आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय दिनाचा संकल्प!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारगिलमध्ये घुसखोरी करण्याची पाकिस्तानने केलेली आगळीक मोडून काढत भारताने ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून पाकला लगावलेल्या सणसणीत चपराकीला आज वीस वर्षे होत आहेत. आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमाच्या गौरवार्थ २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा करायलाच हवा. पण, तो करताना उत्साहाचे रूपांतर सामाजिक व राजकीय उन्मादात होणार नाही, याचे भानदेखील बाळगले जायला हवे. सद्य:स्थितीत कट्टरतेचे मळभ सर्वत्र दाटत असताना तर ते अधिकच अगत्याचे आहे.


कारगिल विजयाला दोन दशके उलटत असताना १९९९ मधील काश्मीरची स्थिती आणि आजची स्थिती यातील अंतरही लक्षात घ्यायला हवे. आपल्या लष्कराच्या पराक्रमाने त्या वेळी पाकचा अगदी धुव्वा उडाला हे नि:संशय. तथापि, तत्कालीन वाजपेयी सरकारची ‘डिप्लोमसी’ आणि त्याला मिळालेली स्थानिकांच्या सहकार्याची जोड या बाबीदेखील भारताच्या विजयात अत्यंत महत्त्वाच्या होत्या हे विसरून चालणार नाही. स्थानिकांनी त्या वेळी लष्कराला सर्वतोपरी साहाय्य केले होते. मात्र, अलीकडे काश्मीर प्रश्नावर अधिकाधिक प्रक्षोभक वक्तव्ये करत तो पेटवण्याचा आणि त्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक ध्रुवीकरणाचा राजकीय लाभ उठवण्याचा डाव उजव्या विचारसरणीच्या नेत्यांकडून हेतुपुरस्सर टाकला जातो. एकप्रकारे युद्धज्वर पेटवण्याचा प्रयत्नही काही मंडळी राजकीय लाभासाठी करू पाहतात. ज्यांनी युद्धाची झळ सोसलेली नाही, अशांना त्याची खुमखुमी असते. पण, ज्यांनी युद्धात घरदार, मुलं, परिवार गमावलेला असतो त्यांना युद्धाची दाहकता चांगलीच माहिती असते. त्यामुळे एकीकडे स्वसंरक्षणासाठी कायम युद्धसज्ज राहतानाच दुसरीकडे राजकीय कूटनीतीचा अवलंब करत युद्ध टाळण्यावर कटाक्ष ठेवण्यातच खरा मुत्सद्दीपणा असतो. पण, त्याऐवजी सध्या भावनिक मुद्द्यांना हात घालण्याची नीती अधिक महत्त्वाची समजली जाते. त्यातूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे काश्मीरप्रश्नी अमेरिकेच्या मध्यस्थीस मोदीही अनुकूल असल्याचे वक्तव्य, त्याचे उमटलेले पडसाद यावर तावातावाने चर्चा होते. पण, इथे ट्रम्प अथवा मोदी काय म्हणाले तो मुद्दाच नाही, तर इतरांना दुरान्वयेही अशा साध्या चर्चेची संधीही मिळू नये, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काश्मिरींमध्ये अधिकाधिक विश्वासाचे वातावरण निर्माण करायला हवे. काश्मीरची संस्कृती पाहता ते काही फार अवघड नाही. काश्मीरमधील अनेक महत्त्वाच्या देवस्थानांची देखभाल आजही मुस्लिम परिवारांकडे आहे. पर्यटन व्यवसायामुळे बाहेरच्यांना आपलेसे करण्याचा स्वभावही मुळातच आहे. अर्थात, ही संस्कृती जपण्याची आणि वाढवण्याची मुख्य जबाबदारी तेथील स्थानिक नेतृत्वाची आहे, हेही तेवढेच खरे. कारण, काश्मीर प्रश्न म्हणजे केवळ तेथील जमिनीचा मुद्दा नाही, तर स्थानिक लोकांचा मुद्दा त्याहून किती तरी महत्त्वाचा आहे. म्हणूनच सर्व स्तरांतून काश्मिरी जनतेत विश्वास निर्माण करण्याचा संकल्प यानिमित्ताने व्हावा. तसे झाल्यास स्थानिक जनतेचा प्रशासकीय यंत्रणा, लष्कराशी कमी झालेला संवाद वाढेल, प्रश्नाची तीव्रता नक्कीच कमी होईल आणि कारगिल विजय दिनाचा आनंदही उत्तरोत्तर दृगोचर होत जाईल.

बातम्या आणखी आहेत...