अनपेक्षित निकालांची शक्यता

दिव्य मराठी

Apr 25,2019 10:12:00 AM IST

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाची वाट पाहणे म्हणजे एक त्रासदायक अनुभव आहे. तर्कदृष्ट्या विचार करायचा झाला तर जगातील सर्वात मोठ्या आणि ४० दिवसांत सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांचे व्यवस्थापन करणे ही किती अवघड गोष्ट आहे ते मी समजू शकताे. त्यातही यंदाच्या निवडणुकीत ९० कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. अमेरिकन मतदारसंख्येपेक्षा ही संख्या चौपट आहे. प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक व्हाेटिंग मशीनचे बटण दाबायला मिळावे यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तयार करावी लागते.


मी जेथे जेथे जातो, तेथे मला एकच प्रश्न विचारला जातो, २३ मे रोजी काय होणार? पण भारतीय मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद केल्यामुळे काहीच सांगता येत नाही. पण या उत्तरात काय मजा आहे? २३ मेच्या संभाव्य चित्राचा अंदाज येण्यासाठी मग कोणी निवडणूक निकालाचे विश्लेषण करतो, कोणी मागील माहिती धुंडाळतो, काेणी लोकांच्या मनात आहे काय याचा शोध घेतो, काही जण राज्य विधानसभांचे निवडणूक निकाल पाहतात, काही जण विरोधी आघाड्यांवर आधारित काही गणिते मांडतो आणि उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण इतके करूनही २३ मे २०१९ रोजी नेमके काय होणार याचा कोणालाच अंदाज येत नाही. २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी मोदी आणि भाजपच येणार यावर पैजा तरी लावता येत होत्या. बरेचसे अंदाज बरोबर ठरले. जिंकणार कोण हा अंदाजही बरोबर ठरला. पण या वेळी कोणताही अंदाज करणे अवघड आहे. अंदाज करणाऱ्यांचा आवाज किती जरी विश्वासू असला तरी परस्परविरोधी स्वरही बरेच आहेत. यातील विविध माहिती आणि मुद्द्यांचा विचार करूया.


एकूण ओपिनियन पोल जर पाहिले तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आकडेवारी घसरलेली आहे असेच दिसेल. गेल्या काही दिवसांतील अंतिम आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, एनडीएला मागील इलेक्शनच्या ३३६ जागांच्या तुलनेत २७५ जागा मिळतील असे चित्र दिसते. ३३६ च्या तुलनेत २७५ हा आकडा लहान असला तरी तो निश्चित अाहे आणि एनडीएला पुन्हा एकदा स्थिर सरकार देणारा हा अंदाज आहे.


पण यातही परस्परविरोधाभास आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भाजपला महत्त्वाची हार पत्करावी लागलेली अाहे. याच राज्यांत २०१४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यात भाजपला चांगलेच यश मिळाले हाेते आणि त्याचेच प्रतिबिंब लोकसभा निवडणुकांच्या यशात पडलेले होते. यंदा विधानसभा निवडणुकांचे प्रतिबिंब लोकसभा २०१९ मध्ये पडले तर भाजपला महत्त्वाच्या जागा गमावाव्या लागतील. यामुळे एनडीएला बहुमताचा आकडा गाठता येणे अवघड वाटते.

शिवाय २०१४ प्रमाणे यंदा मोदी लाट दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की, पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेत घसरण झालेली आहे, पण त्यांच्या एकूणच नावातील नवलाई कमी झालेली दिसते. हे अपेक्षित होते. कारण त्यांची भाषणे आणि धाेरणे. मागील निवडणुकीत भाजपने ३१ टक्के जागा मतविभागणीने जिंकल्या होत्या. १९९९, २००४ आणि २००९ च्या निवडणुकांमध्ये भाजपने २१ टक्के जागा मतविभागणीने जिंकल्या होत्या. झालेली दहा टक्के वाढ भाजपला सत्ता देणारी ठरली. आता हा मतदार पुन्हा भाजपलाच चिकटून राहील काय? का काही मतदार पुन्हा काँग्रेसच्या बाजूला झुकतील? मतदार फिरल्याने २५ दशलक्ष मते जरी फिरली तर जागांमध्ये मोठा फरक पडू शकतो. सर्व ९० कोटी मतदारांचा विचार करता २५ दशलक्ष मते फिरणे अशक्यही वाटते. पण आता काहीही सांगता येत नाही.

काही गोष्टी भाजपच्या विरोधात, तर काही त्यांच्या बाजूला गेल्याचे दिसेल. अर्थव्यवस्था मंदावणे, ग्रामीण भागाची अधोगती आणि वाढती बेरोजगारी हे काही मुद्दे आहेत. जीडीपी वाढला या मुद्द्यावर किती लोक मते देतील हे माहीत नाही. सामान्य लोकसंख्येला बेरोजगारीची झळ तशी पाेहोचलेली दिसत नाही. ग्रामीण भागाची अधोगती जी झाली, तिचे चित्र विधानसभा निवडणुकांमध्ये दिसतच आहे. त्याचा वाईट प्रभाव लोकसभा निवडणुकांमध्येही दिसू शकतो, पण तो किती हे २३ मेपर्यंत सांगू शकत नाही. पुलवामा हल्ला या मुद्द्याने भाजपला उचलून धरले. पाकिस्तानला जसे रोखठोक उत्तर दिले, ते बहुतांश भारतीयांना आवडले.


काँग्रेसने न्याय योजनेचे जे आश्वासन दिले आहे, ते त्या पक्षाला फायद्याचे ठरले आहे, पण नेतृत्वात ताजेपणाचा अभाव दिसतो. माेदी ही आता नवलाईची गोष्ट नसेल, तर राहुलबाबतही फार काही आशेचे चिन्ह नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक अंदाज व्यक्त करण्यास केवळ कठीणच नाही, तर रटाळही होत अाहे. भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा काही जणांना आवडला, पण विरोधी आघाडी भाजपला विशेषत: उत्तर प्रदेशात धक्का देईल असे वाटते. कोणतीही लाट नाही, कोणतीही दिशा नाही आणि दोन्ही बाजूंना विरोधी सूत्रे काम करतात. त्यामुळे लोक जसा विचार करतात, त्यापेक्षा २३ मे ला जास्त काही आश्चर्यकारक घडू शकते. राजकीय नेत्यांना पुन्हा निराश व्हावे लागेल. बाकीचे आपण सर्व फक्त २३ मे या तारखेची वाट पाहावयाची आहे


चेतन भगत इंग्रजी लेखक [email protected]

X