आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जावडेकरांची स्वातंत्र्यपूर्ण जांभई

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

खूप काम केल्यावर माणूस जरा विसावतो. कडकडून जांभई देतो. आळोखेपिळोखे देतो. मग कधी त्याच्या किंवा तिच्या तोंडून ‘रामकृष्ण हरी’ असा उद्गार बाहेर पडतो. कधी ‘तूच आहेस रे बाप्पा’ असे कोणी म्हणते, तर कधी आपण सारे ‘आई गं’ म्हणून जातो. एकूण काय, केलेल्या कामाचा अन् समाधानाचा सुस्कारा आपण जांभईसोबत सोडून देत असतो. काय म्हणतो ते महत्त्वाचे नसते, काय केले ते असते. कोणी नुसता जांभयाच देऊ लागला तर आपण जाणतो की, माणूस आपल्यासमक्ष बसलाय, पण त्याचे काही लक्ष नाही. तो काहीही न करता ‘अगं आई गं’ अशा जांभयाच देत बसलाय. प्रकाश जावडेकर ३१ मे रोजी नामदार बनले. नुसते नामदार नव्हे, तर घटनेच्या कलम १९ (अ) (१)चे राखणदारही! अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक, वृद्धी आणि सातत्य हे ज्याचे काम असते त्या माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारताना जावडेकर आधीच जांभई देऊन त्या शुक्रवारी म्हणाले की, मोदी सरकार वृत्तपत्र स्वातंत्र्य जाणतेच. शिवाय त्याची प्रेमपू्र्वक जोपासनाही करते. ते आणखी म्हणाले, वृत्तपत्र स्वातंत्र्य लोकशाहीचे सार-सत्त्व असते! जावडेकर २०१४च्या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुरुवातीचे सहा महिने हेच खाते सांभाळून होते. त्यानंतर आता ते पर्यावरण खात्यासह हेही खाते सांभाळणार आहेत. ते आता किती महिन्यांसाठी असेल ते मोदीच जाणो! पहिल्या मोदी मंत्रिमंडळात जावडेकर राज्यमंत्री असूनही या खात्याचे स्वतंत्र कारभारी होते. आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. पर्यावरण खाते आणि माहिती व प्रसारण खाते एकाच व्यक्तीने सांभाळायचे याचा अर्थ काय? कोण्या खात्याला जास्त अन् कोण्या खात्याला कमी महत्त्व द्यायचे?


सध्या पर्यावरण फार बिघडले असल्याचे आपण नुकतेच पाहिले. झाडे लावणे, पाणी साठवणे, धूर कमी सोडणे, स्वच्छ राहणे, धूळ न उडवणे असे काही करायचे असते म्हणजे पर्यावरण दिन साजरा झाल्याचे आपण भारतीय समजतो. त्यात काळजी करण्यासारखे खूप काही आहे. दुसऱ्या खात्यात म्हणजे माहिती व प्रसारण खात्यात तसे काळजी करण्यासारखे काही नाही. खुद्द मंत्र्यांनी, नामदार साहेबांनी त्यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. या खात्यात व खात्यांतर्गत जी माध्यमे मोडतात त्यात घोर लागेल सरकारी जिवाला आणि डोके भणाणून जाईल असे काही ठेवलेलेच नाही. म्हणून जावडेकर अत्यंत आरामात सांगून गेले की, मोदी सरकारला स्वातंत्र्याची जाणीवही आहे आणि त्याची जोपासनाही करायची आहे त्याला.

 

प्रश्न काय करायचे हा नाहीच. कारण काही न करायला पत्रकार व त्यांचे मालक बांधील आहेत. तेदेखील रोज साधारण डझनभर जांभया देतात. दारात कुत्रे बांधलेले असते. ते बिचारे काही करायला मिळाले नाही की उगीच तोंड वासून जांभया देत राहते. साखळी तोडता येत नाही की भुंकता! त्यामुळे जांभई देत ही कुत्री ‘आज’चा आळस झटकून टाकतात अन् काहीही न करण्याच्या भूमिकेत शिरतात. तेवढे करायला ती स्वतंत्र असतात. 

 

प्रेस फ्रीडम अर्थात वृत्तपत्र स्वातंत्र्य असा शब्द जगभर प्रचलित आहे. अनेक देशांत या शब्दाच्या मधोमध एक शब्द असतो. कसा? तर ‘वृत्तपत्र आणि स्वातंत्र्य’ असा लिहिला की दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत हे तो देश जाणतो. ‘वृत्तपत्र विरुद्ध स्वातंत्र्य’ असाही एक उपयोग अनेक देश करतात. ‘वृत्तपत्र किंवा स्वातंत्र्य’ असेही काही देश व त्यांची सरकारे  देशातील नागरिकांना सांगतात. त्यामुळे वृत्तपत्रे, स्वातंत्र्य, ज्ञान यापेक्षा आपला जीव महत्त्वाचा असतो असे त्या देशाचे लोक लक्षात ठेवतात! म्हणून जावडेकर नामदार यांनी गेल्या पाच वर्षांत भारतात रूढ झालेल्या समजुतीस बळच दिले आहे. आम्हाला आमचा जीव प्यारा असून ज्ञान, माहिती, सत्य, वास्तव या गोष्टी म्हणजे खरोखर दंतकथा आहेत याची खात्री आम्हास पटली आहे.


गेल्या पाच वर्षांत देशात गेंडे कमी झाले, पण गेंड्यांच्या कातडीसारखी कातडी असलेले लोक वाढले, हे त्यांना काय माहीत?
गेंडा हा अवाढव्य, भीतिदायक प्राणी असला तरी मुळात तृणभक्षी आहे, हे फार थोड्यांना माहीत असते. या थोड्यांत जावडेकर पार्टी फार चाणाक्ष अन् जुनी! त्यांनी गवताच्या जोडीला देशभक्ती, राष्ट्रप्रेम, मायभूमीचे रक्षण, शेजाऱ्यांचा धोका असा ‘हिरवा’ चारासुद्धा टाकल्याने हा तृणभक्षी प्राणी भलताच प्रेमळ, मवाळ आणि मधाळ झाला. फक्त खायचे, चरायचे अन् लोळायचे हेच काम पडल्याने जांभई देणे हेही त्याला चांगले जमू लागल्याचे पाच वर्षांत आढळून आले. 


वृत्तपत्र स्वातंत्र्य या क्षेत्रात एकेकाळी शोध पत्रकारिता लोकप्रिय असे. सरकारमधील देशद्रोह्यांचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार बाहेर काढण्यात पत्रकारांना फार आनंद मिळे. वाचकसुद्धा कशी जिरवली या समाधानात असत. अलीकडे देशभक्त व राष्ट्रप्रेमी लोक सरकारे चालवीत असल्याने तसे काही बाहेर काढण्याची संधीच मिळत नाही कोणाला! जगभरच असे मलूल आणि नीरस ‘पर्यावरण’ पत्रकारितेत पसरले आहे. सबब जांभई देण्याला अत्यंत उत्साहवर्धक वातावरण आहे. म्हणूनच जांभया देण्याच्या स्पर्धा अनेक वृत्तपत्रे आयोजित करण्याच्या विचारात असल्याचे कळते. स्वातंत्र्य आहे त्यांना...रामकृष्ण हरी!

0