आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यत्र-तत्र बंडाळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारतीय लोकशाहीत निवडणुका एखाद्या उत्सवाप्रमाणे साजऱ्या केल्या जातात. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याकडे सातत्याने निवडणुका सुरू असतात. प्रत्येक निवडणुकीचे वातावरण वेगळे असते. पक्ष, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार, नेते त्याची तयारी करत असतात. आपल्यासमोर मोठे आव्हान उभेच राहू नये यासाठीही वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात. प्रत्येक घटनेकडे एक वर्ग निवडणूक आणि राजकीय दृष्टिकोनातून पाहत असतो. सध्या लोकसभेच्या निवडणुका घोषित होऊन तिसरा आठवडा संपत आला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची प्रक्रिया वेगात सुरू आहे. तेथील मतदान अवघ्या १२-१३ दिवसांवर आले आहे. निवडणूक नियोजनानुसार तिथले तिढे संपले आहेत, पण उर्वरित ठिकाणच्या बंडाळ्या-लाथाळ्या अद्याप संपलेल्या नाहीत. 


लोकसभा असो किंवा कोणत्याही निवडणुका.... त्या ऐनवेळी ठरत नाहीत. त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीची तयारी करतच असतो. कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने कामाला लागायला सांगितलेलेही असते. पण निवडणुकांच्या तारखा जशा जवळ येतात तसे नवनवे खेळ सुरू होतात. त्यात मग इतर पक्षांतील उमेदवार पळवणे, ऐनवेळी दुसऱ्यालाच संधी देणे, युती-आघाडी करणे, त्यात आपल्या पारड्यात जास्तीत जास्त पडेल यासाठी डावपेच आखणे याचा खेळ सुरू होतो. निष्ठावानांपेक्षा मग आपली ताकद लावणाऱ्याला महत्त्व मिळत जाते. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांची घुसमटही सुरू होते. हा प्रकार सगळ्याच निवडणुकांत कमीअधिक प्रमाणात सुरू असतो. त्यामुळे राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोनही बदलत आहे. 


सध्याच्या लोकसभा निवडणुकांची वावटळही यापासून दूर राहिलेली नाही. आधी युती-आघाडीच्या कुरघोड्यांनी मतदार जनतेचे मनोरंजन केले. नंतर मग उमेदवार निवड आणि पळवापळवीने अधिकच चुरस निर्माण केली. आरोप- प्रत्यारोप आणि आधीपासून निवडणुकांच्या नियोजनात गुंतलेल्यांची गणिते बिघडवल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना वगळता इतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवारी निश्चितीचा घोळ पूर्णपणे मिटलेला नाही. निवडणुकीच्या तयारीत आणि नियोजनात आघाडीवर असलेल्या भाजपमध्येही दोन जागांवरचा तिढा कायम आहे. महाआघाडीत सांगली, पुणे, रावेरचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाही उमेदवार उठवण्यावरून सुरू असलेला खल मिटत नसल्यामुळे संदिग्धता कायम आहे. 


त्यातूनच मग निष्ठावंतांच्या स्वप्नावर नांगर फिरवत बाहेरून येणाऱ्यांना पायघड्या टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश करा आणि तिकीट मिळवा असा नवा फंडा रुजत आहे. ही धोक्याची घंटा आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यापूर्वी त्यांनी भाजपवर टीका करताना भाजपकडून लढणार नाही अशी घोषणा केली होती. त्यांच्यापासून बंडखोरांच्या राजकारणाने या सत्राची सुरुवात झाली. चंद्रपुरात काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवार बदलला. दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष असलेल्या डॉ. भारती पवार यांनी भाजप प्रवेश करत विद्यमान खासदाराला डावलत तिकीट मिळवण्यात यश मिळवले. सातारा जिल्हा काँग्रेसचे रणजितसिंह निंबाळकर यांनी अचानक कमळाचा झेंडा हाती घेतला आहे. सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेचे तिकीट मिळवून साताऱ्याच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे. हातकणंगलेतील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने पूर्वी राष्ट्रवादीत होते. भाजपच्या बारामतीतील उमेदवार कांचन कुल या नवख्या उमेदवार आहेत. त्यांच्यावर कोणत्याही पक्षाचा शिक्का नाही. त्यांचे पती राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. भाजपच्या नंदुरबार येथील खासदार डॉ. हिना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार हे आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर ते राष्ट्रवादीमध्ये जाऊन मग भाजपमध्ये आले. कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे राष्ट्रवादीचे खासदार होते. 


उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांची वारी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकांचा इतिहास तपासला असता अनेक जणांनी विजयासाठी मोठमोठ्या तडजोडी केल्याचे दिसते. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करा, चांगला उमेदवार निवडून द्या, असे आवाहन सर्वसामान्यांना केले जाते. चांगली माणसे राजकारणात येत नाहीत ही ओरड असते. पण बंडखोरीच्या राजकारणाचे हे चित्र पाहिल्यावर लोकशाहीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होतो. 

- कार्यकारी संपादक, अकोला 
सचिन काटे 
 

बातम्या आणखी आहेत...