आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आइशी’ची तैशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयदेव डोळे, ज्येष्ठ विचारवंत आधी आपण तिच्या नावापासून सुरुवात करू. ती बंगाली असल्याने बंगाल्यांच्या नावांबद्दल कायम घोळ घातला जातो म्हणून. आइसी म्हणजे लक्ष्मी. पण बंगाली माणसे अ चा ओ, आ चा ऑ, भ चा व अन् व चा भ-ब करतात. त्याने फार गडबड उडते. सौरभ म्हणजे सुगंध किंवा कीर्ती. मात्र भ चा व केल्याने तो सौरव म्हटला जातो, गौरवसारखा! कंकणा बॅनर्जी कोंकणा होऊन जाते. जणू ती रत्नागिरीत जन्मली अन् वाढली. वंगचे बंग केले जाते आणि ते खपतेही. एनडीटीव्हीचे मालक प्रणव राय आहेत की प्रणयॽ त्यांच्या टीव्हीत प्रणय हे ‘प्रेम’पूर्वक नमूद केले जाते. पण प्रणव म्हणजे ओंकार असल्याने व तो भक्ती-साधना यांच्याशी जोडलेला असल्याने त्याचाच उच्चार सतत केला जातो. तसे या आइसीचे. तिचे नाव आइशी करून टाकल्याने मराठीतल्याप्रमाणे ऐशीची तैशी होऊन गेली. आजकाल कोण्याही वृत्तपत्रात शब्दकोश नसतात, शब्द रत्नाकर नसतात. वृत्तवाहिन्या तर शब्दांच्या बुडबुड्यावर जगणाऱ्या. त्यांना दोन मिनिटांपूर्वी आपण काय म्हणून गेलो ते आठवत नसते. मग आइशी काय अन् आइशाचा घो काय! कोणाला काय पडलेयॽ हिंदू देवदेवतांना भरपूर नावे असतात. तशी लक्ष्मीलाही आहेत. त्यातील आइसी हे एक. बंगाली लोक मुलामुलींची नावे ठेवताना जणू शब्दकोश उघडून बसतात की काय, कळत नाही. छान छान नावे देतात. हां, तर ही आइसी घोष गेल्या आठ दिवसांपासून देशभरात प्रसिद्ध होऊन बसलीय. जेमतेम साडेचार फूट उंचीची आणि ४० किलो वजनाची ही तरुणी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत स्टुडंट‌्स युनियनची अध्यक्ष आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ती स्टुडंट‌्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) तर्फे बहुमताने निवडून आली. ती राज्यशास्त्र या विषयात एम.फिल. करते. तिच्यावर अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात तिच्या कपाळावर जखम झाल्याचे ती सांगते. ती जखमी झाल्याचे खरेच आहे. तिला मारझोड करणारे तिच्यासारखेच डावे कसे असतीलॽ परंतु प. बंगालच्या प्रदेश अध्यक्षांनी ती उगाच बँडेज बांधून लाल रंग ओतून घेऊन नाटक करतेय असे कोलकात्यात बसून म्हटले. झाले! वृत्तवाहिन्या बेलाशक खोटे वार्तांकन करतानाही त्यांच्यापैकी एकीनेही तसे कधी म्हटले नाही. तिचा रक्तबंबाळ चेहरा, प्लास्टर घातलेला हात, सारे सारे पुनःपुन्हा तपासूनच प्रक्षेपित झालेले. भाजपच्या भक्तांनी आइसीचे छायाचित्र डावे-उजवे करून मोडका हात कोणता याबद्दलही संभ्रम उत्पन्न करून ती खोटारडी असल्याचे प्रचारले. पण तरीही त्यांचाच कॅमेरा एकदाही खोटे बोलला नाही. आइसी स्वतः खमकी निघाली. मुलींना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असे सांगतो अन् हे इकडे भलतेच झालेले. संपले! रस्त्या-रस्त्यावर, गावोगावी आणि कॉलेजा-कॉलेजात, विद्यापीठात मुलीच मुली... एकीनेही ‘मैं भी आइसी’ असा खास भाजपाई प्रचार न करतादेखील तिची कड घेतली. गेला महिना विद्यार्थिनींनी जणू शैक्षणिक राजकारणाचा, नागरिकत्वाचा आणि हिंदू–मुस्लिम ऐक्याचा ताबाच घेऊन टाकला! जामिया मिलिया असो की अलिगढ मुस्लिम; बनारस हिंदू असो की मुंबई; सेंट स्टीफन्स असो की आयआयटी अन् जादवपूर; विद्यार्थिनी हातात झेंडे घेऊन, फलक फडकावत, घोषणा देत वर्गाबाहेर येऊ लागल्या. दांडगाईने देश चालविणाऱ्यांपासून प्रेरणा घेऊन विद्यापीठे चालवू पाहणाऱ्यांना या अराजकीय तरुणींनी हादरवून सोडले आहे. चिंगारी भडकलीय. पोरकटपणा पहा, देशाचा एक माजी शिक्षणमंत्री स्वपक्षाच्याच सरकारला कुलगुरूची उचलबांगडी करायला सांगतोय आणि अवघा थोराड, ज्येष्ठ लोकांचा पक्ष विद्यार्थ्यांशी भांडतोय! तिला भरकटलेली, भडकावलेली, भ्रमित झालेली म्हणतोय!! आपले पोलिस आणि गुंड कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या अंगावर सोडतोय. काय चाललेय हेॽ शोभते काॽ या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही. विद्यार्थी चळवळीत आज उलटा हिस्सा दाखवत इतिहास मात्र घडवीत आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त शिकावे, राजकारणात उतरू नये असे सांगून हे लोक नवी जातीव्यवस्था आणि सोवळेओवळे तयार करीत आहेत. सहा वर्षांपूर्वी अशाच थंडीच्या दिवसात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या नावाने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध निदर्शने करणाऱ्या तरुणाईवर थंड पाण्याचे फवारे सोडून केलेले तिला पिटाळण्याचे प्रयत्न कोण विसरेलॽ ‘मैं भी अण्णा’च्या टोप्या घालणाऱ्यांनी ना ते पोलिस जुमानले, ना जमावबंदी! आज त्या टोप्या घालणारे अनेकजण भाजपची सत्ता विद्यार्थ्यांवर अन् तरुण-तरुणींवर गाजवू पाहत आहेत. अगदी तेव्हाची दांडगाई आणि दहशत उत्पन्न करून. अण्णाही गुपचूप बसून आहेत. तेव्हाची प्रसारमाध्यमे आता गुंडांच्या दंडुक्याला आपला कॅमेरा व दंडुका जोडून बदनामी अन् मुस्कटदाबी करीत आहेत. बरे झाले, अशावेळी आइसी लक्ष्मीच होऊन दिसली नाही. तिने कडकलक्ष्मीचे रूप धारण केलेय. तुला प्रणाम पोरी.... आणि हो, तुम्हा तमाम तरुणींनासुद्धा!