आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे नागरिकशास्त्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयदेव डाेळे (ज्येष्ठ विचारवंत) माननीय गृहमंत्रीजी, आपल्याला मी प्रश्न विचारला तर चालेल ना? आपल्या आवडीचा अन‌्‌् मर्जीतला माणूस मी नाही तरीसुद्धा प्रश्न विचारू देत आहात त्याबद्दल आभार. काय करणार, देशात जाेवर राहील ताेवर असेच प्रश्न हाेत राहतील. लाेकशाही टिकवून धरल्याबद्दल लाेकांचेही आभार. लाेक आणि लाेकशाही टिकवून ठेवायची की नाही हे तुम्ही अन्् तुमचा पक्ष ठरवणार आहातच.  पहिला प्रश्न असा : गाेळवलकर गुरुजी म्हणाले हाेते की, ‘जर हिंदुस्थान ही हिंदूंचीच भूमी आहे आणि हिंदू राष्ट्राच्या उत्कर्षाची ती कर्मभूमी आहे असे निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे तर मग आज जे अन्य समाज या भूमीमध्ये राहत आहेत, परंतु हिंदू वंशाचे, धर्माचे व संस्कृतीचे अनुयायी नाहीत त्या सर्वांची वाट काय?... जाेपर्यंत ते स्वत:चे वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नत्व राखू इच्छितात ताेपर्यंत ते पूर्णपणे परकीय लाेक समजले जातील आणि ते या राष्ट्राचे एक तर मित्र किंवा शत्रू म्हणून या देशात राहू शकतील.’ (आम्ही काेण, भारत प्रकाशन, नागपूर. १९४६ पृष्ठ ४८-४९) नागरिकत्व सुधारणा कायदा - सीएए -  आणि एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिकता नाेंदणी यांचा आधार हेच विचार असतील का? देखिए श्रीमान, तुम्ही हे जे येथे जाेडून दाखवत आहात त्याचा व सीएए आणि एनआरसी यांचा कहीं से भी काेई संबंध नहीं है! किंबहुना कायदा व नाेंदणी यांचाही काही संबंध नाही. प्रश्न दुसरा : गाेळवलकर गुरुजी याच पुस्तकात पुढे म्हणतात की, ‘... अशा ‘परकीय’ लाेकांना फक्त मार्ग माेकळे असतात, एक तर राष्ट्रीय संस्कृतीचा स्वीकार करून राष्ट्रीय वंशाशी एकरूप हाेणे किंवा राष्ट्र अनुमती देईल ताेपर्यंतच त्या देशात राष्ट्राच्या मर्जीनुरूप नांदणे आणि राष्ट्राची लहर फिरताच ताे देश साेडून चालते हाेणे. अल्पसंख्याकांच्या प्रश्नाच्या बाबतीत हाच खरा निर्दाेष असा दृष्टिकाेन आहे. त्या प्रश्नाचे हेच एक बिनचूक आणि न्याय्य असे उत्तर आहे. त्यामुळेच राष्ट्रीय जीवन निकाेप आणि शांत राहील... अहिंदू जमातींनी... काेणत्याही जादा सवलती वा हक्क न मागता नागरिकत्वाचे मूलभूत हक्कही न मागता पूर्णपणे हिंदू राष्ट्राच्या अधीन अशा स्थितीत या देशात राहावे. तिसरा काेणताही मार्ग त्यांना शिल्लक राहत नाही किंवा निदान राहू नये.’ (कित्ता, पृष्ठ ५०,५१) याचा अर्थ तुम्ही गाेळवलकर गुरुजींच्या या विवेचनाशी सहमत असून तसा कार्यक्रम आखत नाही काय? नहीं, बिलकुल नहीं, इथल्या मुसलमानांनी मुळीच काळजी करू नये. त्यांचे नागरिकत्व जाण्याचे काही कारण नाही. मुळात एनपीआर व एनआरसी यांचा कहीं से भी काेई संबंध नहीं है. माफ करा मंत्रीजी, आणखी एक प्रश्न... गुरुजींचे एक विधान वापरून विचारू म्हणताे. गुरुजी म्हणतात, ‘एकदा एका प्रसिद्ध अमेरिकन प्राध्यापकांनी मला एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, ‘मुसलमान व ख्रिस्ती हे याच देशातील आहेत. तुम्ही त्यांना तुमच्यातले का मानीत नाही?’ उत्तरादाखल मी त्यांना एक प्रतिप्रश्न विचारला की, समजा आमच्या देशातील एखादा नागरिक अमेरिकेत गेला. ताे तेथेच स्थायिक झाला. त्याला अमेरिकेचे नागरिकत्व हवे आहे. परंतु तुमचे लिंकन, वाॅशिंग्टन, जेफरसन आदींना राष्ट्रीय वीरपुरुष मानण्यास ताे तयार नाही. अशा माणसाला तुम्ही अमेरिकेचा राष्ट्रीय घटक म्हणाल? तुमचे स्पष्ट मत सांगा. त्यांनी उत्तर दिले की, नाही. तेव्हा मी त्यांना म्हटले, हीच कसाेटी आमच्या देशालाही का लावू नये? जे लाेक या भूमीत राहत असूनही या देशाचा गाैरव व परंपरा यांविरुद्ध हालचाली करीत असतात, आमच्या राष्ट्रीय वीरपुरुषांचा व मानबिंदूंचा अवमान करतात, अशांना आम्ही राष्ट्रीय म्हणावे असे तुम्ही कसे म्हणता?’ (समग्र श्री गुरुजी- खंड ११. भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन २००६, पृष्ठ १४०). गृहमंत्रीजी, संघ परिवारातील अनेक जर नेहरू, गांधीजी, इंदिराजी, राहुल आदींची सतत निर्भर्त्सना करीत राहतात, मग त्यांना गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे नागरिक म्हटले जाऊ नये असे तुम्हाला वाटत नाही काय? सुनीए श्रीमान, नागरिकता काेणाची जाणार नाही. हा कायदा देणारा आहे, घेणारा नाही. दूर दूर तक सीएएचा संबंध एसआरसीशी नाही, आप कृपया अफवाएं ना फैलाएं.... जाता जाता एक शेवटचा प्रश्न मंत्रीजी. जाता जाता म्हणजे महाराष्ट्र, झारखंड येथून जाताना आणि चार महिन्यांनी दिल्लीतून जाताना असे म्हणायचे नाही मला! गुरुजींचाच पुन्हा उल्लेख करताे. गाेळवलकर म्हणाले हाेते, ‘श्रीलंका केवळ भारतापासून वेगळी झाली नाही तर एक समाज आणि एका वंशाचे असूनसुद्धा परस्पर काही संबंध राहिला नाही. हिंदुस्थानातील जे लाेक तेथे राहतात त्यांना परकीय म्हणून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.  आमचेे सरकार फक्त एक कडक पत्र लिहून आपले कर्तव्य पूर्ण करीत आहे. तेथील लाेकांची जी दुर्गती हाेत आहे त्याची सरकारला काही चिंता नाही. जर विराेध खराेखरच कडक असता, त्यात कठाेरता असती तर परिणाम झाला असता.’ (समग्र श्री गुरुजी-खंड ४, पृष्ठ ९२) तर मी असे विचारू इच्छिताे की... नहीं, कुछ पुछने की जरूरत नाहीं. सवाल ही नहीं उठता काेई. हम अपना कर्तव्यही ताे कर रहे हैं. आधी घरात काय चालले ते पाहावे, मग बाहेर लक्ष द्यावे असे आमचे ठरले आहे. जे ठरलेय ते काळ्या दगडावरचे अमिट असे अक्षर आहे. ते काेणी मिटवू शकणार नाही. चला, पुरे आता! माणसे माेजायचे माेठे काम आता माझ्यापुढे आहे. ती माेजून झाली की पुढचे पाहू. लेकिन एक ध्यान में ठेवा की, सीएए व एनआरसी इनमें कुछ भी कहीं से भी दूर दूर तक संबंध नहीं है. नमस्कार, जयहिंद!!

बातम्या आणखी आहेत...