आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लँडर आणि आयलँडर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांद्रयानातून चंद्राच्या दिशेने झेपावलेला विक्रम लँडर भारतीय अर्थव्यवस्था अन् केंद्र सरकार यांच्यासारख्या स्थितीत जाऊन पडलाय. पडलाय म्हणजे आदळलाय की ठेचकाळलाय की धडपडलाय समजत नाही. संपर्कच नाही कुणाचा कुणाशी ! अर्थमंत्री बाई बोलतात काय अन् अर्थव्यवस्था कण्हते काय, त्याचाही थांगपत्ता लागेनासा झालाय. पाच ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या अर्थव्यवस्थेकडे जाऊ पाहणारा इंडिया लँडर दाणकन आदळलाय. आधी अरुण जेटली, मग पीयूष गोयल आणि आता निर्मलाताई यांच्या पकडीतून जो निसटला तो निसटलाच. अलगद उतरायच्या ऐवजी इंडिया लँडर चांगलाच आपटलाय. किती प्रेमाने चांद्रयान -२ प्रमाणे त्याने मोदी - २ या यानाशी आपली जोडणी करून टाकली होती. आता बस्स झेपावत पुढे जात राहायचे असे स्वप्न हा इंडिया लँडर पाहू लागला होता. पण कसचे काय! देखवले नाही हो विरोधी पक्षांना. काँग्रेसच्या काळातील स्पेस सेंटरमधून उ्डडाण करायचे म्हटले की असेच व्हायचे...] विक्रम लँडरची फार काळजी वाटते हो आम्हाला. बिचारा एकटा पडलाय ! एक कुजका काँग्रेसवाला म्हणाला की, एवढे धडपडायचेच होते तर अवकाशात कशाला जायला हवे? औरंगाबादेतल्या कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही वाहनातून जा. धराशायी व्हायला वेळच लागणार नाही तुम्हाला ! मदरलँड कवटाळण्यात किती देशभक्ती असते, कल्पना नाही तुम्हाला. आईच्या कुशीत जायला लाज कशाला बाळगायची? वरती विक्रम लँडर आणि औरंगाबादेत विक्रमी लँडर्स ! नाहीतरी मराठवाडा अजूनही विकासाच्या वाटेवर अडखळतोय. चला, धडपडा, पडा, पुढे चला, हा अनुभव आहेच. इकडे दिल्लीत नितीन गडकरीही एकटे पडलेत हो ! नितीन आयलँडर झालेत ते. स्वत:च एका वाहतूक बेटावर गेले अन् ट्रॅफिक कंट्रोल करत सुटले. देशात अपघात खूप होऊ लागल्याने त्यांनी चार ते पाच आकडी दंड लावायला सुरू केले आणि स्वत:च दंडित झाले. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या करोडो उद्धट, उर्मट अन् उनाड भारतीयांना या भरभक्कम दंडाची जरब बसेल असे नितीनरावांना वाटले. कसचे काय ! देशाला सध्या नरेंद्रभाई व अमितभाई यांचीच जरब पुरते. त्यांची जरब घटेल असे कुणी काही करायचे नसते हे गडकरीजी विसरले. झाले !  खुद्द गुजरात सरकारकडून गडकरी यांच्या नव्या नियमांची झिडकारणी आरंभली. मुख्यमंत्री रूपाणी यांची एकट्याची हिंमत असेल का हो केंद्रीय कायदा झुगारून देण्याची? शक्यच नाही. फार कौतुक करवून घेतो काय; कार्यक्षम, कार्यकुशल, निष्कलंक मंत्री म्हणून? छे आता ! बस एकटा आणि चरफडत राहा, असा डाव साधला गेलाय. वरती विक्रम संपर्कहीन झालाय, खाली नितीन ! आधी गुजरात, मग महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड अशी भाजपची राज्येच या नव्या नियमांचा रेड सिग्नल झुगारून जात आहेत. आता बोला ! आदळआपट म्हणायची याला की ठरवून केलेला अपघात? ७ ऑगस्टला मोटर व्हेइकल अॅक्ट, २०१९ संसदेत मंजूर झाला. वाहतूकमंत्री म्हणून गडकऱ्यांनी उत्तम भाषण केले. अपघात, मृत्यू, जखमी आदींची आकडेवारी देऊन प्रभावित केले. परवा म्हणाले, माणसाच्या जिवापेक्षा का दंडाची रक्कम मोठी? आम्हाला साने गुरुजींचीच याद आली ! एवढे जबर दंड भरायला लावून सरकार आपली तिजोरी भरत नाही, असा खुलासाही मंत्र्यांनी केला. आम्हाला सत्यनिष्ठ महात्म्याची आठवण झाली ! गडकरीजी हे विसरले की सदर महात्म्यास स्वच्छतेच्या कामी जुंपण्यास आले असून सत्याची झाडलोट कचऱ्यात जमा झालेलीय. साने गुरुजी गुजरातीत अनुवादित झालेत, पण सध्या धूळ खात आहेत. तिकडे विक्रम लँडर चंद्रावर धड लँड होऊ शकले नाही, पण ‘इस्रो’चे के. सिवन यांचे यान टेक ऑफ घेऊन उंच उडू लागलेलय. साक्षात पंतप्रधानांचा खांदा अश्रुपात करायला त्यांना मिळाला हा केवढा मोठा चंद्रयोग म्हणावा ! पण आमच्या आयलँडरला असा कुणाचाही खांदा मिळणार नाही अश्रू गाळायला.  एकट्या माणसापाशी जायलाही भीती वाटते हो दिल्लीत. अख्खा कायदाच जिथे अडखळू लागला तिथे कायदा करणारा मंत्री अडणार नाही तर काय होईल दुसरे? नवा मोटार वाहन कायदा जोरात आदळलाय. अपघातात जायबंदी झालाय. आता म्हणे गडकऱ्यांचे खाते ज्या राज्यांनी कठोर दंडात्मक कारवाई पातळ केली त्याविषयी कायदेशीर सल्लामसलत करू लागलेय. या कायद्यात दंडाच्या ६३ तरतुदी आहेत. हा ६३ चा आकडा ३६मध्ये बदलून गेलाय. परिवहनमंत्र्यांची पाठराखण करायला एकही बडा मंत्री पुढे येऊ नये म्हणजे काय? दया, कुछ तो गडबड है...

बातम्या आणखी आहेत...