आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक पक्षांची मोर्चेबांधणी (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१९च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतील. देशातल्या बहुतांश वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनी भाजपप्रणीत एनडीए आघाडीला बहुमत मिळेल, अशा शक्यता वर्तवल्या आहेत. पण हे पोल जाहीर करताना या वाहिन्यांनी मोदी-शहा यांच्या ताब्यात असलेल्या भाजपच्या जागा का घटल्या यावर चर्चा करण्याचे शिताफीने टाळलेले दिसते. कदाचित मोदी फॅक्टरला लागलेली घसरण हा टीआरपी मिळवणारा मुद्दा झाला नसता. तरीही एक बाब स्पष्ट दिसते की, २०१९ची लोकसभा निवडणूक मोदी फॅक्टरच्या परिघात फिरत राहिली. विरोधकांच्या रडारवर मोदींना पराभूत करणे हाच एकमेव अजेंडा होता. त्यात काँग्रेस आघाडीवर होती, त्यांना यूपीएतल्या मित्र पक्षांची साथ होती. शिवाय मोदींच्या कारभाराला विटून, कंटाळून एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारे चंद्राबाबू नायडू, नवीन पटनाईक यांच्यासारखे दिग्गज नेतेही होते. देशातल्या सर्व प्रादेशिक पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसून आले. आपले अस्तित्व, आपल्या अस्मिता व आपली मर्यादित धोरणे यांचा प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या लढाईत जबर नुकसान होऊ नये म्हणून हे पक्ष कंबर कसून निवडणुकीत उतरलेले दिसले. २०१४च्या मोदी लाटेत प्रादेशिक पक्षांची वाताहत दिसून आली असली तरी त्यांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व कमी झालेले नव्हते, हे २०१९च्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळेच की काय, उद्या भविष्यात हीच मंडळी आपल्या मदतीला येतील या विश्वासावर काँग्रेसच काय, पण स्वत:च्या ३०० जागा येतील, असा दावा करणाऱ्या आणि विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘महामिलावट’ संबोधणाऱ्या मोदी-शहा जोडगोळीने दिल्लीत ३६ घटक पक्षांना स्नेहभोजन दिले. ‘एनडीए म्हणजे निव्वळ आघाडी नाही, तर ते कुटुंब आहे’, असे मोदींना म्हणावे लागले. गेल्या पाच वर्षांत आपल्या घटक पक्षांच्या अशा पद्धतीने नाकदुऱ्या मोदी-शहांनी काढल्या नव्हत्या हे या निमित्ताने विसरता कामा नये.


दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्रिशंकू परिस्थिती लक्षात घेऊन वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी, तेलंगण राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव, नवीन पटनाईक यांच्याशी चर्चा केलेल्या दिसून आल्या. काँग्रेसच्या पाठिंब्यावर तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करता येईल या शक्यतेवर पवारांकडून हालचाली सुरू आहेत. त्यावर नवी राजकीय समीकरणे आखली जात आहेत. चंद्राबाबू नायडू यांनीही दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बसप प्रमुख मायावती, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या आहेत. अर्थात प्रादेशिक पक्षांच्या या प्रयत्नांना आजच्या निकालानंतर जोर येईल. हा निकाल मोदींच्या भाजपला स्पष्ट बहुमत देणारा ठरला तर एनडीए आघाडीत मोठी अस्वस्थता निर्माण होईल. विशेषत: शिवसेनेला हा निकाल पचवावा लागेल. शिवाय काँग्रेसप्रणीत यूपीएलाही आपल्या सर्व राजकीय भूमिका तपासून घ्याव्या लागतील. उलट एनडीए बहुमतापासून दूर राहिल्यास सर्वच प्रादेशिक पक्षांच्या हाती सत्तेच्या दोऱ्या जातील. त्याने देशात पुन्हा नवे राजकारण उभे राहील.

बातम्या आणखी आहेत...