरक्षणविषयक संबंधांची शिक्षा म्हणून एखाद्या देशावर निर्बंध लादण्याची अमेरिकी कायद्यात तरतूद अाहे. त्याचा बागुलबुवाही उभा केला, एफ-१६ विमाने खरेदी करावीत यासाठी अट्टहास धरला. पाकिस्तानकडे ही विमाने असल्यामुळे भारताने भीक घातली नाही. परिणामी अमेरिकी प्रशासनाचा तिळपापड झाला. अमेरिका कट्टर शत्रू मानत असलेल्या रशियाशी एस ४०० क्षेपणास्त्र खरेदीचा केलेला करार अाणि अाशियाई देशांसह जागतिक बहिष्कार घातलेला असतानाही इराणमधून सुरू ठेवलेली खनिज तेलाची अायात या दाेन्ही बाबी डाेनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी लागल्या. परिणामी भारताला कायमची अद्दल घडवण्याचा चंग त्यांनी बांधला. मात्र भारताने अाम्ही गरजेनुसार ठरवू असे ठणकावले. प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रणाचा केलेला अव्हेेर हा त्याचाच एक भाग. 


वस्तुत: भारत अाणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापारी संबंधांसाेबतच व्यापारी संतुलन साधण्यासाठी ट्रम्प यांच्या या दाैऱ्यात चर्चा अपेक्षित हाेती. नागरी वाहतुकीसाठी विमान खरेदी, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात दाेन अब्ज डाॅलर्सची अायात भारताने गृहीत धरली हाेती. अमेरिकेला जसे भारतीय अर्थव्यवस्थेचे अाकर्षण अाहे; तसेच व्हाॅट्सअॅप, फेसबुक, गुगल, अमेझाॅन, उबेरसारख्या कंपन्यांनी चीनला डावलून भारताला झुकते माप दिले अाहे. वाॅलमार्ट-फ्लिपकार्टदरम्यानचा करार त्याचेच द्याेतक हाेय. अमेरिकेच्या ‘डाटा प्रायव्हसी’ धाेरणाकडे साऱ्या जगाचे लक्ष असले तरी अाराेग्य, बँकेसह अनेक क्षेत्रांच्या ‘बॅक एंड’ला भारतीय अायटी क्षेत्राचे मनुष्यबळ अाहे. जर अन्य देशांची मदत घ्यायचीच नाही असा पवित्रा अमेरिकेने घेतला तर भारताची काेंडी हाेऊ शकते, म्हणूनच ट्रम्प यांची भारतभेट महत्त्वाची हाेती. परंतु, माेदी सरकारचा अंतिम टप्प्यात अालेला कार्यकाळ अाणि येत्या मे महिन्यात सुरू हाेणारी लाेकसभा निवडणुकीची रणधुमाळी याचीही पार्श्वभूमी यामागे असू शकते.

 

तूर्त तरी ट्रम्प यांच्या नकारामुळे माेदी सरकारसमाेरील अडचणींत भर पडली अाहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षाही माेदींना खरा धाेका डाेनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धाेरणाचा दिसताे. चीनची सद्दी संपुष्टात अाणण्यासाठी ‘अमेरिका फर्स्ट’ला गती दिली. परंतु, ज्या अाडमुठ्या पद्धतीने ते धाेरण राबवले जात अाहे; त्यामुळे खुद्द अमेरिका तर अडचणीत अालीच, शिवाय जगभरातील बहुतेक राष्ट्रे अार्थिक विवंचनेत सापडली अाहेत. त्यास भारतही अपवाद नाही. खनिज तेलाच्या वाढत्या किमती हे त्याचे प्रमुख कारण अाहे. येत्या दाेन वर्षांत अमेरिकेत महामंदी येण्याचे संकेत त्यातून मिळतात. यातून अमेरिकी अर्थव्यवस्थेचा विकास दर घसरणीला लागला तर पर्यायाने महागाई अाणि व्याज दरवाढ अपरिहार्यपणे स्वीकारावी लागणार. भारतासह जगभरातील वाढती महागाई ही ‘अमेरिका फर्स्ट’चीच नांदी असून जगभरातील साऱ्या नागरिकांना त्याची झळ अातापासूनच बसू लागली अाहे.

बातम्या आणखी आहेत...