Home | Editorial | Columns | divyamarathi column on virat kohli

कोहलीचा करिष्मा संपला की कर्स्टनचा?

विनायक दळवी | Update - Apr 12, 2019, 09:59 AM IST

. त्याच्या संघाने नोंदवलेली मोठी धावसंख्याही त्याला लढण्यासाठी, संघाला विजयी करण्यासाठी कधीही पुरेशी ठरली नाही

 • divyamarathi column on virat kohli


  या शतकातला सर्वोत्तम क्रिकेट समालोचक ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व यशस्वी कप्तान रिची बेनॉ याने क्रिकेट कप्तानांच्या नेतृत्वकलेचे छान विश्लेषण केले आहे. बेनॉ म्हणतो, 'नेतृत्व म्हणजे ९० टक्के नशीब आणि १० टक्के नेतृत्वगुण. मात्र, ते ९० टक्के नशीब १० टक्के नेतृत्वगुणाशिवाय आजमावू नका.' भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याच्या नेतृत्वगुणाची सध्या चाललेली फरपट पाहिली की रिची बेनॉचे हे विधान पुन्हा पुन्हा आठवते. भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या कोहलीचे आयपीएल स्पर्धेतील गेल्या एका तपाचे नेतृत्व पाहिले की कोहली निर्णायक १० टक्क्यांत कमी पडतो, असे वाटते. गौतम गंभीरने जाहीरपणे कोहलीच्या या उणिवांवर बोट ठेवले आहे.


  आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक स्फोटक फलंदाजांच्या टीमचे (बंगळुरू) नेतृत्व करण्याची संधी कोहलीला मिळाली. गेल्या दशकात तर त्याच्याकडे ख्रिस गेल, डिव्हिलिअर्स आणि तो स्वत: असे तीन विश्वविक्रमी, स्फोटक फलंदाज त्याच्याकडे होते. त्याच्या संघाने नोंदवलेली मोठी धावसंख्याही त्याला लढण्यासाठी, संघाला विजयी करण्यासाठी कधीही पुरेशी ठरली नाही.

  हे अपयश अर्थातच कोहलीच्या नेतृत्वगुणांचे आणि गोलंदाजांचे. गोलंदाजांना योग्य वेळी आणि योग्य त्या प्रकारे हाताळणे, यातच कप्तानाचे यश असते. ते सौरव गांगुलीला, महेंद्रसिंग धोनीला, अजिंक्य रहाणेला उत्तम जमायचे. कोहली त्याबाबतीत कमी पडतो हे वारंवार स्पष्ट झाले आहे. दुर्दैवाने कोहलीला लाभलेल्या प्रशिक्षकांचीही फारशी मदत योग्य मार्गदर्शनाच्या बाबतीत झाली नाही. इतरांचे सोडा, भारतीय क्रिकेट संघाला यशस्वी करण्याचे श्रेय उपटणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनलाही कोहलीच्या बुडत्या जहाजाला तारता आले नाही.

  संघ यशस्वी ठरला की खेळाडूंच्या कर्तृत्वाला फारसे महत्त्व न देता आपण कप्तान व प्रशिक्षकाच्या गुणांचे गोडवे गायला लागतो. खरं तर कप्तान व प्रशिक्षकांनी नवोदित किंवा फारशा अनुभवी नसलेल्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेतली की वाहव्वा करायला हवी. जे काम शेन वॉर्नने आयपीएलच्या पहिल्या हंगामात केले होते. अजिंक्य रहाणेने केले होते. झहीर खानने दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी केले होते. या सर्वांच्या नेतृत्व कौशल्याचे प्रमाण आपल्याला त्या वेळी मिळत होते. चांगली सुरुवात अर्धी लढाई जिंकून देते. कोहलीची सुरुवातच खराब झाली. चेन्नईच्या आखाड्यात सलामीलाच त्याला शंभर धावांचे पाठबळही मिळाले नाही. दुसऱ्या लढतीत 'एका षटकाराने' त्याचा विजय हुकला; त्या वेळी पंचांनी 'नो बॉल'कडे कानाडोळा केला. बंगळुरूची नाडी घसरली ती कायमची. १० टक्के दैवाची साथ अशा वेळीच ९० टक्के नेतृत्वगुणाला न्याय देते. येथे कोहली कमनशिबी ठरला हेही तितकेच खरे. कोहलीच्या नेतृत्वातील या आयपीएल अपयशाचा येत्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करताना परिणाम होऊ नये ही अपेक्षा आहे.


  विनायक दळवी
  vinayakdalvi41@gmail.com

Trending