Editorial / मान्सूनचा अन्यायी पॅटर्न

नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला जुगार म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर मान्सूनने गेल्या काही वर्षांत सातत्याने दिले आहे

संपादकीय

Aug 07,2019 08:33:00 AM IST

नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला जुगार म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर मान्सूनने गेल्या काही वर्षांत सातत्याने दिले आहे. कधी धो धो बरसत, सर्वांच्या कंठाशी तो प्राण आणतो, तर कधी एवढी दडी मारतो की तोंडचे पाणी प‌ळावे. यंदा मान्सूनने आपली सर्व वैशिष्ट्ये दाखवण्याचे ठरवलेले दिसते. एक तर त्याचे आगमन उशिरा झाले. केरळात तो आठ दिवस उशिराने ८ जूनला दाखल झाला. त्यातच अरबी समुद्रात वायू वादळ निर्माण झाले. या वादळाने बाष्प पळवल्याने मान्सून दक्षिणेतच रेंगाळला. मुंबईत येण्यासाठी त्याला २२ जून उजाडावा लागला. गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राचे डोळे आकाशाकडे लागलेले असताना मान्सूनने जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांत बऱ्यापैकी हजेरी लावली. मजल दरमजल करत यंदा मान्सूनने १९ जुलै रोजी देश पादाक्रांत केला तेव्हा देशात अपेक्षित सरासरीच्या १७ टक्के कमी पाऊस झाला होता. जुलै या हमखास पावसाच्या काळात मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील शाखा शांत राहिल्या. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबईत आणि विशेषत: मध्य महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.


ज्या महाराष्ट्रात २०१५ मध्ये रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करावा लागला त्याच राज्यात २०१९ मध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात बुडता बुडता वाचली. ज्या पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांनी मार्चमध्ये तळ गाठला होता, ती धरणे जुलैमधील चार दिवसांच्या पावसाने ओसंडून वाहू लागली आहेत. उत्तर, दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य महाराष्ट्र देशात सध्या सर्वाधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात ४४४.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७३०.२ मिमी असा ६४ टक्के जास्त पाऊस झाला आहे. खान्देशापासून ते दक्षिण कोकणापर्यंतच्या सर्व नद्या दुथडी भरून वाहाताहेत. गेल्या चार वर्षांत पावसाने राज्यात ५२२ बळी घेतले आहेत. एकीकडे असे चित्र असताना मराठवाडा, विदर्भात मात्र कोरडे नदी- नाले दुष्काळाच्या जखमा दाखवताना दिसताहेत. मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाची मोठी तूट आहे. राज्यातील १६ जिल्हे अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा निम्मा संपला तरी राज्यात २०३८ टँकर सुरू आहेत. एकीकडे पुराचे थैमान आणि दुसरीकडे दुष्काळाचे मळभ असे सध्या महाराष्ट्राचे चित्र आहे. राज्यातील सद्य:स्थिती पाहता ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवे‌ळी’ असे म्हणण्याची वेळ काही भागावर आली असून काही भागात ‘पड रं पाण्या, पड रं पाण्या,’ असं आर्जव करण्याची वेळ आली आहे. मान्सूनचा हा अन्यायी पॅटर्न समजून घेऊन त्याबरहुकूम वेळीच नियोजन करणे ही
काळाची गरज आहे.

X
COMMENT