आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरे प्यार में हो जाऊँ फना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या मनाचा अभ्यास करता करता सिग्मंड फ्रॉइड मानवी जीवनाच्या एका मूलभूत कठीण प्रश्नापाशी अडखळला : अधिकार गाजवण्याचा प्रश्न. म्हणजे वर्चस्व, प्रभुत्व निर्माण करण्याची मनुष्याची लालसा. फ्रॉइडला वाटू लागले की, मनुष्य वर्चस्वाला चटावलेला असतो. बऱ्याचदा ते वर्चस्व उद्ध्वस्त करून टाकणारे असते. माणसाच्या तीव्रतम इच्छा बऱ्याचदा कशाच्या असतात? तर त्या इच्छांवर कोणी तरी काबू ठेवणारा शोधायच्या. गंमत आहे, पण माणूस आपल्यावर कोणाचे तरी वर्चस्व असावे, असेच इच्छित असतो. माणूस कोणाला तरी शरण जाऊ पाहतो. फ्रॉइडला ही अधिकार गाजवण्याची भूक जीवनानुभवाच्या अनेक क्षेत्रांत आढळली. पण खूप ताकदीने अन् धोकादायकरीत्या ती त्याला राजकारणात आढळून आली. १९२१ मध्ये इईडचे ‘ग्रुप सायकॉलॉजी अँड द अॅनालिसिस ऑफ इगो’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या वर्षी हिटलरचे राजकीय आयुष्य नुकते सुरू होऊ लागले होते. या पुस्तकात गर्दीचे वर्तन आणि नेता व त्याची भूमिका यावर भर देण्यात आला होता. फ्रॉइडने त्या पुस्तकात सामान्य माणसाचे मन तपासून असे नमूद केले होते की, हे जग अस्वस्थ करणारे, व्यामिश्र, कधीकधी प्रचंड गोंधळलेले ठिकाण वाटते. तिथे जे जे कठीण व भक्कम असते ते ते वितळून जाते. मूल्ये कोठे असलीच तर ती कायम प्रवाही असतात. मग अशा वेळी नेता येतो. तो साऱ्या बाबतीत ठाम व ठोस वाटतो. त्याचे बौद्धिक निर्णय भक्कम व स्वतंत्र वाटतात. त्याच्या इच्छांना इतरांनी प्रेरणा देण्याची गरज नसते. बाकीचे संशयग्रस्त असताना नेत्याची दृष्टी इतकी योग्य असते की तीच खरी आहे, असे तो मानतो. त्याच्या अहंला फार थोड्या भावरज्जूंनी बांधून ‌ठेवलेले असते. त्याचे स्वयंखेरीज कोणावरही प्रेम नसते. इतरांना तो अगदी जुजबी महत्त्व अथवा आस्था दाखवत असतो. फ्रॉइड म्हणतो की, त्या समूहाचे सदस्य या भ्रमात असतात की, त्यांचा नेता प्रत्येकावर सारखेच व खरे प्रेम करतो. पण त्या नेत्याला कोणाचे प्रेम असे नको असते. कारण तो अधिकारवृत्तीचा स्वभाव असणारा, संपूर्ण आत्मलुप्त, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वतंत्र असतो.


फ्रॉइडने हे जे वर्णन केले ते हिटलरबाबत त्याचे अनुयायी जसे वागत त्यावरून सुचले. हा राजकीय नेता जगाकडे कशाचीही तडजोड न करता बघणारा आणि एक स्वच्छ कार्यक्रम बाळगणारा होता. तो जाणे की तो कोणाचा तिरस्कार करतो : ज्यूंचा, मार्क्सवाद्यांचा. त्याला ठाऊक होते की, त्याला काय हवे : जर्मन लोकांचे ऐक्य, एक मजबूत फौज, राज्याप्रती संपूर्ण समर्पण, एक साम्राज्यच जणू. जर्मनीला स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर लोकांना एक नेता लागेल आणि त्यांना माझ्यात त्यांच्या पवित्र आकांक्षांचा उद्गार दिसेल. अशा नेत्याने लोकांशी सतत सल्लामसलत करायची नसते. त्यांचे प्रतिनिधीही त्यासाठी नको असतात. तो नेता लोकांच्या सर्वोच्च आकांक्षा प्रतिबिंबित करत असतो. मग त्या आकांक्षा त्यांना जाणवोत की नसोत. हिटलरला कधीही शंका येत नसे. त्याने सत्य जाणले होते आणि त्याचा उच्चार त्याने ठामपणे केलेला होता.


