आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्युतीचे धाडस (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची सर्वात वेगवान धावपटू द्युती चंद हिने आपण समलैंगिक असल्याचे जाहीर करणे ही अत्यंत धाडसाची व कौतुकाची बाब आहे. टोकियो ऑलिम्पिक एक वर्षावर आले असताना आणि स्वत:चे करिअर निर्णायक टप्प्यावर आले असताना द्युतीने स्वत:च्या लैंगिक प्रेरणा व्यक्त करण्याचा एक अर्थ असा की, तिची सराव करताना मोठ्या प्रमाणावर मानसिक कुचंबणा होत असणार! समाज काय म्हणेल, नातेवाईक-कुटुंब काय म्हणेल, क्रीडाविश्व काय म्हणेल अशा असंख्य प्रश्नांनी तिच्या मनाचा कोंडमारा होत असणार. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूला मानसिक स्वास्थ्य हरवून चालत नाही. कोणताही खेळ हा तसा ‘माइंड गेम’ असतो. धावपटूंना तर मन खंबीर, कणखर ठेवणे हे क्रमप्राप्तच अाहे. या खेळाडूंनी दीर्घकालीन तपस्या केलेली असते, प्रचंड शारीरिक श्रम घेतलेले असतात, आयुष्याचा किमती वेळ दिलेला असतो, त्यावर खर्च केलेला असतो अशा खेळाडूंच्या दृष्टीने प्रत्यक्ष स्पर्धेत मानसिक स्वास्थ्य उत्तम नव्हे तर सर्वोत्तम असणे महत्त्वाचे असते. हे लक्षात घेता अत्यंत गरीब घरात जन्मास आलेल्या द्युतीने अनेक अडथळे पार करत आशियाई स्पर्धांत १०० मी. व २०० मी. धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. तिचे लक्ष्य आता टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीकडे आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप होत असून तिथे तिने सर्वोत्तम कामगिरी केल्यास टोकियो ऑलिम्पिकचे दरवाजे तिच्यासाठी खुले होणार आहेत. त्यामुळे पुढचा वर्षभराचा काळ पाहून आपले मानसिक स्वास्थ्य दीर्घकाळ तंदुरुस्त राहावे व लक्ष्य केवळ सरावाकडे राहावे म्हणून तिचा हा निर्णय असणार आहे.


द्युतीच्या समलैंगिक असण्याला तिच्या घरच्यांनी विरोध केला आहे. अर्थात तिच्या घरच्यांच्या विरोधाला कायदेशीरदृष्ट्या काही अर्थ नाही. कारण गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता दिल्याने ‘एलजीबीटी’ समुदायाला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला होता. या निर्णयानंतर या समुदायाला समाज स्वीकारू लागला आहे. एलजीबीटी समुदायाचे हक्क व त्यांना हवा असणारा सामाजिक अवकाश याचीही चर्चा चोहोबाजूंनी सुरू झाली आहे. द्युतीने आपले समलैंगिकत्व जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण हे करू शकलो असे म्हणणे हे भारतीय क्रीडाविश्वातील पहिले उदाहरण म्हणता येईल. एखाद्या खेळाडूचे समलैंगिक असणे ही काही वर्षांपूर्वी धक्कादायक बाब समजली जात असे. ७० चे दशक गाजवणारी जगप्रसिद्ध महिला टेनिसपटू बिली जिन किंग यांनी आपले समलैंगिकत्व जाहीर केले तेव्हा अमेरिकेत या विषयावर मंथन सुरू होते. पण बिलीच्या नंतर टेनिस जगतातील मार्टिना नवरातीलोव्हा, अॅमेलो मॉरिस्मो, याना नोवोत्ना, हॅना मॅनडिकोव्हा या महिलांनी स्वत:चे समलैंगिकत्व जाहीर केले. शिवाय इयान थॉर्प, ग्रे ल्युगानिस या ऑलिम्पिक पुरुष जलतरणपटूंनी स्वत: ‘गे’ असल्याचे जाहीर केले. पाश्चिमात्य क्रीडाजगतात एलजीबीटीला सहज स्वीकारले गेले आहे. हे पाहता आपल्याकडे द्युतीला सापत्न वागणूक मिळणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण उद्या ती देशाला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारी धावपटू आहे.

बातम्या आणखी आहेत...