आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जेट बचाव' नि अर्थांधळेपणा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्यवसाय किंवा उद्याेग, मग ताे काेणत्याही स्वरूपाचा असाे; त्याच्या भरभराटीसाठी, ताे आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेण्यासाठी प्रत्यक्ष उद्यमशीलता आणि प्रामाणिक इच्छाशक्ती या दाेन गाेष्टींची खरे तर गरज असते. ज्या उद्याेगांची पाळेमुळे सरकारी वरदहस्ताच्या प्रभावाखाली आणि बँकांच्या वित्तीय पाेषणावर रुजलेली असतात ते उद्याेग एक तर स्थिरावत नाहीत, दुसरे म्हणजे स्पर्धात्मकदृष्ट्या सक्षम ठरत नाहीत. नेमकी हीच बाब 'जेट एअरवेज' संदर्भातील सरकारी बचाव माेहिमेने अधाेरेखित केली. केंद्रात सरकार एच. डी. देवेगाैडांचे असाे, नाही तर वाजपेयी, मनमाेहन सिंग, नरेंद्र माेदींचे. त्यांनी जेटच्या पुनरुत्थानासाठी भरपूर मदत केली; मात्र जेटची व्यावसायिक पाळेमुळे भक्कमपणे रुजली नाहीत, किंबहुना ती रुजू दिली नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. एकीकडे देशभर सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू असताना हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभूंना 'जेट बचाव'साठी तातडीने बैठक बाेलवावी लागते, याचा अर्थ केवळ हितसंबंध जाेपासण्यासाठीचा अट्टहास हाच असू शकताे. मरणासन्न 'किंगफिशर'ला जीवदान देण्याविषयी केंद्र सरकारने फारसा उत्साह कधी दाखवला नाही. 'किंगफिशर'चे विमान गटांगळ्या खात अखेर जमीनदाेस्त झाले. उल्लेखनीय म्हणजे स्टेट बँक आॅफ इंडियानेच किंगफिशरच्या पंखांना सर्वाधिक वित्तीय बळ पुरवले हाेते. आता ज्या भूमिकेतून सरकार 'जेट'कडे पाहते आहे, तीच 'किंगफिशर' बाबत का नसावी, असा प्रश्न उद्भवणे साहजिक आहे. जेटला अपवाद ठरवण्यामागे एकच कारण असू शकते ते म्हणजे, प्रवर्तक नरेश गाेयल यांनी सत्ताधीशांना अगाेदरच उपकृत करून ठेवलेले असावे. त्याशिवाय संकटात सापडलेला उद्याेग किंवा उद्याेगपतीला सावरण्यासाठी सरकारची घालमेल सुरू हाेत नाही; आणि नरेश गाेयल हे त्यास अपवाद ठरू शकत नाहीत. 


एकीकडे सरकारी मालकीच्या एअर इंडियाकडील कर्ज ५० हजार काेटींवर पाेहाेचले आहे, तर खासगी मालकीच्या जेट एअरवेजकडील कर्ज सुमारे ८ हजार ५०० काेटींच्या घरात आहे. वस्तुत: ज्या जेटमुळेच एअर इंडियाच्या वाट्याला मरणकळा आली, तिच्या पंखात बळ भरायचे की जेट एअरवेजचे पाेषण करीत राहायचे, हा मूलभूत प्रश्न आहे. एकीकडे आर्थिक संकटातील उद्याेगांना अधिकृत दिवाळखाेरीचा मार्ग खुला करून द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला जेट एअरवेजच्या बचावासाठी याच धाेरणाला हरताळ फासायचा, हे कशाचे द्याेतक ठरते? 'जेट'ला अपवाद का ठरवले जाते? जेटच्या मदतीसाठी स्टेट बँक आॅफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक सरसावली असली तरी सरकारने त्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावण्याची खरेच गरज हाेती का? ज्या वेळी बँकांनी 'जेट'ला कर्ज देण्याचा निर्णय घेतला, त्यापूर्वी आर्थिक मूल्यमापन केलेले असणारच, जर आता बँकांना कारवाईपासून राेखण्याचा प्रयत्न हाेत असेल तर केंद्र सरकारचा यात काही स्वार्थ नाही, असे कसे म्हणता येईल? एक मात्र खरे की, जेट एअरलाइन्सच्या प्रकरणाने केंद्रातील माेदी सरकारचा अर्थांधळेपणा आणि दुटप्पीपणा चव्हाट्यावर आणला आहे. 


जेट एअरवेज गेल्या तीन महिन्यांपासून प्रचंड तोट्यात आहे. देशी-विदेशी बँकांकडून घेतलेले कर्जही फेडलेले नाही, वैमानिकांसह कर्मचाऱ्यांचेही पगारही थकले आहेत. अशा परिस्थितीत जेटच्या रूपाने किंगफिशरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, अशी हाक सरकारने बँकांना दिली होती. पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने आपत्कालीन कर्जाची तयारी दाखवली आहे. जेट एअरवेजचा व्यवसाय सुरू राहील इतपत आर्थिक साहाय्य या बँकांकडून देण्यात येणार आहे. जर या आर्थिक साहाय्यानंतरही जेट एअरवेजचा व्यवसाय पूर्ववत झाला नाही, तर मात्र जेट एअरवेज विकण्याशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही. 


जेट एअरवेजचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांच्यासमाेर संचालक मंडळाचा राजीनामा देवून आपत्कालीन निधीसाठी मार्ग खुला करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. प्रारंभी स्टेट बँक आॅफ इंडियाने ठाेस कृती कार्यक्रमाशिवाय निधी देण्यास विरोध केला होता. मात्र जेट एअरवेज दिवाळखोर ठरली तर बँकेला अधिक नुकसान सहन करावे लागेल हे लक्षात येताच त्यास तयारी दर्शवली. आता सीईओ विनय दुबे यांच्यासमाेर 'जेट'ला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्याचे आव्हान आहे. येत्या काही दिवसात कर्जदात्यांकडून लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मात्र जाेपर्यंत या कंपनीस नवा भागीदार किंवा खरेदीदार मिळत नाही, ताेपर्यंत बंॅकांकडून अर्थसहाय्य पुरवले जाईल. २५ वर्ष जुन्या जेट एअरवेजकडील ११९ पैकी केवळ ४१ विमाने सध्या कार्यरत आहेत. अनेक देशी-विदेशी आणि खासगी अशा एकंदरीत २६ बँकांनी आजवर जेट एअरवेजला कर्ज पुरवले आहे. तूर्त तरी नजीकच्या भविष्यात जेट एअरवेज या आपत्कालीन मदतीच्या साहाय्याने कर्जफेड करू शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

श्रीपाद सबनीस 
 

बातम्या आणखी आहेत...