आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divyamarathi Editorial About Delhi Assembly Election 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत विकास विरुद्ध विखार

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

नेहमी इलेक्शन मोडमध्ये राहणाऱ्या भाजपला महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हादरे बसले. त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा डाव भाजपने प्रचंड जोर लावून खेळला. दिल्लीत आज मतदान होणार आहे आणि एक दिवस आधी शिवसेनेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामाची प्रशंसा करून भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. एखाद्या पक्षाला निवडणूक जिंकावी वाटणे यात काहीही चुकीचे नाही. त्यासाठी मार्ग कोणता, यावर चर्चा होणारच. केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारी शाळा आणि आरोग्य सुविधांमध्ये केलेल्या सुधारणा अनुकरणीय आहेत. मोफत वीज, पाणी यामुळे कष्टकरी लोकांची मोठी सोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर विकासाचे दिल्ली मॉडेल भाजपने सर्व राज्यांसाठी स्वीकारले पाहिजे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी या मुद्द्यांवर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान भाजपला दिले. अर्थातच, भाजपने ते स्वीकारले नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोलणे किंवा राजकारण करणे हे भाजपसाठी इतिहासजमा झाले आहे. त्यामुळे दिल्लीत हिंदू-मुस्लिम असे ध्रुवीकरण करण्याचा जोरदार प्रयत्न भाजपने केला. या ध्रुवीकरणासाठी भाजपने मुद्दा उचलला तो शाहीनबाग येथे गेल्या दीड महिन्यापासून शांततेत सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनाचा. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे मुस्लिमांची अडचण होईल, हा कायदा घटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वांचे उल्लंघन करणारा आहे, तो रद्द करावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या मनात असलेली ही भीती खोटी असेल तर भाजपने ती दूर केली पाहिजे, आंदोलक महिलांशी संवाद साधला पाहिजे. पण तसे झाले नाही. हे आंदोलन किमान दिल्लीत मतदान होईपर्यंत सुरूच राहिले पाहिजे याची काळजी भाजपने घेतली. भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या आंदोलकांना गद्दार ठरवत त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळीही शांतच राहिले. केंद्रीय मंत्र्यांच्या या चिथावणीनंतर एका तरुणाने जामिया आंदोलकांवर गोळी झाडली. अन्य एक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केजरीवाल हे दहशतवादी असल्याचा आरोप केला. त्याबाबतचे पुरावे असल्याचाही दावा केला. पुरावे असतील तर मोदी सरकारने केजरीवालांवर कारवाई का केली नाही, असे प्रश्न लोकांना पडत नाहीत याची भाजपला खात्री झाली आहे. दिल्लीची जनता शाहीनबागसोबत नव्हे, देशासोबत आहे, हे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्र्यांचे आहे. भाजपच्या बड्या नेत्यांनी अशा पद्धतीने केलेले धार्मिक ध्रुवीकरण चालेल की नाही हे निकालानंतर स्पष्ट होईलच, मात्र भाजपने आपली भूमिका याद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या मार्गानेच त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत, हे ते उघडपणे सांगत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर त्यांना कोणतीही निवडणूक लढवायची नाही. आता चेंडू जनतेच्या कोर्टात आहे. ध्रुवीकरण, द्वेष हवा की सामाजिक सलोखा, विकास, शिक्षण, आरोग्याच्या मूलभूत सुविधा हव्यात हे मतदारांनी ठरवायचे आहे.