Column / कैद में है बुलबुल

तायडे, ३७० वेळा तुझ्या सबबी ऐकल्या. आता बस्स झाले! 

दिव्य मराठी

Aug 20,2019 08:44:00 AM IST

‘चिमणे, दार उघड!’ कावळ्याची दरडावणी ऐकू आली. चिमणी दचकली. ‘चिऊताई, दार उघड’ असा आर्जवी सूर काढणारा काऊदादा एकदम दादागिरी कसा काय करू लागलाॽ चिऊताई बुचकळ्यात पडली. काय सांगावे त्यालाॽ थांब, माझ्या बाळाला अंघोळ घालतेय सांगू की मीच अंघोळ करतेय असं सांगूॽ थरथर कापत चिऊताई म्हणाली, ‘काय रे दादाॽ किती घाबरले मी? असा एकदम ओरडलास तर...’ कावळा पुन्हा खेकसला, ‘चिमणे, नेहमीची नाटके नकोत ! बाळाला पुढे करून जुन्याच सबबी सांगून आमची फजिती करू नकोस. आम्ही स्वच्छतेचे दूत आहोत. तुझी बाथरूम खूप घाण झाल्याचे समजलेय आम्हाला. तशीच त्या बाळाला अंघोळ घालतेस तिथे ! आम्ही तुझी बाथरूम नवी करून देऊ. शॉवर, गरम पाण्याचा गीझर, सोलार सिस्टिम, निळ्या टाइल्स, सुगंधी साबण, फेसदार शाम्पू असे सगळे द्यायचे आहे. हा विकास नको काय तुलाॽ’


चिमणी ऊर्फ चिऊताई आणखीनच घाबरली. या कावळेदादाने बाथरूममध्ये कॅमेरा लावलाय की काय घाण झाली ते सांगायलाॽ नाही तरी मेल्याची नजर तिरळीच! काय सांगावे विचारात पडली. पुन्हा काऊ ओरडा, ‘अगं, किती वेळ लावतेस! तुझ्या बाळाला आम्ही अंघोळ घालणार, तीट लावणार, पावडर लावणार, नवा झगा घालणार...तू काही काळजी करू नकोस. छान, गुटगुटीत होऊन जाईल बाळ तुझे. त्याला चांगले शिक्षण देऊ. चांगल्या कंपनीत नोकरी देऊ. त्यासाठी कारखाने, शाळा, कॉलेजेस उघडू आम्ही तुझ्या घरट्याखाली. लेकरू तुझे पांग फेडेल बघ मोठे झाल्यावर.’


चिऊताईची बोलती बंद ! पोर वाढवायची जबाबदारी आईबाबांची की दूरच्या नातेवाइकांचीॽ तसा काऊ तिचा नातलग नव्हता, मात्र देशबंधू होता. अखेर दोघेही एकाच देशात राहायचे. त्याचा हा प्रस्ताव त्याने आधी आपल्याला धाडून आपल्याला साधे विचारलेसुद्धा नाही याचा राग चिऊताईला आला. पण काय करणारॽ कावळादादा होता. ताकदीने जास्त होता. चिमणी दाराच्या फटीतून पाहू लागली. पुन्हा दचकली. एक जाडजूड, दाढीवाला काऊ जाकीट घालून उभा होता. त्याच्या मागे ५० हजार सैनिक, रणगाडे, मिलिटरी ट्रक आणि सारा लष्करी लवाजमा. आधीचे कमी पडले काय चारपाच लाख सैनिकॽ


चाचरत चिऊ बोलली, ‘दादा, तू म्हणतोस तितकी बाथरूम घाण नाही रे आमची. सुधारणेला, विकासाला खीळ तशी नसते. पण दहा फुटांच्या बाथरूममध्ये सुवासिक वातावरणात शेवटी अंगावरच पाणी ओतायचे ना रेॽ आम्ही काय टबात बसून अंग चोळत नाही बसत श्रीमंतासारखे ! बाळाला अंघोळ घालून, तीट लावून, दूध पाजून, चांगलेचुंगले खाऊ घालून छान वळणही लावते मी. खेळायला जवळ मित्रही आहेत त्याला. बंदूक बंदूक, चोर पोलिस, हिंदुस्थान – पाकिस्तान असे खेळ त्याला नाही खेळू देत. त्यालाही नाही आवडत.’


चिऊताई पुन्हा जुन्याच लटक्या सबबी सांगून वेळकाढूपणा करू लागली हे खवळलेल्या काऊला समजले. त्याला उशीर, अळंकळं अन् अटीतटी मुळीच खपत नसत. तो म्हणाला, ‘तायडे, ३७० वेळा तुझ्या सबबी ऐकल्या. आता बस्स झाले! तुझ्या बाथरूमचे पाणीच बंद करतो बघ. मग कशी तू घालशील अंघोळ बाळालाॽ


त्याला अंघोळीनंतर बाहेर हिंडूही नाही देणार पाहाच तू ! तुला खूप संधी दिली. दोन वर्षे मीही तुला जवळून बघितले. तुझा हट्टीपणा काही जात नाही. किती आपलेपणाने आम्ही तुला बाथरूमची सुधारणा कर सांगायचो. आता बघच. तुझी बाथरूम बंद, पाणी बंद, अंघोळ बंद!’


चिऊताई टरकली. आईने बाळाला अंघोळ घालायचा दिनक्रम एवढा वादग्रस्त कसा काय होऊ शकतो, तिला फार आश्चर्य वाटले. ती बाथरूममध्ये गेली तर काय, पाणीच गायब. बाहेर आली तर सारे बंद. फोन केला पलीकडच्या झाडावरच्या घरट्यात तर फोन बंद. टीव्ही चालू करून पाहिला. तो बंद. रेडिओचा गळा बंद ! घराबाहेर हिरव्या रंगाचा चिरपरिचित गणवेशधारी जरा जास्तीच्या घुश्शात उभा. विकासाचा आरंभ सारे व्यवहार थांबवून करण्याचा प्रकार तिला आणखी भांबावून गेला.


‘चिऊताई चिऊताई, दार उघड,’ अशी मंजूळ चिरपरिचित हाक ऐकू आल्यावर चिऊ तंद्रीतून बाहेर आली. तिने मागचे दार उघडले तर तिची कामवाली चिऊबाई बुरखा पांघरून आलेली. कडेवर तिचे बाळ ! आल्या आल्या म्हणाली, ‘ताई, पाणी संपलेय घरातले. बाळाला अंघोळ घालते तुमच्या बाथरूममध्ये. चिऊला संशय आला. कावळ्याने तर नसेल धाडले हिला लक्ष ठेवायलाॽ पलटी मारणारे खूप पाहिले होते एवढ्यात चिऊने. ती बाईला सांगू लागली, ‘अगं, काऊभाऊने सारेकाही बंद केलेय. त्याला राग आला आपल्या बाळाला अंघोळ घालायला मी नाही म्हटले तर.’ बाथरूमचा विकास करण्याचा त्याचा बेतही चिऊने सांगून टाकला.


डोळे विस्फारून ती गरीब कामवाली चिऊबाई आपल्या चिऊला सांगू लागली, ‘काही नाही चिऊताई, आपले घरटे मेणाचे आणि काऊचे शेणाचे म्हटल्यावर घाण कोणाचे असेल सांगा बघूॽ ही स्वारी आपली नवी बाथरूम बांधायला घरात शिरली तरी खूप राडा करून ठेवेल बघा. दोन वर्षांपूर्वी होतेच की त्याचे घरटे इथे ! ३७० सबबी नाही आठवल्या त्याला तेव्हाॽ

X