आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारी आजही मराठी माती कसते आहे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारकरी परंपरा असंघटित संघटन आहे. हे वर्णन विचित्र वाटत असलं तरी तीच संघटनेची अस्सल भारतीय पद्धत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि त्यांचे एकाच विचाराचे आदेश पाळणारे अनुयायी, ही रचना आपली कधीच नव्हती. आपण सगळ्यांना स्पेस देणारे मोकळेढाकळे लोक आहाेत. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार आणि आवडीनुसार योग्य वाटेल ते अनुसरावं, असं मानणारा, एकमेकांचा आदर करणारा आपला इतिहास आहे. 
रेजिमेंटेशन म्हणजे सैनिकीकरण ही संघटित संघटनेची गरज असते. कोणत्याही संघटित संघटनेची वाटचाल त्याच दिशेने होते. त्यातून नकळत आणि अपरिहार्यपणे शोषणाच्या पायऱ्या उभ्या राहतात. वरच्या पायरीवर असणाऱ्यांना इच्छा असो वा नसो, खालच्या पायरीवरच्याची पिळवणूक करावी लागते. त्या पिळवणुकीच्या समर्थनात वरच्यांसाठी तत्त्वज्ञान उभं केलं जातं आणि खालच्यांसाठी धर्म. खरं तर मोकळा करतो तो धर्म. पण इथे धर्मच हजारो वर्षं पिचलेल्यांसाठीचं जोखड बनला. त्याविरोधात देशभरातल्या संतांनी मोठं बंड केलं. त्यासाठी संघटन केलं. म्हणजे लाखो लोक एकमेकांशी जोडले. त्याला आधार होता भक्तीचा म्हणजेच प्रेमाचा. असंघटित संघटना ही संघटित धर्माविरुद्धचा विद्रोहच होता. त्याची लवचिकता हीच त्याची जबरदस्त ताकद होती. त्यामुळे ते वर्षानुवर्षं टिकलं. आजही टिकलंय.


कोणतंही संघटन, मग ते असंघटित असो किंवा संघटित, त्याला कार्यक्रम लागतो. वारकरी परंपरेचाही त्यासाठीचा मुख्य कार्यक्रम होता, वारी. प्रत्येक दिंडीचे नियम वेगळे, रीतिरिवाज वेगळे, भजनं वेगळी, त्यांच्या चाली वेगळ्या, तरीही सगळ्या दिंड्यांनी बनलेल्या पालखी सोहळ्यातली एकसूत्रता, समानता, एकता आणि सर्वसमावेशकता टिकून राहिलीय. ती अनुभवायची गोष्ट आहे. त्यामुळेच वारी वाढतेय. फक्त पालखी सोहळाच नाही, तर वारकरी परंपरेलाही बंधनांच्या चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न वारंवार झालाय. उत्तर पेशवाईत सवाई माधवरावाने विठ्ठल मंदिर परिसरात अस्पृश्यांना प्रवेशबंदीचा हुकूम काढला. जातीयवादाचा कळस असणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाने एका ब्राह्मण कीर्तनकाराने शूद्र तुकोबांचा अभंग कीर्तनात घेतला म्हणून त्याला शिक्षा दिली. त्यानेच पंढरपूरला पिकनिक स्पॉट करून इथे यज्ञयागाचा आणि कर्मकांडांचा धडाका लावला.किमान तेव्हापासून तरी वारकऱ्यांना अनाडी, नेभळट ठरवून त्यांना नेमनियमांच्या गाठोड्यात बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला रा. चिं. ढेरे म्हणतात तसं विठ्ठलाचं वैदिकीकरण म्हणता येईल किंवा ब्राह्मणीकरण म्हणता येईल किंवा कट्टर धर्मवादी राजकीयीकरणही म्हणता येईल. त्याच्या इतक्या वर्षांचे दुष्परिणाम होणारच. पण त्यातूनही वारकरी परंपरा थोडी फट मिळताच आपलं सत्त्व दाखवून देते. साध्यासाध्या वारकऱ्याच्या बोलण्यातून ते अनेकदा सापडतं.


