आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचं गुत्तं व गुंता (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वी परीक्षांचे निकाल जाहीर झाले. गतवर्षीपेक्षा उत्तीर्णांची टक्केवारी २.५३ ने कमीच आहे. एकुणात तेवढा फरक फार नाही. शास्त्र, वाणिज्य व अन्य शाखांमधील उत्तीर्णांचा टक्काही १.२२ ते ३.२५ ने  घटलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचा टक्का मुलांपेक्षा वाढलाय. दोघांमधला फरकही हळूहळू वाढतोय. उत्तीर्णांचा टक्का चांगला असला तरीही या निकालाला पालक व विद्यार्थ्यांच्या लेखी महत्त्व फारसे नाही, अशी अवस्था राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणाने करून टाकली आहे. विशेषत: शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश हे त्या-त्या प्रवेश परीक्षांवर अवलंबून असतात. त्यासाठी जीवापाड धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता  १२ वीच्या परीक्षेचे महत्त्व हे किमान पात्रता परीक्षेच्या पलीकडे बिलकुल नाही. त्यामुळेच उत्तीर्णांचा टक्का गेल्या वर्षाच्या जवळपास असला तरी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवलेला विद्यार्थी अभावानेच सापडेल. वैयक्तिक गुण कमी होत आहेत. यंदाच्याही निकालाचे ते वैशिष्ट्य म्हणावे लागेल. स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे म्हणून विद्यार्थी हजारो रुपयांची फी असलेल्या महागड्या क्लासेसना जातात. या क्लासेसवाल्यांनीच विद्यार्थ्यांना १२ वीकरिता शाळा प्रवेशाचा गुत्ता घेतलेला असतो. त्यामुळे महाविद्यालयात न जाता हे विद्यार्थी १२वीची परीक्षा देतात. कारण त्याला किमान पात्रतेपलीकडे महत्त्व सरकारने ठेवलेले नाही. या धोरणांमुळेच क्लासेसचा बाजार हा कॅन्सरची गाठ वाटावी इतक्या भयानक स्वरूपात सुजला आहे. गुंडांच्या टोळीयुद्धासारखे लातूरमधील क्लास युद्ध, कोटामधील आत्महत्या हे त्याचेच परिणाम आहेत.  ११ वी, १२ वी व प्रवेश परीक्षा या तिन्हींच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले तरच अब्जावधींचा लोकांचा पैसा खर्च करून चालणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांकडे पालक व  विद्यार्थी गंभीरतेने बघतील. अन्य शाखांच्या बाबतीत टक्केवारीची रेस नसल्याने ती स्थिती नाही.

 


१२ वीच्या परीक्षांच्या बाबतीत आणखी एका संकटास विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. बोर्डाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेव्यतिरिक्त शाळांच्या हातात काही गुण असतात. या अंतर्गत गुण पद्धतीत बदल करण्याचा विचार महाराष्ट्र बोर्ड सध्या करते आहे. फक्त रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान आदी शास्त्र विषयांत अंतर्गत गुण द्यायचे. भाषा व गणितासाठी अंतर्गत गुण न देण्याचा विचार होतो आहे. तसे जर झाले तर सध्या ९०च्या जवळपास असलेला १२ वीच्या गुणांचा टक्का त्याहीपेक्षा खाली येईल. १० वीसाठी अंतर्गत गुणपद्धतीत बदल हा अमलात आला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे ९८, ९९ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी यंदा किती दिसतील? हे निकालानंतर कळेल. विशेष म्हणजे सीबीएससी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अंतर्गत गुणपद्धती अजून चालूच आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ९०, ९२ टक्क्यांच्या वर गुण मिळाले आहेत. याचा परिणाम ११ वीच्या प्रवेशांवर यंदा दिसेल. जिथे पुणे, मुंबईप्रमाणे सीबीएससी शाळांची संख्या अधिक तिथे ११ वी प्रवेशासाठी अंतर्गत गुण मिळालेल्या व न मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. सरकारची उलटसुलट धोरणे या गुंत्यास कारण आहेत.