आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्याने खरे बोलणारी बाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयदेव डोळे   बाई, अहो, इतके खरे अन् स्पष्ट सर्वांदेखत बोलत नसतात. तुम्ही तर कमाल केलीत. भरसभेत देशभक्त म्हणालात. बरं, म्हणालात ते म्हणालात, वरती त्यांना नव्हे, यांना असा खुलासा करायची काय गरज? आधी ज्याला देशभक्त म्हणालात त्यावर ठाम राहायचे सोडून दुसऱ्याचे नाव घ्यायला काय नडले होते तुमचे, कोण जाणे. हे काही आवडले नाही बुवा आपल्याला. प्राण गेले तरी बेहेत्तर, आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत, अशी रोखठोक चाल आपली. म्हणजे तुमची. तुमची म्हणजे भगवा रंग पांघरणाऱ्यांची. एकदा तो रंग पांघरला की पुन्हा संसाराकडे परतायचे नाही असा पणच असतो ना. या रंगाला लोभ, मोह, मत्सर, काम, क्रोध हे षड॰रिपु वाकवूच शकत नसतात असे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोत, म्हणून तर आमच्यासारखे लोभी, कामी, रागीट, माजोरडे, मत्सरी, मोहात पडणारे लोक भगव्यापासून लांब असतो.  बाई, तुम्ही फार त्यागी. देशासाठी, तत्त्वांसाठी, धर्मासाठी तुम्ही तुरुंगात जायला, रक्त सांडायलाही तयार असता म्हणे! आम्ही डरपोक. दाढी करताना रक्त आले तर दिवसभर हुळहुळत बसतो. हळद लाव, तुरटी फिरव, डेटॉलचा बोळा चिकटव असे करीत राहतो. छे! लानत है इन डरपोक आदमियों पर! बघा ना, तुमचे किती प्रेम त्या देशभक्तावर. त्याने रक्त सांडले; पण स्वत:चे मुळीच नाही. त्याने शत्रू लो‌ळवला, पण तो स्वदेशीच होता. त्याने अख्खा मनुष्यदेह संपवला; ७९ वर्षांचा होता म्हणून काय झाले! तो गोळ्या झाडून तिथेच थांबला; पकडून ठेवले तेव्हा काय करील बिचारा. नमस्ते म्हणून तो सरसावला होता; पण मनात प्रचंड द्वेष अन् तिरस्कार होता. पोलिसांनी त्याला संरक्षणात नेले, अन्यथा मॉब लिंचिंगचा पाया रचला गेला असता. तो मुसलमान असावा असे अनेकांना वाटले, निघाला एक कोकणस्थ ब्राह्मण. तो वर्णिला गेला माथेफिरू म्हणून; होता एक मराठी पत्रकार बुद्धिजीवी.   केवढा आनंद झाला पुण्यात, नागपुरात. तेव्हापासून दाबून ठेवला होता हो हा आनंद. तुम्ही तो मोकळा करवला. आम्हाला म्हणजे तुमचा आदर करणाऱ्यांना अशी भावना दाबून जगण्याची किती नामुष्की ओढवली होती इतके दिवस. पण धन्य आहे तुमची. बाई, आमचे मराठी मन उचंबळून निघाले त्या दिवशी. देशभक्त असे तुम्ही केलेले वर्णन आमच्या मनात नुसते अव्यक्त आणि अस्फुट होते हो. तुमच्या तोंडात साखर पडो अशी प्रार्थना करीत राहिलो. जुन्या काळीही आमच्या तोंडात साखर पडलीच होती. पण घरादारांवर हल्ले सुरू झाले, चोपाचोपी आरंभली. जाळपोळ उद्भवली. तेव्हापासून अगदी खोल खोल मनातल्या मनात तो आनंद दडवून ठेवलेला होता. त्याला तुमच्या रूपाने वाचा मिळाली. तो शब्द, ते विशेषण आमच्या कानांनी ऐकायला व कानात साठवायला आम्ही उपस्थित असतो तिथे तर काय बहार आली असती? पण छे! असे दुरूनच बरे असते. एकदा फटका बसलाय हो. किती तरी वर्षे पुढे आम्ही जणू बहिष्कृत, वाळीत टाकले गेलेले. फार मोठे दु:ख असते ते. टाकून दिलेल्याला भोगावे लागते तसे. बरे का बाई, आता कुठे पाच वर्षे जरा सुखासमाधानाचे दिवस आले होते आम्हाला. म्हटले, बघा, आम्हाला हिणवायचा ना, तुम्ही कसे चेपले ते... आता आमची पाळी तुम्हा लोकांना चेपायची! तरी बरे झाले त्या पोंक्षामुळे. त्याने मोठ्या धाडसाने रंगमंच साकारला अन् मनातल्या आनंदाला शब्द फुटले, वाक्ये लाभली, तत्त्वज्ञानाची झळाळी आली. केवढे ते धाडस, केवढा तो स्वच्छ विचार आणि काय ती राष्ट्रनिष्ठा. जाज्वल्य नुसती...  बाई, आम्ही जाणतो, तुम्ही एकट्या पडल्या आहात ते. तुमच्या शेजारी बसणारेही तुम्हाला टाळतात म्हणे. बोलायचे सोडा, तुमच्याकडे बघणेही नको म्हणतात. काय करणार ते तरी बिचारे? करडी नजर असते सभागृहात. पक्षाची भूमिका नाही म्हणे तशी अधिकृत. आता राजकारणात आतले, बाहेरचे चालते थोडेफार. पण काही मुद्दे राजकारणाच्या पल्याड असतात, तसा त्या xx xx म्हणे. त्याच्यावर केवढे प्रेम उतू येतेय यांचे! का कोण जाणे, गेल्या दोन-चार वर्षांपासून केवळ स्वच्छता स्वच्छता ऐकून कान किटले होते हो आमचे. तुमचे उद्गार ऐकून आमचे कान मोकळे झाले अन् तृप्तही झाले. उगाच खोटे खोटे कवतिक चालले होते. त्यांच्याही मनात काही फार आदरफिदर नाही बरे का. आम्ही ऐकून आहोत. पण करता काय जनतेचे? तिला भुलवायचे म्हणजे काही नामोच्चार करावे लागतात राजकारणात.  तुम्हाला तसे आवडत नाही हे काय माहीत नव्हते तुमच्या नेत्यांना ? उमेदवारी देऊन निवडून आणायचे अन् वर मनमोकळे बोलूही द्यायचे नाही, ही कसली रीत? ते प्रधानसेवक एक तर स्वत:ही येत नाहीत सभागृहात आणि तुमची मुस्कटदाबीही करतात, हे म्हणजे फार झाले! अहो बाई, ही लोकशाही आपली आहे. आपली म्हणजे आपल्यातली. तीत नको का बोलता यायला मोकळेपणे? इतकी वर्षे दडपून टाकलेल्या आमच्या खऱ्या भावना तुमच्यामुळे व्यक्त झाल्या. हे त्या लोकशाहीमुळे शक्य झाले. लोकशाहीवर असेच प्रेम करीत राहा. आमची मन की बात मोठ्या आवाजात करीत चला म्हणजे झाले, जय xx राम!