column / आयाराम-गयाराम जय श्रीराम आणि खडसेंना मात्र रामराम

विरोधकांनी दुसऱ्या दिवशी एकनाथ खडसेंवर अन्याय झाल्याचाही आवाज उठवला

त्र्यंबक कापडे

Jun 20,2019 10:15:00 AM IST

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर साधला गेला. पाच अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देत तीन अामदार नसलेल्या, पण दुसऱ्या पक्षातून भाजपत आलेल्यांना थेट मंत्री बनवले गेले. नवीन १३ मंत्री घेताना एकनाथ खडसे यांच्यासाठी मात्र एकही खाते नसावे? याचे त्यांच्या समर्थकांनाच काय संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य वाटले नसेल तर नवल. एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोच खडसेंची प्रतिक्रिया आली. त्यांनी आयारामांवर टीका करताना आपल्याला आता मंत्रिपदात रस राहिलेला नाही; पण जे पक्षात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्यावर मोठा अन्याय आहे, असे बोलण्यास मात्र ते विसरले नाहीत. ज्या पाच मंत्र्यांना डच्चू देण्यात आला त्यांनीही शपथविधीला उपस्थिती न देता अप्रत्यक्ष नाराजीच दर्शवली आहे. डच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांना अकार्यक्षम ठरवण्यात आले. ज्या मंत्र्यांना अकार्यक्षम ठरविले, त्यांचे बहुदा आगामी निवडणुकीत तिकीटही कापले जाण्याची शक्यता आहे. कारण अकार्यक्षम मंत्र्यांना लोकही पुन्हा आमदार म्हणून निवडून देतील की नाही? विशेष मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे, त्यांचा परफॉर्मन्स गेली साडेचार वर्षे मुख्यमंत्र्यांना का दिसला नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत ते असा कोणता विकास घडवून आणणार आहेत? हे मुख्यमंत्र्यांनाच माहित. कारण जळगाव, धुळे आणि अहमदनगर या तीन महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी सहा महिन्यांत शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्याची भाषा करणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांनी अजून एकाही मोठ्या कामाचा मुहूर्त साधला नाही. तेव्हा हे नवीन मंत्री काय करतील? याबद्दल अनेकांना शंकाच आहे. अर्थात, हेही तेवढेच खरे आहे की, शेवटच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा विकासाचा अजेंडा नव्हे तर निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन तो करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीच भाजपने काँग्रेसच्या बड्या नेत्याला गळाशी लावले आणि मंत्रिपदाचा टिळाही लावला. हे करत असताना उत्तर महाराष्ट्रातील स्वपक्षातील बडे नेते एकनाथ खडसे यांचा मात्र काहीही विचार केला गेला नाही. जळगावात मंत्री गिरीश महाजनांच्या रुपात खडसेंना भक्कम पर्याय उभा करण्यात मुख्यमंत्री फडणवीसांना यश आले आहे. त्यामुळे खडसे त्यांच्यासाठी आता अदखलपात्र झाले आहेत; हेही या विस्तारात दिसून आले. खडसेंवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाची अधिवेशन काळात घोषणाबाजी करून विरोधकांनीही त्यांची दखल घेतली. पहिल्या दिवशी ‘आयाराम, गयाराम जयश्रीराम’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांनी दुसऱ्या दिवशी एकनाथ खडसेंवर अन्याय झाल्याचाही आवाज उठवला.

X
COMMENT