लोक एकट्या नेत्याच्या स्वाधीन स्वत:ला का करतात किंवा त्याला डोक्यावर घेतात, याचाही अभ्यास फ्रॉइडने केला होता. त्याचा निष्कर्ष असा की, जर्मनांनी हिटलरपुढे शरण जात त्याचा स्वीकार केला होता. त्याचे कारण म्हणजे मनाला मिळणारी शांतता. फ्रॉइड सांगतो एखाद्या याचिकाकर्त्याच्या तुलनेत मोलक कमांडरवर म्हणजे प्रभुत्वशाली माणसावर लुब्ध असतात. फिदा असतात. स्वत:खेरीज अन्य कोणत्याही विचारांना थारा न देणाऱ्या तत्त्वाबाबत माणसे आतून समाधानी असतात. एखादे तत्त्व पूर्ण स्वातंत्र्य देत असेल तरी ते त्याचा स्वीकार करणार नाहीत. तसा त्यांनी केला तर त्यांना अनाथ, टाकून दिल्यासारखे वाटते. म्हणजेच उदारमतवादी लोकशाहीसारख्या व्यवस्थेत विचारांचा प्रचंड फैलाव, अमाप अर्थ आणि मूल्ये यामुळे भांबावून जायला होते. शिवाय वादावादी, तर्कवितर्क, मतभेद यांचीही संख्या भरपूर. जगाला एखाद्या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाची अनिवार ओढ असते. ते जितके कठोर, गूढ, शक्तिमान तितके ते चांगले असे जग मानते. 

 

फ्रॉइड असेही म्हणतो की, संस्कृतीने प्रेम, संगोपन, काळजी हे गुण स्त्रीला चिकटवून टाकले. आपले आयुष्य या गुणांभोवतीच गुंफावे, असे मानवाला अंतिमत: वाटत नाही. मानव बहुतकरून सत्ता आणि प्रभुत्व यांच्याशी आपले नाते अभंग ठेवण्याच्या लालसेत जगतो. अशा गोष्टींच्या शोधात माणूस राहतो आणि त्यापुढे वाकायला बघतो. त्यासाठी तो प्रेमाचा त्याग करतो. सारी जिवलग मानवी सुखे टाकून देतो. फ्रॉइड अखेरपर्यंत पालकाबद्दलची मानवी भूक धुंडाळताना आढळतो. एखाद्या राजासाठी माणूस का तडफडतो ते शोधतो. 


फ्रॉइडच्या लक्षात एक गोष्ट आली असती की, फॅसिझम आवर्जून नेत्राकर्षक असतो. फॅसिझम लोकांना भपका, रंग, प्रकाश, गोंगाट बहाल करतो, असे मार्क एडमंडसन हा लेखक म्हणतो. त्याच्याच पुस्तकातून ही माहिती येथे घेतलेली आहे. जुन्या काळातील थाटमाट, देखावा फॅसिस्ट आणून ठेवतात आणि लोकांना तो सारा चमत्कार, गूढ आणि ते प्रभुत्व पुन्हा मिळवता येते. त्यासाठी ते आसुसलेले असतात. एक राहिलेच; प्रभुत्व अपरिहार्यपणे पुरुषी, आत्मलुब्ध, दांडगट, स्वार्थप्रिय, मनमानी आणि कैकदा जुलमी असते, असेही एडमंडसन सांगतो. म्हणजे अशा व्यक्तीच्या प्रेमात पडल्यास फना (नष्ट) व्हायची शक्यता जास्त...हो ना?

बातम्या आणखी आहेत...