आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो ख्वाहिशे ऐसी की...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय बुवा

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आता सर्वांच्या अपेक्षांचा ओघ सुरू झाला आहे. त्यातील अनेक दम काढणाऱ्याही असतील. त्यामुळे सरकार चालवताना त्यांच्या आक्रमक नेतृत्वाची अन् संयमी व्यक्तिमत्वाची एकाच वेळी कसोटी लागेल...


मिर्झा गालिब यांच्या शायरीने उर्दू, हिंदी काव्य रसिकांना वेड लावले. त्यांच्या गझलेतून मानवी जीवनानुभवाचे दर्शन जसे होते, तसे समकालीन वास्तवाचे चित्रणही समोर येते. शेवटचा मुघल बादशहा बहादूर शाह जफरने त्यांना दरबारी कवी म्हणून सन्मान दिला, पण मुघल साम्राज्याच्या पतनानंतर सगळे चित्र बदलले. शायरीमुळे मोठा मान मिळूनही गालिब यांना अखेरच्या काळात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. मुघलांच्या काळातील पेन्शन ब्रिटिशांच्या राज्यात सुरू राहिली, पण तीही अत्यंत तोकडी होती अन् त्यासाठी मिनतवाऱ्याच जास्त कराव्या लागत. उतारवयात हेलपाटे नि हाल सोसेनात, तेव्हा त्यांनी लिहिले...


‘गालिब’ न कर हुजूर में तू बार बार अर्ज
जाहिर है तेरा हाल सब उनपर कहे ब
गैर 

खरंच जर सरकारला आपले हाल माहीत असतील, तर वारंवार अर्ज- विनंत्या करण्यात काय हशील? बरं ते करुनही अशा विपन्नावस्थेत कुणी दखल घेत नसेल, तर वाट्याला नैराश्य येते. म्हणून काळ कुठलाही असला, तरी सरकार संवेदनशील असणं महत्वाचं. तसं असेल तर तेच आपला आधार, तारणहार आहे, असं लोकांना आजही वाटतं. हालआपेष्टांत दिवस काढणाऱ्यांसाठी तर सरकार हेच मायबाप! ते ‘जाणतं’ असेल तर ठीक. गालिब यांच्या काळासारखं जुलमी असेल, तर काय वेळ येते, हा इतिहास आहे... 
 
महिनाभराच्या नाट्यमय, रहस्यमय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्राच्या सत्तेवर ठाकरे सरकार विराजमान झाले आहे. विधानसभेच्या हंगामी आणि स्थायी अध्यक्षाची निवड तसेच बहुमत सिद्ध करण्याचा टप्पा पार करुन ते कामालाही लागले आहे. विरोधी पक्षनेता बनलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ नव्या भूमिकेत शिरुन सरकारला जेरीस आणायला सुरवात केली आहे. उद्धव त्यांना वारंवार ‘मित्र’ म्हणत त्यांच्याकडून पाच वर्षांत ‘बरेच काही’ शिकल्याचे सांगत आहेत. ‘सत्ताधारी’ आणि ‘विरोधक’ यासारखे ‘विरुद्धार्थी’ शब्द आपण दूर ठेवू आणि लोकांच्या भल्यासाठी, राज्याच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य करु, असेही ते देवेंद्रांना म्हणत आहेत. एका अर्थाने परवापर्यंत या दोघांचा एकाच दिशेने सुरू असलेला प्रवास निवडणूक निकालानंतर सत्तेतील वाट्याच्या ‘समान’अर्थाकडून असा विरुद्ध अर्थापर्यंत झाला आहे. राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणाचा आरंभबिंदू ‘समसमान’ हाच होता. तो नसता तर उद्धव म्हणाले, तसे ते टीव्हीवर विधानसभेचे कामकाज पाहात बसले असते आणि आज ते जिथे बसले आहेत, तिथून देवेंद्र पूर्वीच्याच त्वेषाने  बोलताना दिसले असते...

