आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयदेव डाेळे   संपादकांनी दिसायचे नसते, असे जुने जाणते लाेक सांगायचे. कारण संपादक काेण, कसा असताे यापेक्षा ताे काय लिहिताे अन् सांगताे हे महत्त्वाचे. म्हणून शब्द महत्त्वाचा, शरीर नव्हे. महाराष्ट्रात खूप संपादक असे अदृश्य हाेऊन गेले. ना कधी त्यांचे छायाचित्र त्यांच्या वृत्तपत्रात येई, ना ते निरनिराळ्या मंचावर अवतीर्ण हाेत. विचार समाेर यावा, आकार कशासाठी, असा त्यांचा स्वत:वरच स्वत:चा धाक असे. जे संपादक कार्यकर्ते हाेते वा नेते अन‌् स्वातंत्र्यसैनिक हाेते त्यांची गाेष्ट निराळी. त्यांच्या लेखी शब्द व माणसे सारखीच. दाेन्ही त्यांच्याभाेवती गाेळा हाेणार म्हणजे हाेणार. कर्तृत्वच इतके माेठे की ते माणसे आणि शब्द समाेर खेचून आणे !  फार दिवसांनी म्हणजे वर्षांनी आचार्य अत्र्यांसारखी महाराष्ट्राला आपल्या शब्दांसह समाेर येत एक संपादक व्यक्ती चांगली परिचित झाली. संपादकाला चक्क वाचकापेक्षा प्रेक्षक दांडगा लाभला !  स्वत:चे बातमीदार बातम्या मिळवण्यासाठी इकडेतिकडे पळणारा संपादक, त्याच्या पाठीमागे बातमीदार पळत आहेत आणि ताे स्वत:च बातमीचा विषय बनला असे महाराष्ट्र पाहू लागला. भयंकर म्हणजे भयंकर दृश्य ते! महाराष्ट्राचे मानबिंदू, विचारबिंदू आणि जाहिरातबिंदू तडफडू लागले. त्यांचे संपादक जळफळू लागले. ‘ऊत आलाय नुसता’ असे म्हणत धुसफुसू लागले. आपल्या जमातीतला एक जण असा दर ताशी साठ सेकंद वेगाने झळकू लागल्याचे त्यांना सहन हाेईना. काय ती टीव्हीची दांडकी समाेर ठेवून बाेलताेय, काय ते कॅमेऱ्यासमाेर सराईत अभिनेत्याप्रमाणे वावरताेय आणि काय ती वन लायनर्स फेकताेय.... ताेबा ताेबा संपादक आहे की भंपादक, आँ? अहाे हा कसला संपादक? प्रचारक नुसता. आमचे बघा. आम्ही कधी मुख्यमंत्र्यांना असे हिणवले कधी? त्यांची थट्टा केली कधी ? कित्येक वर्षांनी असा स्वच्छ, निर्जंतुक, अप्रदूषित, पारदर्शक माणूस राज्य करू लागला हाेता इथे. त्याच्या खुर्चीवर यांचा डाेळा. अर्धी खुर्ची आम्हाला द्या असे म्हणणे. अशी महत्त्वाची खुर्ची वाटून कशी घेता येईल? आम्ही संपादक कधी म्हणताे का आमच्या कनिष्ठाला ‘कंटाळा आला बुवा या खर्डेघाशीचा. तू संभाळ आता!’ नाही ना? आम्ही रजेवर जाताे तेव्हासुद्धा आमच्या खुर्चीवर काेणाला बसू देत नाही. कुलूप लावून जात असताे आम्ही आमच्या खाेलीला!  गाडीदेखील पाठवत नाही काेणाला. चालकाला सांगताे, तूही घेऊन टाक सुटी. आम्ही नसलाे तरी अग्रलेख येतात छापून आमच्याच नावावर बरे का ! अशी असते ताकद खुर्चीची अन् हे निम्मा वाटा द्या म्हणतात. अहाे, फाेन केला की हा मुख्यमंत्री जिथे असेल तिथून बाेलायचा. आमचे एेकायचा. भेटीला बाेलवायचा. यांचा अर्धा कारभार सुरू झाल्यावर काेण आेळखेल आम्हाला? फाेन काेणाला करायचे आम्ही? आमची (म्हणजे मालक लाेकांची) कामे करून देणार? काही खरे झाले नसते महाराष्ट्राचे. बाकी, हा संपादक आहे राष्ट्रवादी पण फितूरही आहे ‘राष्ट्रवादी’ला. तिकडचे साहेब पावसात भिजून सभा जिंकून परतले. इकडे याने इस्पितळात शल्यक्रिया करवून घेऊन दुसऱ्या दिवशी अग्रलेख लिहितानाची छायाचित्रे वाहिन्यांना पाठवली !  सहानुभूती मिळवताे पठ्ठा !! चाैथ्या दिवशी हा पुन्हा टीव्हीच्या दांडक्यांशी सामना करू लागला. तरी बरं ‘थेट आयसीयूमधून’ असे काही या माणसाने केले नाही. त्या इस्पितळावर जायबंदी हाेण्याची वेळ आली असती. लीलावतीत आमच्या बातमीदाराच्या लीला अख्ख्या महाराष्ट्राला पाहाव्या लागल्या असत्या. वर हा म्हणाला असता, या स्टाइलने फक्त आम्हीच काम करतो असे नाही. आमच्या शत्रूंचे सैनिकही करतात... आम्हाला शत्रू म्हणतो काय ! अरे, ज्या लोकांसाठी तू संपादक म्हणून कैवारी झालेला होतास, ते एकमेकांना शत्रू मानत नाहीत. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू-मित्र असत नाही असा त्यांचा मंत्र. इथे आम्ही संपादक पलीकडच्या रस्त्यावरील पेपरच्या संपादकाचे थोबाडही पाहणे टाळतो. आम्हीच नंबर वन ठरवून मोकळे होतात सगळे. इतके एक नंबर एका जागेवर कसे राहू शकतील? त्यांचा एक नंबर आला की आम्हाला आमचे मालक पिटाळतात ना बाजारात !  म्हणतात, जा, वाचक मिळवा, खप वाढवा. आम्हाला तुमचे उदाहरण देऊन सांगतात, बघा, त्या संपादकाला आता प्रेक्षकसुद्धा प्राप्त झालेलाय !  तो सरकार पाडतो. सरकार बनवतो. खुर्ची काढून घेतो आणि खुर्चीवर बसवतो...फार वर्षांपूर्वी ‘टाइम्स’चे दिलीप पाडगावकर त्यांचे संपादकपद पंतप्रधानापेक्षा ताकदवान असल्याचे जरा बेभानावस्थेत म्हणून गेले आणि मालकाने त्यांना प्रदीर्घ विश्रांतीला धाडून दिले ! तसे याचे काही नाही. त्याने आम्हा राव्हयल संपादकांना फार छळले हो. पंधरा दिवस अविश्रांत काम नि काम. वर मालकांची बोलणी की पाहा, कसा वाकवतोय महाराष्ट्र ... तुम्ही कुठं आहात? (आम्ही तेव्हा मालकांपुढे वाकलो होतो)  

बातम्या आणखी आहेत...