आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहे कुठे काँग्रेस?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर २७ तासांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा निर्णय जाहीर करताना त्यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. वास्तव नाकारणे, जडत्व आणि नवे विचार, नवे नेतृत्व न स्वीकारणे ही तीन कारणे आपण पक्षातून बाहेर पडण्यामागे असल्याचे ते म्हणाले. असे विधान करणारे शिंदे पहिले आणि एकमेव काँग्रेस नेते नाहीत. यापूर्वी अशोक तंवर ते हिमंता विश्व सरमापर्यंत अनेक तरुण नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तंवर म्हणाले होते, वयोवृद्ध नेते तरुणांना संपवत आहेत. राहुल यांनी भेटण्याऐवजी कुत्र्याबरोबर खेळण्यास प्राधान्य दिल्याचे सरमा म्हणाले होते. एकेकाळी तंवर हे ‘टीम राहुल’चा अविभाज्य भाग मानले जात होते. सरमा आता ईशान्येमधील भाजपचे नेते आहेत. या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न असा निर्माण होतो की, काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाकडे खरोखरच दुर्लक्ष होत आहे का? आणि तसे असेल तर काँग्रेसचे तरुण नेते शिंद्यांच्या पावलांवर पाऊल टाकणार का, हा आजच्या घडीला कळीचा प्रश्न बनला आहे. तरुण नेतृत्वाबाबत उदासीन दृष्टिकोन आणि धोरणहीन अवस्थेमुळे मध्य प्रदेशासारखे महत्त्वाचे राज्य काँग्रेसच्या हातातून निसटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेच्या पटलावर काय होईल ते होईल, पण तिथल्या जनतेने ठेवलेल्या अपेक्षाही कमलनाथ सरकार पूर्ण करू शकत नसल्याचे शिंदे यांनी केलेले आरोप या पक्षाला भानावर आणणारे आहेत. पण मुळात संघटनात्मकदृष्ट्या काळानुरूप बदल स्वीकारण्याचेच भान राहिले नसेल तर अशा घटनांतून ते आणखी येण्याची अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल. लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यावर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसला धोरणात्मक पक्षाघात झाला. निर्णय घेतले जात नाहीत, अशा तक्रारी वाढल्या. मध्य प्रदेशात २०१८ मध्ये निवडणुकांच्या वेळी कमलनाथ यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले गेले. १४ महिन्यांनंतरही ते मुख्यमंत्रिपदासोबत प्रदेशाध्यक्षपदीही कायम आहेत. गटबाजीमुळे कर्नाटकसारख्या अनेक राज्यांत प्रदेशाक्षाध्यक्षपदे रिक्त आहेत. महाराष्ट्रातही बाळासाहेब थोरातांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला नाही. मतभेद, गटबाजी, राजीनामे आणि फाटाफुटीपासून मुक्त असे कोणतेही राज्य काँग्रेसजवळ नाही. आता शिंदेंच्या राजीनाम्यानंतर राजस्थानमधील सचिन पायलट बंडखोरी करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. शिंदे आणि पायलट यांनी २०१४ मध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाची सरकारे बनवण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांनाही उमेदवारांच्या निवडीपासून मंत्रिपदे ठरवण्यापर्यंत महत्त्व देण्यात आले. परंतु राहुल यांनी राजीनामा दिल्यापासून पक्षामधील युवा नेतृत्वाला महत्त्व मिळतच नाही, असे चित्र निर्माण झाले. अशा परिस्थितीत पक्षाला पुन्हा उभे राहायचे असेल तर शक्य तितक्या लवकर पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची गरज आहे. पक्षातील तरुण आणि ज्येष्ठांमध्ये संतुलन साधत त्यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याचे आव्हान त्या नेतृत्वापुढे असेल, अन्यथा ही ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ लवकरच केवळ ज्येष्ठांचा पक्ष होईल.

बातम्या आणखी आहेत...