आज एकीकडे बायकांनी कीर्तन करू नये म्हणणारे मोठमोठे महाराज आहेत. दुसरीकडे महिला कीर्तनकारांची संख्या वाढतेय. दलितांचा मंदिर प्रवेश होणार म्हणून बाटण्याआधी विठ्ठल मूर्तीतलं देवपण कळशीत भरून ठेवण्याचा मूर्खपणा आजही पुजला जातोय. सोवळं-ओवळंही आहे. तरीही आज विठ्ठलाचा पुजारी होण्यासाठी ब्राह्मण असण्याची गरज उरलेली नाही. वारकरीही कर्मकांड, व्रतवैकल्यांत गुरफटलाय. तरीही `योगयाग विधी, येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधि, दंभधर्म’, अशी विवेकाची टोचणी रोजचा हरिपाठ देतोच आहे.


तुकोबांनी ज्याला न्हाव्या भटा झाली धनी म्हणून हिणवलंय, त्या कुंभमेळ्यात जाऊन महामंडलेश्वर बनण्यात वारकरी कीर्तनकारांना काहीच लाज वाटत नाही. तरीही साधा वारकरी मात्र वारी सोडून कुंभमेळ्याच्या वाटेवर जाताना दिसत नाही. राज्यघटनेला फोल ठरवणाऱ्या निवृत्ती महाराज वक्तेंना राज्य सरकार ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ देतं. पण दुसऱ्याच वर्षी कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर ‘संविधान दिंडी’ काढतात. एकीकडे फडांमध्ये गुरूगिरीची थेरं सुरू झालीत. दुसरीकडे डॉ. सदानंद मोरेंसारखे विचारवंत आळंदीत उघडपणे बजावताहेत, ‘वारकरी संप्रदायात गुरुपौर्णिमा सुरू झाली म्हणजे त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली म्हणून समजा.’ ही सारी संतांच्या विचारांची कमाल आहे. साडेसातशे वर्षं त्यांचे विचार मराठी माती आणि मराठी मनांची मशागत करताहेत. माझ्यासारख्या साध्या पत्रकाराला हे सारं स्वतःचा ठेवा म्हणून सापडत गेलंय, ते ‘रिंगण’मधून. दिवाळीचे अंक असतात, मग महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सोहळा असलेल्या आषाढीचे अंक का नकोत, या प्रश्नाचं उत्तर म्हणून ‘रिंगण’ सुरू झालं. दरवर्षी एका संताच्या आजच्या काळातल्या पाऊलखुणा शोधण्याचं काम आम्ही पत्रकार मंडळी त्यात करतो. तो आमच्या स्वतःचा शोध आहे. आमच्या मुळांचा शोध.


संत नामदेव, चोखा मेळा, जनाबाई, निवृत्तीनाथ, विसोबा खेचर, गोरा कुंभार यांच्यावरच्या अंकानंतर यंदा संत सावता माळी यांच्यावरचा अंक आषाढी एकादशीला पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रकाशित होतोय. देव सोपा आहे. धर्म सोपा आहे. भक्ती सोपी आहे. असं सांगत आपल्या सगळ्यांचं जगणं सोपं करणारे सावतोबा आम्हाला भेटले आहेत. ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात,’ असं सांगणाऱ्या सावतोबांनी अंधश्रद्धेविरुद्ध आणि सर्व प्रकारच्या मध्यस्थांविरुद्ध बंड केलंय. ‘देवा मला ब्राह्मण केलं नाहीस ते बरं केलंस,’ असा जातभेदाच्या विरोधातला थेट एल्गार करणारे जोतिबांचे पूर्वसुरी म्हणून ते आम्हाला भेटलेत. धर्माच्या दुकानदारांनी तुमच्या माझ्या गुलामगिरीसाठी रचलेले व्यूह भेदण्याचा सोपा रस्ता सावतोबांनी इतर संतांसारखाच दाखवून दिला. फक्त तो लगेच दिसत नाही. ताे निरखून पाहावा लागतो.
 

बातम्या आणखी आहेत...