Column / वन की बात!

 सिंहाचा विरोधी पक्ष कोणॽ वनराजाला असे खपत नाही. वनराज म्हणजे सार्वभौम, सर्वशक्तिमान

जयदेव डोळेे

Aug 07,2019 08:42:42 AM IST

एका घनदाट जंगलात गेलो होतो. एक वाटाड्या होता सोबत. फोटोग्राफर, कॅमेरामन अर्थातच होते. त्यांच्याविना माझे कुठेच जाणं होत नाही ! फोटो पाहिले असतीलच तुम्ही माझे. आता फिल्म पाहाल लवकरच. एकसौतीस करोड लोगों की जिग्यासा जाग उठी होगी की मी असा एकाएकी वनात का गेलोॽ चांगले चालले असताना अशी वेळ का आली वनविहार करण्याचीॽ खरंय देशवासियो. मी वन का जवळ केलेॽ वन् नव्हे बरे का. वन्‌ म्हणजे नंबर वन् ! तो तर मी आहेच. खेरीज इंग्रजी विन या शब्दाचा भूतकाळ वन असा होतो. म्हणजे जिंकलेला ! तोसुद्धा मीच आहे. हे वन म्हणजे उपवन, तपोवन, नंदनवन यांमधले वन. वानप्रस्थाश्रम तुम्हाला ठाऊक असेलच दोस्तो. म्हटले तशी वेळ येण्याआधी वन कसे असते ते बघून घ्यावे. एकदा त्या गुहेत गेल्याचे लक्षात आहे नाॽ


काय करणार, बरेच वाटत नाही आजकाल. म्हणजे वन म्हणावे की जंगल, सगळीकडे सारखेच वातावरण ! तसे, मी जिथे गेलो त्या वनात वनराज नव्हते की हिंस्र प्राणी. सारे कसे शांत शांत. रातकिड्यांची किर्र किर्र अन् वानरांच्या टोळ्या, हरणे, खळखळ वाहणारी नदी सगळे होते. ही शांतता मला फार आवडते. हे खरे वन. नाही तर ते जंगल बघा. निव्वळ जंगलराज चालूय असेच सारे. शांतता अशी नाहीच. पण सतत वाटतेय की वनातली ही शांतता वादळापूर्वीची तर नाहीॽ मैंने कहा ना कि जंगल और वन इन दोनों में कुछ फरक नहीं दिखाई देता. जंगलराज म्हणजे काय असतेॽ बळी तो कान पिळी, माइट इज राइट, जिसकी लाठी उसकी भैंस, तळे राखील तो पाणी चाखील, उगवत्या सूर्याला नमस्कार, वारा वाहील तिकडे पाठ फिरवणे, मी म्हणतो तेच खरे, बहुमताचा आदर, बहुसंख्याकांची संस्कृती...व्वा ! जमले की. पूर्वी लोक म्हणायचे की डेमोक्रेसी इज अ फंक्शनिंग अनार्की. म्हणजे कारभार करणारे अराजक जिथे असते ती लोकशाही. आमचे म्हणणे तेच तर आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांच्या हातात सत्तेचा लगाम असतोच. त्याला विरोध कशासाठी करायचाॽ एकदा बहुसंख्याक म्हटले की त्याचे ऐकलेच पाहिजे. प्रतिवाद का करायचाॽ विरोधी पक्ष म्हणूनच आम्हाला आवडत नाही. या विरोधी पक्षांनीच जंगलराज आणले आहे. सारखा गोंधळ, गडबड, आक्षेप, बहिष्कार, सभात्याग, मोर्चे, प्रश्न आणि शंका. हेच तर आम्हाला खटकत राहते म्हणून आम्हाला चर्चासुद्धा करावीशी वाटत नाही कोणाशी ! वनात कोणी का कोणाशी चर्चा करतेॽ ‘आम्हाला भूक लागली असून तुम्हाला खाण्याची इच्छा झाल्याने हे आमचे निवेदन आपणास सादर करीत आहोत,’ असे सिंहांचा कळप हरिणांच्या प्रमुखाकडे देईल कायॽ सारी हरणे मग हा प्रस्ताव मताला टाकतील कायॽ एकाने जरी हरकतीचा प्रस्ताव अथवा पॉइंट ऑफ ऑर्डर मांडली तर ही खाण्याची आमची नम्र व प्रामाणिक मागणी फेटाळली जाणार ! कसे होणार मग जंगलाचेॽ या जंगलाचे रक्षण करण्यासाठी तर आम्हाला धष्टपुष्ट राहावे लागणार; काय खायचे, कोणाला खायचे, कधी खायचे हे आम्ही ठरवणार, असेच सिंह म्हणत असतील ना! सिंहाचा विरोधी पक्ष कोणॽ वनराज्याला असे काही खपत नाही हे लक्षात घ्या. वनराज म्हणजे सार्वभौम, सर्वशक्तिमान.
म्हणून एक संन्यासी आम्ही वेचला आणि पाठवला मुख्यमंत्री म्हणून. तर म्हणे तिकडे सारी उलमात माजल्याची हाकाटी सुरू झाली. म्हणे जंगलराज आले. एक संन्यस्त, निर्मोही माणूस वनत्याग करून माणसांत आला तर म्हणे हिंसाचार, खून, बलात्कार इत्यादी वाढले! हेच हेच आमचे शांत वागणे आणि प्रेमळ स्वभाव यांवर घाव घालते. संन्याशी आणि वन यांची सांगड का बरे सारखी घालावीॽ विरोध पक्ष चुकत आहेत.


वनात जाण्याचे आणखी एक कारण तुम्हाला, मेरे प्यारे देशवासियों म्हणून सांगतो. सध्या देशात मंदी आहे, खप होत नाही वस्तूंचा. गुंतवणूकही घटली, बेरोजगार तर खूपच वाढले, कारखाने बंद पडू लागले, ५० टक्क्यांची कपात करूनही कपडे घ्यायला कोणी पैसा खर्चेना, उद्योगपती जीव देऊ लागले, टीव्हीवर माझ्या राज्यावर चर्चा करू लागले. काय हे आरोप, काय या तक्रारी! अहो, पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभी करायचीय ना आपल्याला!! कोणीच ऐकेना आपले. आपल्या देशाची अर्थव्यवस्था अश्मयुगात जाईल अशी भली भली मंडळी इशारे देऊ लागली. म्हटले तर दुर्लक्ष करता येणे अशक्य होते. म्हणून जरा वनात जाऊन कंदमुळे, करवंदे, रानफळे यांवर जगता येते का ते पाहावे, म्हणून गेलो. प्यायला झऱ्याचे पाणी किंवा पावसाचे साठवलेले पाणी मिळवता येते का ते बघितले.


शिकार कशी करावी याचाही थोडाफार अभ्यास केला. मांसाहारी व्हायचे की नाही अजून ठरले नाही. तूर्तास ‘रॉबिन्सन क्रुसो’ ही कादंबरी वाचत असून टॉम हँक्स यांचा ‘कास्ट अवे’ हा चित्रपट बघायचे ठरवले आहे. आधी केले, मग सांगितले अशी शिकवण आम्हाला बालपणापासून दिलेली असते. त्यानुसार वनानुभव घेऊन आलो. वेळ आली की करावी लागणारच आहे या वनाची बात!

X
COMMENT