आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरव ‘द फायटर’!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायक दळवी
 
भारतीय क्रिकेट जेव्हा जेव्हा संकटात आले, तेव्हा तेव्हा ‘त्याला’ साद घालण्यात आली. तो वंगवासी योद्धा प्रत्येक वेळी शूरासारखा मैदानात उतरला, लढला आणि प्रत्येक युद्ध त्याने जिंकले. भारतीय क्रिकेट संघाला त्याने विजयाची सवय लावली. तो तरुण, नवोदित क्रिकेटपटूंना सांभाळून घेणारा, प्रेरित करणारा कप्तान होता. बेटिंगच्या वादळात त्याने सुकाणू हाती घेतले आणि भारतीय क्रिकेटचे भरकटलेले तारू स्थिरावले. पराभवाच्या गर्तेतील संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढले, लढण्याची जिद्द दिली, नवी आशा दाखवली. क्रिकेटपटूंच्या चुकीच्या कॉन्ट्रॅक्ट विरुद्ध तो दालमियांविरुद्धही लढला. गेली तीन वर्षे भारतीय क्रिकेट निर्नायकी झाले असताना पुन्हा एकदा त्याला साद घालण्यात आली. त्याने या आव्हानाचाही स्वीकार केला. या लढवय्या योद्ध्याचे नाव सौरव गांगुली.

गेल्या तीन वर्षांत भारतीय क्रिकेट एवढे पंगू झाले आहे की ‘आयसीसी’ने भारताची सर्व स्तरावरील मक्तेदारी संपविली. भारताच्या हक्काचा मोठा आर्थिक हिस्सा काढून घेतला. अधिकार गोठविले. सत्तर ते ऐंशी टक्के उत्पन्न भारतामुळे मिळत असतानाही आर्थिक स्तरावर कोंडी करण्यात आली. सौरव गांगुलीचे पहिले युद्ध या ‘आयसीसी’बरोबर आहे. प्रशासकांच्या तीन वर्षांच्या काळात भारतीय क्रिकेटची तर पुरती वाट लागली आहे. स्थानिक स्तरांवरील क्रिकेट ढेपाळले आहे. यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्या क्रिकेटला विश्वास आणि दिशा देण्याचे आव्हान सौरवपुढे आहे. तिसरे आव्हान त्यापेक्षाही विचित्र आहे. ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे दुहेरी लाभाच्या मुद्यावरुन सर्वच भारतीय क्रिकेटपटूंची अडवणूक करण्यात येत आहे. यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंची सेवा ‘बीसीसीआय’ला घेता येत नाही. परिणामी चांगला सल्ला आणि अनुभवाला भारतीय क्रिकेट वंचित झाले आहे.

आणखी एक विचित्र योगायोग हा, की विजयनगरच्या महाराजांनंतर तब्बल पासष्ट वर्षांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी क्रिकेटपटूची निवड होत आहे. दरम्यानच्या काळात हातात बॅटही न घेतलेले अनेक जण अध्यक्ष होते. क्रिकेटपटूंना प्रशासन व्यवस्थेतील काय कळतं? असे विचारत या मंडळींनी क्रिकेटपटूंना सतत दूर ठेवले. हौशी खेळाच्या बुरख्याआडून त्या सर्वांनी कोट्यवधींचे गैरव्यवहार केले. भ्रष्टाचार झाले. निकाल निश्चितीची कीड या खेळाला लागली. तरीही क्रिकेटच्या प्रवाहात खेळाडूंना सामावून घेण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. सौरवच्या आगमनामुळे यापुढे हे चित्र बदलेल. याचे श्रेय अर्थातच सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेला आणि निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांनी केलेल्या शिफारसींना आहे. न्या. लोढांच्या शिफारशींमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि खुर्चीला चिकटून बसलेल्या अनेकांचा मार्ग आणि प्रवेश बिकट झाला. गेल्या तीन वर्षांच्या काळात प्रशासनातील गोंधळ भारतीय क्रिकेटला बरेच मागे घेऊन गेला. त्यामुळेच आपापसातील वैर, मतभेद व प्रतिष्ठा विसरून ‘बीसीसीआय’मध्ये प्रबळ असलेले श्रीनिवासन आणि प्रतिस्पर्धी गट एकत्र आले. त्यांनी सौरवला एकमताने अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. 

सध्या भारतीय क्रिकेटला अशा क्रिकेटपटूची गरज होती जो आक्रमक आहे, धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि क्रिकेटमधील सारे खाचखळगे त्याला ठाऊक आहेत. त्यामुळे सौरव गांगुली हा एकमेव चेहरा सर्वांच्या नजरेसमोर होता. मात्र, ते करतानाही भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले. ब्रिजेश पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले असताना अचानक सौरवमध्ये कसा टपकला? ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे केंद्रातील मंत्री अनुराग ठाकूर मुंबईत दाखल झाले आणि चित्र पालटले. ते सौरवला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे घेऊन गेले आणि आधी ठरलेला निर्णय अचानक बदलला. सौरवचा बंगाली जनतेला अत्यंत अभिमान आहे. आतापर्यंत सौरवने ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार केला होता. भाजपाने नेमका हाच मुद्दा ‘एनकॅश’ करून सौरवला अध्यक्ष बनविले, अशी चर्चा आहे. दहा महिन्यांनंतर अध्यक्षपदाचा कालावधी संपला, की सौरवला चक्क भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याबाबत ठरल्याचेही कळते. कदाचित पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत सौरव भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, अशीही चर्चा जोरात आहे. सौरवने मात्र या गोष्टी फेटाळल्या असून, आपल्याला कुणीही भेटले नसल्याचे म्हटले आहे.

पुढील दहा महिन्यांच्या कालावधीत सौरवला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. स्थानिक क्रिकेटला पुढे आणण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर आहेच; शिवाय रणजीपटू, कुमार व किशोरवयीन क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन, क्रिकेट प्रशिक्षण केंद्रे, मैदाने आणि खेळपट्ट्यांची अवस्था असे अनेक प्रश्नही प्राधान्याने सोडवावे लागतील. 

अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत सौरवला अनेक लढाया लढायच्या आहेत. भारतात स्वकियांविरुद्ध आणि भारताबाहेर ‘आयसीसी’ आणि तेथील भारताच्या शत्रूंविरुद्ध दोन हात करावयाचे आहेत. सौरव लढवय्या आहेच. भारतीय संघाबाहेर गेल्यानंतर पुन्हा रणजीमध्ये खेळून भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या सौरवने कारकिर्दीत अठरा हजार धावा फटकावताना क्रिकेट पंडितांनाही खोटे ठरविले. त्याला पुन्हा एकदा आपल्यातील या विजूगिषी वृत्तीचा प्रत्यय द्यावा लागेल. 

ही लढाई बॅटने नव्हे, तर डोक्याने लढावी लागणार आहे. वेळ कमी आणि आव्हाने जास्त आहेत. टी ट्वेंटीच्या जमान्यात त्याला झटपट क्रिकेटप्रमाणे डावपेच लढवावे लागतील. क्रिकेटपटूंचा आदर्श आणि प्रशासन क्षमतेचा नवा अध्याय त्याला 
लिहावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...