राजकारणात नुसता त्वेष उपयोगाचा नसतो आणि द्वेष तर अजिबातच कामाचा नसतो. संयम ही सहजप्रवृत्ती आणि सामंजस्य हा स्थायीभाव असलेल्यांना या क्षेत्रात काहीही अशक्य नसते. या गोष्टींच्या अभावामुळे देवेंद्र विरोधी बाकांवर आले आणि उद्धव याच दोन गुणांच्या प्रभावामुळे त्यांच्या खुर्चीवर बसले. आपण आणि सत्ता हे जणू समानार्थी शब्द असल्याचे मानल्याने काय होते, याचे देवेंद्र हे उदाहरण ठरले. तर,‘समान’ मिळत नसेल, तर विरुद्ध असलेल्यांशी हातमिळवणी करुन ‘संपूर्ण’ कसे मिळवावे, याचे उद्धव हे प्रतीक बनले. तसे पाहिले तर उद्धव यांची वाटचाल समान म्हणजे दोघांतील अर्ध्या वाट्याच्या अपेक्षेपासून एकट्याच्या पूर्ण वाट्यापर्यंत झाली आहे...

वाटा तर पूर्ण मिळाला, पण आता ‘घाटा’ची आडवळणे त्यांची वाट बिकट करण्याची शक्यता दिसते आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होण्याची शक्यता असलेला विषय चर्चेच्या पातळीवर अडला आहे. राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज असल्याचे सांगणारे प्रशासन आता हा आकडा साडेसहा लाख कोटींचा असल्याचे सांगत आहे. त्यातच अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये तितकाच मोठा निधी आणि गुंतवणूक अडकली आहे. त्या सरसकट बंद कराव्या, तर आर्थिक स्थिती आणखी चिघळणार आणि सुरू ठेवाव्या, तर अन्य योजनांना पैसा कमी पडणार. त्यामुळे सगळ्याच गोष्टी ‘सरसकट’ करता येत नसल्याचा साक्षात्कार नव्या सरकारला झाला असावा. त्यामुळेच अमुकतमुकांवरचे गुन्हे मागे घेण्यासारखे तिसऱ्या- चौथ्या प्राधान्याचे निर्णय सरकार आधी घेताना दिसते आहे. त्यातच सुप्रिया सुळेंपासून छत्रपती संभाजीराजेंपर्यंत आणि नबाव मलिकांपासून शिवसेनेतल्याच नेत्यांपर्यंत अनेक जण रोज वेगवेगळ्या मागण्या पुढे रेटत आहेत. त्या योग्य असल्या, तरी आठवडाभरातच अशा अनेक अपेक्षांचा ओघ सुरू झाला आहे, हे लक्षणीय.   लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि सर्वसामान्य लोकांची गाऱ्हाणी यांनी उद्धव यांचे सरकार कसे तोंड देते, हेही महत्वाचे ठरणार आहे. कारण प्रत्येकाची नाराजी टाळत सरकार चालवणे सोपे नाही...

ठाकरे सरकार कामाला लागले असले, तरी तिन्ही पक्षांना खूष ठेवतानाच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची कसरत अटळ आहे. स्थिती अनुकूल नसेल तर लहान-मोठ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणेही जड जाते, हे सांगताना तशा परिस्थितीतून जाणारे गालिब म्हणतात...


हजारो ख्वाहिशे ऐसी की 
हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान 
लेकिन फिर भी क
म निकले


शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाचे ‘अरमान’ साध्य केलेल्या उद्धव यांना आता अशा नवनव्या ‘ख्वाहिश’ पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यांचा ओघही सुरू झाला आहे. त्यातील अनेक अपेक्षा दम काढणाऱ्याही असतील. त्यामुळे त्यांचा ‘सामना’ करीत सरकार चालवताना उद्धव यांच्या आक्रमक नेतृत्वाची आणि संयमी व्यक्तिमत्वाची एकाच वेळी कसोटी लागणार आहे.