Home | Editorial | Columns | divyamarathi column about Indian media's role election

भारतीय निवडणुकांवर जागतिक माध्यमांचे मार्मिक भाष्य

समीर गायकवाड | Update - Apr 13, 2019, 10:58 AM IST

असत्यकथन हाच २०१९च्या निवडणुकांचा मंत्र आहे असे त्याने म्हटले आहे

 • divyamarathi column about Indian media's role election

  २०१९ च्या लोकसभा निवडणुका अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरताहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या तथाकथित भ्रष्ट व अकार्यक्षम राजवटीविरुद्ध जनआक्रोश निर्माण केला होता, तो मतपेटीत परावर्तितही करून घेतला होता. पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते गत निवडणुकीपर्यंत मतदानासाठीचं विचारनिश्चितीचं स्वातंत्र्य टिकून होतं. यंदा ते नाहीये असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती यंदाच्या निवडणुकांत अप्रत्यक्षपणे लादलीय. विविध जागतिक प्रसारमाध्यमे चाळली तर याचे प्रतिबिंब आढळते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणूक नाट्याकडे लहान-मोठ्या देशांचे बारकाईने लक्ष आहे.

  २०१४ च्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या राजवटीविरुद्ध अण्णा हजारेंचं जनआंदोलन उभं केलं गेलं, काँग्रेसच्या तथाकथित मुस्लिम अनुनयाचा मुद्दा वापरत हिंदू अस्मितांना फुंकर घातली गेली, भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात कमालीची सुस्तता दाखवणाऱ्या काँग्रेसला कर्तव्यविन्मुख ठरवणं भाजपला सहज सोपं गेलं. आक्रमक नेतृत्वाचा मोदीमॅनिया याकरिता संघाच्या कामाला आला आणि २०१४ ची निवडणूक मोदी लाट म्हणून चर्चिली गेली. यंदा तशी कोणतीच लाट नाही. सरकार व विरोधी पक्ष दोघांकडेही मतदारांना थेट अपील होईल अशा नेमक्या मर्मभेदी प्रचारकी मुद्द्याचे अस्त्र नाही तरीही दोन्ही बाजूंनी प्रचाराचे घमासान सुरू आहे. दोन्हीकडून विजयाचे दावे केले जाताहेत. सध्यातरी मतदाराचा कौल आपल्याकडे एकतर्फी वार्तांकनाने नीट सामोरा येत नाहीये.

  यंदाच्या निवडणुकांचं 'द अटलांटिक' या नियतकालिकाने मार्मिक वर्णन केलं आहे. असत्यकथन हाच २०१९च्या निवडणुकांचा मंत्र आहे असे त्याने म्हटले आहे. 'द वॉशिंग्टन पोस्ट' या दिग्गज अमेरिकन वृत्तपत्राने काल म्हटले की, विकासाच्या आशेपेक्षा असुरक्षिततेची भीती वरचढ ठरवण्यात मोदी यशस्वी झालेत. भारत-पाकिस्तान तणावाचा दोन्ही देशांतील राजसत्तांना कसा लाभ होतोय यावरही मार्मिक टिप्पणी आहे. १० एप्रिलच्या 'द गार्डियन'मध्ये जग समजतं तसं मोदी या निवडणुकात मजबूत स्थितीत नाहीत असे शीर्षक देतानाच भाजप आणि काँग्रेसच्या दाव्यांची पोलखोल करताना सांख्यिकीचा नेटका आधार घेतलाय. काश्मीर मुद्दा, पुलवामा हल्ला, वादग्रस्त एअर स्ट्राइक याचा राजकीय वापर केला जातोय, पण तो देशहितास कसा बाधक ठरू शकतो याचे चिकित्सक वर्णन यात आहे.

  चिनी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने कालच म्हटलंय की, मोदींना तीव्र स्पर्धेस सामोरं जावं लागतंय, तर 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने अत्यंत परखड मथळा देत म्हटलंय, मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील ऐक्याच्या भावनेस सुरुंग लावत विभाजनवादी ताकदींना बळच मिळालंय. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'हेराल्ड सन'ने तर मोदींचा बायोपिक ब्लॉक केल्याचीही दखल घेतलीय. जगभरातील माध्यमे आपल्या निवडणुकांचे तटस्थ आणि सापेक्ष वार्तांकन करत असताना भारतीय प्रसारमाध्यमे मात्र पुरती सरकारच्या दावणीला बांधली गेली असल्याचे चित्र आहे. ५० वर्षे सलग सत्तेत राहू अशी वल्गना करणाऱ्या भाजपला सिनेमे, फेक पोर्टल्स, सर्जिकल स्ट्राइक्स, वेबसिरीज इत्यादींचा आधार घेत चक्क स्वतंत्र वाहिनी करावी लागलीय हे खूप काही सांगून जाते. म्हणूनच लेखाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे ही जनमताची निवडणूक नसून जनमतावर खोट्यानाट्या बातम्यांचा, माहितीचा बेफाम मारा केली गेलेली निवडणूक आहे. एक प्रकारे वैचारिक बैठक ठरवण्याच्या प्रक्रियेवरचं हे अतिक्रमण असून त्यातून आपला विवेक जागृत ठेवण्याचे आव्हान सजग नागरिकांच्या समोर उरले आहे. हे यंदाच्या निवडणुकांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल.

  sameerbapu@gmail.com

Trending